ख्रिस्तीकरणाची अनुमती !

संपादकीय

नाताळ आणि ख्रिस्ती नववर्षपूर्वदिन म्हणजेच ३१ डिसेंबरच्या रात्री रेस्टॉरंट, हॉटेल आणि पब येथे वाजवल्या जाणार्‍या गाण्यांसाठी परवाना शुल्क ‘पीपीएल्’ (त्याचे स्वामित्व हक्क असणार्‍या) संस्थेकडे भरणे आवश्यक असल्याचा आदेश मुंबई उच्च न्यायालयाने दिला आहे. ही तांत्रिक गोष्ट पूर्ण करून हॉटेलमालकांना जनतेला मौजमजा करू देण्याची अनुमती मिळाली आहे. ही मौजमजा ख्रिस्त्यांचा सण आणि ख्रिस्त्यांचे नववर्ष साजरे करण्यासाठी आहे, हे लक्षात घ्या. त्याचप्रमाणे अवैध मद्य विकले जाऊ नये म्हणूनही प्रशासन काळजी घेत आहे. महसूल बुडू नये; म्हणून अवैध मद्यधंद्यांवर कडक कारवाई करण्यात येणार आहे. त्यामुळे वैध मद्यधंद्यावर एकप्रकारे चांगलाच परिणाम होणार आहे ! नाताळ आणि ३१ डिसेंबर या दिवशी हॉटेल अन् पब येथेे मद्य पिण्यासाठी मद्यपींना परवाने बंधनकारक केले आहेत. त्यासाठी मद्यपींना असुविधा होऊ नये म्हणून विशेष पथके स्थापन करण्यात आली आहेत; एवढेच नव्हे तर त्यांनी ‘ऑनलाइन’ मागणी देण्याचीही सोय केली आहे. वर्षभरासाठी १०० रुपये, तर आजीवन परवाना केवळ १ सहस्र रुपयांना आहे. ग्राहकांकडे परवाने नसतील, तर हॉटेल मालकांवर कारवाई होणार आहे. आजकाल सहज कुठेही उपलब्ध होणार्‍या विविध ‘ओळखपत्रां’वर हे परवाने मिळणार आहेत. सर्वांत महत्त्वाचे म्हणजे या दोन्ही रात्री हॉटेल्स सकाळपर्यंत चालू ठेवता येणार आहेत. हा सर्व खटाटोप ख्रिस्त्यांचे दोन्ही सण हिंदूंना उत्साहात साजरे करतांना कोणतेही अडथळे येऊ नयेत म्हणून आहे.

मुळावर घाला घालण्यातील अडचणी

मद्यग्राहकांच्या परवान्यामुळे गुन्हे थांबण्याच्या दृष्टीने विशेष काही साध्य होऊ शकेल असे नाही; केवळ गुन्हा करणार्‍या व्यक्तीचा शोध घेणे सोपे होईल इतकेच. वरील दिवशी अपप्रकार होऊ नयेत, अशी प्रशासनाची खरोखरच इच्छा असेल, तर मुळाशी जाऊन प्रश्‍न सोडवणे अपेक्षित आहे. अर्थात् त्यामध्ये जनतेनेही मोठे अडथळे निर्माण केले आहेत. त्यामुळे कित्येकदा प्रशासनाला कारवाई करावी लागतेे. डान्सबारवरील बंधनांविषयी असेच झाले. महसुलापोटी आणि मतपेटीसाठी थेट कडक निर्णय घेतले जात नाहीत. त्यामुळे समाजसुधारणा किंवा गुन्हेगारी नियंत्रण या दृष्टीने विशेष काही साध्य होत नाही. वरवर पाहता ही बंधने वाटली, तरी बहुसंख्य हिंदूंनी ख्रिस्ती सणांच्या निमित्ताने मद्य पिणे आणि मद्य पिता पिता ख्रिस्ती सण साजरे करणे, हेच यातून साध्य होणार आहे. एकीकडे लाखो संसार दारूमुळे उद्ध्वस्त होत आहेत; गावागावांतील महिला दारूबंदीसाठी आंदोलने करून त्यांच्या गावात ‘दारूबंदी’ करून घेत आहेत. तर दुसरीकडे ख्रिस्ती सणांच्या निमित्ताने मद्य पिण्यासाठी प्रोत्साहन मिळत आहे. असे विचित्र चित्र आहे.

हिंदूंचे एक दिवसाचे धर्मांतर !

