कार्यक्रमात विषय मांडतांना संस्था आणि समिती यांच्या वक्त्यांकडून झालेल्या चुका त्यांना वेळोवेळी लक्षात आणून द्या !

सर्व साधक आणि कार्यकर्ते यांच्यासाठी सूचना

सनातन संस्था आणि हिंदु जनजागृती समिती यांचे वक्ते ‘हिंदु राष्ट्र-जागृती सभा’, हिंदू अधिवेशने, हिंदु राष्ट्र संघटक कार्यशाळा आदी कार्यक्रमांमध्ये विषय मांडतात. वक्त्यांच्या भाषणावरच कार्यक्रमाची ७० टक्के फलनिष्पत्ती अवलंबून असल्याने त्यांचे भाषण उत्स्फूर्त आणि प्रभावी होणे आवश्यक असते.

१. वक्त्यांकडून होणार्‍या गंभीर चुकांमुळे त्यांच्या भाषणाची परिणामकारकता न्यून होणे

संस्था आणि समिती यांच्या काही वक्त्यांकडून खालील चुका होत असल्याने उपस्थितांना विषयाचे आकलन होत नाही अन् भाषणाची परिणामकारकता उणावते.

अ. जलद गतीने विषय मांडणे

आ. बोलण्याच्या ओघात शेवटच्या शब्दांचा उच्चार नीट न करणे

इ. अयोग्य शब्दांचा वापर करणे

ई. तोंडवळ्यावरील हावभाव योग्य नसणे

उ. गंभीर विषयाच्या वेळी तोंडवळा गंभीर नसणे

ऊ. अधिक वेळ विषय मांडणे

ए. प्रस्तावना अधिक सांगून मुख्य विषयाला अपुरा वेळ देणे

ऐ. तात्त्विक विषय अधिक सांगून जिज्ञासूंना कृतीप्रवण करण्याकडे दुर्लक्ष करणे

२. साधक आणि कार्यकर्ते यांनी वक्त्यांच्या चुका त्यांना वेळोवेळी लक्षात आणून द्याव्यात !

बरेच साधक आणि कार्यकर्ते यांना वक्त्यांच्या भाषणातील चुका लक्षात येत असूनही ते तत्परतेने सांगत नाहीत. परिणामी वक्त्यांना स्वतःच्या चुका वेळीच न समजल्याने त्यांचे भाषण प्रभावी होत नाही. यापुढे सर्वांनी वक्त्यांकडून झालेल्या चुका त्यांना वेळोवेळी, म्हणजे कार्यक्रमाच्या आढावा बैठकीत लक्षात आणून द्याव्यात आणि त्या संदर्भात उत्तरदायी साधकांनाही कळवावे, तसेच सर्व चुका जिल्हासेवकांच्या माध्यमातून मुख्य कार्यालयात पाठवाव्यात.

आतापर्यंत वक्त्यांना ज्या चुका लक्षात आणून दिल्या होत्या, त्या चुकांमध्ये सुधारणा झाली नसल्यास संबंधित वक्त्यांना पुन्हा एकदा त्याची जाणीव करून द्यावी आणि त्यांच्या उत्तरदायी साधकांनाही कळवावे.

साधक-वक्त्यांसाठी महत्त्वाची सूचना

१. आपले प्रत्येक भाषण ध्वनीमुद्रित (‘रेकॉर्ड’) करावे. नंतर ते ऐकून त्यातील चुकांचा अभ्यास करावा. कार्यक्रमानंतर २४ घंट्यांत त्या भाषणाचा ऑडिओ सौ. भाग्यश्री सावंत यांच्या नावे मुख्य कार्यालयात पाठवावा. आतापर्यंत झालेल्या भाषणांचे ऑडिओ संबंधित वक्त्यांनी पाठवले आहेत ना, याची उत्तरदायी साधकांनी निश्‍चिती करावी, तसेच ‘यापुढे होणार्‍या भाषणांचे ऑडिओ वेळोवेळी पाठवले जातील’, हे पाहावे.

२. प्रत्येक कार्यक्रमात विषय मांडल्यानंतर स्वतःच्या चुका इतरांकडून जाणून घ्याव्यात. अनेक वेळा जाणीव करून देऊनही पुनःपुन्हा त्याच चुका होत असल्यास त्यासाठी स्वयंसूचना द्यावी आणि चुका दुरुस्त करण्याचा प्रयत्न करावा.

३. विषय मांडतांना होणार्‍या चुका प्रत्यक्ष भाषणाच्या वेळी लक्षात येेऊन त्या टाळता याव्यात, यासाठी पुढील उपाययोजना करता येईल, उदा. जलद गतीने विषय मांडला जात असेल, तर ‘बोलण्याची गती अल्प ठेवावी’, अशी चिठ्ठी लिहून ती ‘पोडियम’वर आपल्याला दिसेल, अशा ठिकाणी ठेवावी.

उत्तरदायी साधकांसाठी सूचना

वक्त्यांकडून झालेल्या चुकांविषयी ५ – ६ वेळा त्यांना सांगूनही ते स्वतःच्या भाषणामध्ये पालट करत नसतील, तर त्यांच्या बोलण्यात सुधारणा होईपर्यंत काही काळ त्यांना ‘वक्ता’ म्हणून बोलण्याची सेवा देऊ नये. भाषणाचा सराव करून आणि स्वयंसूचना देऊन त्यांच्या बोलण्यात सुधारणा झाल्यावरच त्यांना पुन्हा ती सेवा द्यावी. तोपर्यंत पर्यायी साधक-वक्त्याचे नियोजन करावे.