बंगालचे मंत्री सिद्दीकुल्ला चौधरी यांना बांगलादेशाने व्हिसा नाकारला

नागरिकत्व सुधारणा कायद्याला विरोध केल्याचा परिणाम

बंगालचे मंत्री सिद्दीकुल्ला चौधरी

कोलकाता – बंगालचे मंत्री सिद्दीकुल्ला चौधरी यांना बांगलादेशाने ६ दिवसांच्या दौर्‍यासाठी व्हिसा देण्यास नकार दिला आहे; मात्र त्याचे कुठलेही कारण देण्यात आले नाही, असे त्यांनी म्हटले आहे. ‘दोन्ही देशांचे संबंध चांगले आहेत. त्यामुळे ही घटना दुर्दैवी आहे. मी हे प्रकरण मुख्यमंत्र्यांकडे नेईन,’ असेही चौधरी म्हणाले. ते जमीयत-ए-उलेमा हिंदचे बंगालचे अध्यक्ष आहेत. २६ डिसेंबरपासून ते दौर्‍यावर जाणार होते. बंगाल सरकार आणि परराष्ट्र मंत्रालय यांनी त्यांना अनुमती दिली होती. सिद्दीकुल्ला यांनी नागरिकत्व सुधारणा कायद्याला विरोध केला आहे. या कायद्याविषयी बांगलादेश तटस्थ राहू इच्छित आहे. यामुळेत त्यांना व्हिसा देण्यात आलेला नाही, असे म्हटले जात आहे.

१. कोलकाता येथील बांगलादेशाच्या उच्चायुक्तालयातील एका अधिकार्‍याने म्हटले की, आम्हाला या संदर्भातील आवश्यक अनुमतीची कागदपत्रे मिळालेली नाहीत. आम्ही काही प्रकरणांत कागदपत्रे संमतीसाठी ढाका येथे पाठवत असतो. तेथून अनुमती मिळाल्यावर आम्ही येथे व्हिसा देतो.

२. ‘नागरिकत्व सुधारणा कायदा त्वरित मागे घेण्यात आला नाही, तर केंद्रीय गृहमंत्री अमित शहा हे जेव्हा कोलकात्यात येतील, तेव्हा त्यांना विमानतळाबाहेर पडू देणार नाही’, अशी धमकी जमीयत-ए-उलेमा हिंदच्या सभेत बोलतांना चौधरी यांनी दिली होती.