नागपूरमध्ये गरीब हिंदु विद्यार्थ्यांना नाताळच्या निमित्ताने ‘मॉल’मध्ये नेऊन सांताक्लॉजच्या हस्ते भेट देण्यात आली. यातून हिंदु मुलांवर काय संस्कार होणार ?  ‘ख्रिस्त्यांचा सांताक्लॉज भेट देतो’, असेच त्यांना वाटणार. रामनवमी, दत्तजयंती शाळेत कधी साजरी होते का ?, त्याचे महत्त्व सांगितले जाते का, याविषयी साशंकताच आहे. नाताळ जवळ आला की, शहरांतील दुकानांच्या बाहेर सांताक्लॉजचे पुतळे, कपडे आणि टोप्या लावल्या जातात. आजकाल फेरीवालेही रस्त्यावर सांताक्लॉजची टोपी घालून उभे असतात. लहान मुलांनी त्यासाठी हट्ट धरला तर पालक त्यांचा हिरमोड करत नाहीत; कारण पालकांमध्येच धर्माभिमान नाही. महाविद्यालयीन युवकांमध्येही ही टोपी घालून जाण्याची नवरूढी निर्माण झाली आहे. थोडक्यात मोठ्यांपासून छोट्यांपर्यंत सर्वजण त्यांच्या त्यांच्या स्तरावर ख्रिस्त्यांचे हे २ सण साजरे करण्याची सिद्धता करत आहेत. त्यांना प्रशासन आणि अन्य यंत्रणाही साहाय्य करत आहेत.

हिंदूंनो, धर्माभिमान जागवा !

मागील वर्षी दोन ठिकाणी श्री गणपतीच्या मूर्तीला सांताक्लॉजचा पोषाख घालण्याच्या घटना महाराष्ट्रात घडल्या. यापेक्षा हिंदूंच्या सर्वधर्मसमभावाच्या सद्गुणविकृतीचे दुसरे कुठले उदाहरण द्यावे ? ख्रिस्ती हिंदूंच्या सणाला कधी उपासना करतात का ? ख्रिस्ती धर्म घराबाहेर नव्हे, घरात नव्हे, तर थेट हिंदूंच्या मंदिरात आणि देवघरात पोचला आहे, याचेच हे दुर्दैवी उदाहरण आहे. प्रसारमाध्यमेही नाताळच्या बातम्यांना यथोचित प्रसिद्धी देऊन सर्वधर्मसमभाव जोपासत आहेत. आज मिझोरम राज्याचा अघोषित धर्म ख्रिस्ती झाला आहे. मणीपूर राज्याचे मंत्री विदेशात जाऊन ‘मणिपूर स्वतंत्र राष्ट्र आहे’, असा दावा करत आहेत. सावरकरांनी म्हटले होते, ‘धर्मांतर म्हणजे राष्ट्रांतर !’ हे किती सत्य आहे, याचे हे बोलके उदाहरण आहे. त्यामुळे ‘अन्य पंथियांचे सण साजरे करणे’ ही वरवर साधी गोष्ट वाटली, तरी जसे विष हळूहळू भिनते त्याप्रमाणे हळूहळू ते धर्मांतराकडे नेणारे आहे, हे हिंदूंच्या लक्षात येत नाही. एकदा का मोठ्या प्रमाणात धर्मांतर झाले, तर राष्ट्रांतराकडे मनोभूमिका कशी जाते, याचे हे राज्य उघड पुरावा आहे. ‘भारतातील सात राज्ये ख्रिस्तीबहुल कधी झाली’, हे उर्वरित भारताला कळलेच नाही, असे म्हणू शकत नाही. पोप यांनी भारत ख्रिस्तीबहुल करण्याची केलेली घोषणा माध्यमांसह भारतीयही सहज विसरतात. त्यामुळेच त्यांना ख्रिस्तीकरणाच्या रूढी अंगीकारायला जराही संकोच वाटत नाही. आज वैज्ञानिकदृष्ट्या ख्रिस्ती, म्हणजेच पाश्‍चात्त्य जीवनमानाचे सर्व तोटे पुढे येत असल्यामुळे जग भारतातील आयुर्वेद, योग आदींनुसार सनातन हिंदु संस्कृती अंगीकारण्यासाठी धडपडत आहे आणि भारतातील हिंदू स्वतःला मद्यपी बनवत ख्रिस्ती सण साजरे करण्यात धन्यता मानत आहेत. हिंदूंनो, ख्रिस्त्यांच्या रूढी अंगीकरण्याची चढाओढ बंद करून स्वधर्माचे महत्त्व ओळखून धर्माभिमान जोपासा. त्यासाठी धर्मशिक्षण घ्या आणि धर्माचरण करा !