नागरिकांना वन्यप्राण्यांपासून संरक्षण हवे !

महाराष्ट्रात अनेक भागांत वाघ आणि बिबट्या या प्राण्यांच्या दहशतीमुळे अनेक नागरिक भयभयीत जीवन जगत आहेत. कोल्हापूर जिल्ह्यातील आजरा, राधानगरी येथे जंगली हत्तीमुळे, तर सांगली येथे मगर, विदर्भात वाघ-बिबट्या यांच्या आक्रमणांच्या घटना घडत आहेत. गेल्या ३ ते ४ वर्षांत एकट्या ब्रह्मपुरी वन विभागात वाघ, बिबट्या आणि अन्य वन्य प्राण्यांच्या आक्रमणात किमान ४० जणांचे मृत्यू झाले आहेत. घायाळांचा आकडा तर ३०० च्या वर गेला आहे. या वर्षी १० गावकर्‍यांचे वाघ-बिबट्याने जीव घेतले. अनुमाने १७ ते १८ कोटी रुपयांची हानीभरपाई सरकारला द्यावी लागली आहे. यात पाळीव जनावरांचे बळी आणि शेतीपिकाच्या हानीच्या भरपाईचाही समावेश आहे. वन्य प्राण्यांच्या आक्रमणांत मृत्यूमुखी पडणार्‍या व्यक्तीच्या कुटुंबाला १५ लाख रुपयांपर्यंत आर्थिक साहाय्य मिळते. त्यातून कुटुंबाला थोडाफार आधार मिळतो; पण मूळ समस्या कायम राहते. प्रतिदिन जीव मुठीत धरून जगावे लागत असल्यामुळे आता गावकर्‍यांमध्ये असंतोष उफाळून आलेला दिसतो. मे २०१९ मध्ये ३ गावकर्‍यांचा बळी घेणार्‍या ‘ई-१’ वाघिणीला वन विभागाने बेशुद्ध करून पकडले. तिचे स्थलांतर करण्यात आले; मात्र अशा प्रयत्नांनाही कायदे आणि नियम यांच्या मर्यादा आल्या आहेत.

चंद्रपूर जिल्ह्यातील ब्रह्मपुरी वनक्षेत्राच्या परिसरातील गावांमध्ये वाघांची प्रचंड दहशत आहे. रात्रीच्या वेळी आईच्या कुशीत झोपलेल्या लहान मुलांना बिबट्या आणि वाघाकडून पळवून नेण्याच्या प्रकारात वाढ झाली आहे. आगामी काळात हे प्रकार विकोपाला जाणार, अशी भीती तज्ञ मंडळींना वाटते. वन्य प्राण्यांचे अधिवास वाढले नसले, तरी संवर्धनाच्या प्रभावी उपायांमुळे वाघ-बिबट्यांची वाढलेली संख्या, त्याच्यात अधिवासासाठी आपसांत होणारा संघर्ष हे या संघर्षाचे मूळ आहे. वन्य प्राण्यांचा वावर आता बाहेर वाढू लागला आहे.

गावांचेही शहरीकरण होत आहे. अनेक ठिकाणी अरण्यातील वृक्षांची तोड करून संपूर्ण अरण्ये नष्ट होण्याचे प्रकार वाढत असल्याने वन्य प्राणी शहरात येतात. त्यामुळे राज्यातील अरण्ये नष्ट करण्याऐवजी त्याचे संवर्धन करणे आवश्यक आहे. अरण्ये सिद्ध करून त्यामध्ये वन्य प्राण्यांना सोडल्यास ते पुन्हा शहरात येणार नाहीत. सांगली जिल्ह्यातील कृष्णा नदीच्या काठावर मगरींचा वास असल्याने तेथेही नागरिकांना धोका निर्माण झाला आहे. त्यामुळे एकंदरीत वन विभागाने नागरिकांचे संरक्षण करण्यासाठी मगर आणि वन्य प्राणी यांचा बंदोबस्त करण्यासाठी कष्ट घेतले पाहिजेत. तरच ही समस्या कायमस्वरूपी सुटू शकेल.

– श्री. सचिन कौलकर, सनातन आश्रम, देवद, पनवेल.