गीताज्ञानदर्शन

सनातनचे ज्ञानयोगी संत पू. अनंत बाळाजी आठवले ह्यांच्या ‘गीताज्ञानदर्शन’ ह्या सनातनच्या ग्रंथसंपदेतील ग्रंथातील मजकूर क्रमश: प्रसिद्ध करत आहोत.

॥ श्रीकृष्णाय नम: ॥

अनंत आठवले

१२.  मुक्तीसाठी भक्ती

१२ आ. स्वतःच्या अवताराशी संबंधित असूनही श्रीकृष्णांनी गीतेत ‘मधुराभक्ती’ न सांगणे : भक्तीचा आणखी एक प्रकार आहे ‘मधुराभक्ती.’ नारदभक्तिसूत्रांत ‘भक्ती कशी असावी’, तर ‘यथा व्रजगोपिकानाम्’ म्हणजे ‘जशी व्रजभूमीतील गोपिकांची होती तशी’, असे सांगितले आहे. असा भाव तीव्रतेने कुणाच्या मनात आला, तर चांगलेच आहे. अशी व्यक्ती ईश्‍वराशी लवकर जोडली जाईल; पण असा भाव नसेल, तर अंगी बाणवण्याचा प्रयत्न न केलेला बरा.

श्रीमद्भागवतपुराणात दशमस्कंध, अध्याय २९, श्‍लोक ५ ते ८ मध्ये सांगितले आहे की, तापायला लावलेले दूध तसेच शेगडीवर सोडून, लहान मुलाला दूध पाजतांना तसेच सोडून, वडील, पती, भाऊ थांबायला सांगत असतांना ते न ऐकता गोपी कृष्णाकडे निघाल्या. पुढे श्‍लोक ११ असा आहे,

तमेव परमात्मानं जारबुद्ध्यापि सङ्गताः।
जहुर्गुणमयं देहं सद्यः प्रक्षीणबन्धनाः ॥

– श्रीमद्भागवतपुराण, स्कंध १०, अध्याय २९, श्‍लोक ११

अर्थ : गोपींनी त्या परमात्मा श्रीकृष्णांशी जारबुद्धीने (परपुरुषाप्रमाणे) संग केला; पण कर्मबंधने सुटून त्यांना त्या वेळी त्रिगुणमय देहाचा विसर पडला होता.

उत्कट भाव नसेल, तर अशा वागण्याने समाजाची घडी विस्कटू शकते. श्रीकृष्णांनी गीतेत अनेक प्रकारची भक्ती सांगितली; पण प्रत्यक्ष त्यांच्याच अवतार जीवनाशी संबंधित असूनही गीतेत त्यांनी मधुराभक्ती सांगितली नाही. (क्रमश:)

॥ श्रीकृष्णार्पणमस्तु ॥

संदर्भ : सनातनचे प्रकाशन ‘गीताज्ञानदर्शन’