मुंबई उच्च न्यायालयाकडून कुख्यात गुंड अरुण गवळी याची जन्मठेपेची शिक्षा कायम

शिवसेनेचे माजी नगरसेवक कमलाकर जामसंडेकर हत्या प्रकरण

मुंबई – शिवसेनेचे माजी नगरसेवक कमलाकर जामसंडेकर यांच्या हत्येप्रकरणी कुख्यात गुंड अरुण गवळी याला विशेष न्यायालयाने दिलेली जन्मठेपेची शिक्षा मुंबई उच्च न्यायालयाने कायम ठेवली आहे. गवळी याने विशेष न्यायालयाच्या निर्णयाला उच्च न्यायालयात आव्हान दिले होते; मात्र न्यायालयाने गवळी याची याचिका फेटाळून लावली. न्यायमूर्ती भूषण धर्माधिकारी आणि न्यायमूर्ती स्वप्ना जोशी यांच्या खंडपिठापुढे ९ डिसेंबर या दिवशी ही सुनावणी झाली.

२ मार्च २००७ या दिवशी मुंबईतील असल्फा भागात माजी नगरसेवक कमलाकर जामसंडेकर यांची घरात घुसून गोळ्या घालून हत्या करण्यात आली होती. अंतर्गत वादातून कमलाकर जामसंडेकर यांच्या हत्येसाठी सदाशिव सुर्वे नावाच्या व्यक्तीने गवळी याला ३० लाख रुपयांची सुपारी दिली होती. यासाठी गवळी याने ‘शूटर’च्या साहाय्याने हत्या केल्याचे पोलीस अन्वेषणात उघड झाले. त्यानंतर पोलिसांनी वर्ष २००८ मध्ये अरुण गवळी याला अटक केली. या प्रकरणी वर्ष २०१२ मध्ये विशेष न्यायालयाने गवळी याला जन्मठेप आणि १४ लाख रुपयांचा दंड अशी शिक्षा दिली होती. त्याच्यावर हत्या, हत्येचा कट रचणे या आरोपांखाली ‘मोक्का’ लावण्यात आला आहे. सध्या अरुण गवळी नागपूर मध्यवर्ती कारागृहात शिक्षा भोगत आहे.