श्रीविष्णुसहस्रनामाची निर्मिती

महाभारत युद्ध संपल्यावर शरशय्येवर असलेले पितामह भीष्म यांना धर्मराज युधिष्ठिर यांनी पुढील सहा प्रश्‍न विचारले,

१. ‘‘या जगात सर्वश्रेष्ठ देव कोण आहे ?

२. असा कोणता देव आहे, ज्याला शरण जाणे योग्य आहे ?

३. असा कोणता देव आहे, ज्याची स्तुती केल्याने मनुष्याला सर्वसंपन्नता प्राप्त होईल ?

४. असा कोणता देव आहे, ज्याची उपासना केल्याने मनुष्याचे कल्याण होईल ?

५. या जगात सर्वश्रेष्ठ असा तो धर्म कोणता आहे ?

६. कोणत्या देवाचे स्मरण केल्याने जन्म-मृत्यूच्या चक्रांतून मुक्त होता येते ?’’

पितामह भीष्म श्रीकृष्णाकडे पाहतात. श्रीकृष्ण स्मितहास्य करून उत्तर देण्याची संमती देतात, तेव्हा पितामह सांगतात, ‘‘या सर्व प्रश्‍नांचे उत्तर एकच आहे आणि ते म्हणजे ‘श्रीविष्णु’ ! त्या वेळी पितामह भीष्म युधिष्ठिराला श्रीविष्णूचे महात्म्य आणि त्याचे सहस्रनाम सांगतात. श्रीविष्णुस्तुतीचे रहस्य उलगडतांना भीष्म म्हणतात, ‘‘अनादि अनंत असा तो विष्णु हाच परमधर्म आहे. त्याची स्तुती करणे, हीच सर्वश्रेष्ठ उपासना आहे. केवळ आणि केवळ त्याच्याच स्मरणाने मनुष्याचे कल्याण होऊन त्याला जन्म-मृत्यूच्या चक्रांतून बाहेर पडता येते.’’