लिंगा (जिल्हा नागपूर) येथे ६ वर्षीय बालिकेचा मृतदेह आढळला

दगडाने ठेचून खून केल्याचा संशय

मुली आणि महिला यांवर होणारे वाढते अत्याचार रोखण्यासाठी कठोर कायदे करून त्यांची तत्परतेने कार्यवाही करणे आवश्यक !

नागपूर – जिल्ह्यातील कळमेश्‍वर तालुक्यातील लिंगा येथे ६ वर्षांच्या बालिकेचा मृतदेह दगडाने ठेचलेल्या अवस्थेत ८ डिसेंबरला आढळून आला. या घटनेमुळे ग्रामस्थांमध्ये संताप पसरला आहे. पोलिसांनी या बालिकेचा मृतदेह शवविच्छेदनासाठी येथील वैद्यकीय महाविद्यालयात पाठवला आहे. त्याचा अहवाल आल्यानंतरच बालिकेवर अत्याचार झाला कि नाही, हे सांगता येईल, अशी माहिती ग्रामीणचे पोलीस अधीक्षक राकेश आला यांनी दिली. या प्रकरणी पोलिसांनी एका संशयिताला कह्यात घेतले आहे.

१. लिंगा गावापासून जवळच मृत बालिकेच्या आजीचे घर आहे. ती नेहमी आजीकडे जायची.

२. बालिकेचे वडील शांताराम यांनी सांगितले की, मुलगी ६ डिसेंबरपासून बेपत्ता होती. ती आजीकडे गेली असावी, असा आमचा समज होता; मात्र ७ डिसेंबरला ती आजीकडेही नसल्याचे लक्षात आल्यावर आम्ही पोलिसांकडे तक्रार दिली. ७ डिसेंबरला सकाळी गावाजवळील शेतात पोलिसांना मुलीचा मृतदेह आढळून आला.

३. या घटनेची माहिती वार्‍यासारखी पसरताच ग्रामस्थांमध्ये संतापाची लाट उसळली. कोणतीही अनुचित घटना घडू नये म्हणून या भागात पोलीस बंदोबस्तही वाढवण्यात आला होता.

पोलीस ठाण्यावर ग्रामस्थांचा मोर्चा, तसेच सीआयडी चौकशीची मागणी

‘माझ्या मुलीला मारणार्‍या आरोपीला अतिशय कठोर शिक्षा व्हावी’, अशी मागणी मृत मुलीचे वडील शांताराम यांनी केली. कळमेश्‍वर परिसरात या घटनेचे संतप्त पडसाद उमटले आहेत. कळमेश्‍वर आणि आसपासच्या गावांतील लोकांनी ८ डिसेंबरला सायंकाळी कळमेश्‍वर पोलीस ठाण्यावर मोर्चा नेऊन ‘भाग्यनगर येथील घटनेप्रमाणे आरोपीला पोलीस चकमकीत ठार मारावे’, अशी मागणी केली, तसेच या घटनेचा राज्य गुन्हे अन्वेषण विभागाच्या (‘सीआयडी’च्या) वतीने अन्वेषण करण्यात यावे, अशीही काही नागरिकांनी मागणी केली आहे.

नाशिक येथील ८ वर्षांच्या बालिकेवर लैंगिक अत्याचार

नाशिक – येथील अंबड भागात ८ वर्षांच्या बालिकेवर लैंगिक अत्याचार झाले. कैलास रामू कोकणी याने बालिकेला ‘कार्टून’ दाखवण्याच्या निमित्ताने स्वत:च्या राहत्या खोलीत नेले. घरात अन्य कोणीही नसल्याचा अपलाभ घेत त्याने खोलीचा दरवाजा आतून बंद करून घेत बालिकेवर बळजोरीने अत्याचार केला. याच वेळी बालिकेच्या आईने तिचा शोध घेतला असता ती संशयित कोकणी याच्या घरात सापडली; मात्र तिच्या अंगावर कपडे नव्हते. भेदरलेल्या मुलीने आईला झालेला प्रकार सांगितला. या वेळी मोठ्या संख्येने जमलेल्या परिसरातील रहिवाशांनी संशयित कोकणी याला चोप दिला. पोलिसांनी संशयित कोकणी याला कह्यात घेतले. पीडित मुलीच्या आईने दिलेल्या तक्रारीवरून कोकणी याच्या विरोधात गुन्हा नोंदवण्यात आला आहे.