नागरिकत्व सुधारणा कायदा आणि ‘राष्ट्रीय नागरिकता नोंदणी’ यांनुसार बांगलादेशात परत न पाठवण्याची वेश्याव्यवसायातून सुटका झालेल्या बांगलादेशी युवतीची याचना !

गोव्यातील वेश्याव्यवसायात बांगलादेशी युवतींचा मोठ्या प्रमाणावर भरणा असल्याचे प्रकरण

पणजी – गोव्यातील वेश्याव्यवसायात बांगलादेशी युवतींचा मोठ्या प्रमाणावर भरणा आहे. देशात ‘नागरिकत्व सुधारणा कायदा’ लागू झाल्याने आणि ‘राष्ट्रीय नागरिकता नोंदणी’ कायदा येणार असल्याच्या पार्श्‍वभूमीवर वेश्याव्यवसायातून सुटका झालेल्या युवतींना त्यांना बांगलादेशात परत पाठवले जाणार असल्याची भीती वाटू लागली आहे.

गोव्यात वर्ष २०१४ ते २०१९ या कालावधीत वेश्याव्यवसायातून सुटका करण्यात आलेल्या विदेशी युवतींमधील ४० टक्के युवती या बांगलादेशच्या आहेत. वेश्याव्यवसायातून सुटका करण्यात आलेली बांगलादेशमधील एक युवती एका शासकीय गटाला म्हणाली, ‘‘मला पुन्हा बांगलादेशमध्ये जायचे नाही. तेथे गेल्यास मला पुन्हा वेश्याव्यवसायात ढकलले जाण्याची भीती वाटते.’’ शासकीय गटातील सदस्याने दिलेल्या माहितीनुसार गोव्यात अशा अनेक युवती आहेत. या युवतींकडे भारतीय नागरिकत्व नाही. नुकतीच २६ वर्षीय मुसलमान युवतीची वेश्याव्यवसायातून सुटका करण्यात आली. ही युवती आता हिंदु धर्मानुसार आचरण करते.

या युवतीने शासकीय गटाला तिचा पुढील अनुभव सांगितला. ‘‘मी १४ वर्षांची असतांना माझी आई वारली. यानंतर मला माझ्या वडिलांनी मुंबई येथे आणून वेश्याव्यवसाय चालवणार्‍या व्यक्तीला विकले. मला पुढे १० वर्षे देशभरात विविध ठिकाणी वेश्याव्यवसायासाठी नेण्यात आले. मला हिंदु नाव देण्यात आले. ३ वर्षांपूर्वी मी गोव्यात आले असता माझी या व्यवसायातून सुटका करण्यात आली आणि मला शासकीय पुनर्वसन केंद्रात ठेवण्यात आले. यानंतर शासनाने मला पुन्हा बांगलादेश येथे पाठवले. मला तेथे एका अशासकीय संस्थेकडे सोपवण्यात आले आणि त्या संस्थेने मला माझ्या एका दूरच्या नातेवाइकाकडे सोपवले. माझ्या नातेवाइकांकडून माझे बळजोरीने लग्न लावण्यात आले. लग्नानंतर काही दिवसांनी माझ्या पतीने मला मुंबई येथे आणून पुन्हा वेश्याव्यवसायात ढकलले. यानंतर मला वेश्याव्यवसाय करणार्‍यांनी गोव्यात पाठवले.’’