दूध आणि अन्न यांतील भेसळ ओळखण्याच्या प्रशिक्षणाचा शालेय शिक्षणात अंतर्भाव केला जावा !

आरोग्य साहाय्य समितीकडून पुणे येथे विद्या प्राधिकरणाला निवेदन

पुणे, ९ डिसेंबर (वार्ता.) – येथे ७ डिसेंबर या दिवशी हिंदु जनजागृती समितीच्या अंतर्गत आरोग्य सहाय्य समितीच्या वतीने सदाशिव पेठेतील महाराष्ट्र राज्य शैक्षणिक संशोधन आणि प्रशिक्षण परिषद (विद्या प्राधिकरण)चे संचालक श्री. दिनकर पाटील यांना निवेदन देण्यात आले. शालेय अभ्यासक्रमामध्ये दूध आणि अन्य अन्नपदार्थ यांतील भेसळ ओळखण्याचे प्रशिक्षण अंतर्भूत करण्याविषयी हे निवेदन होते. श्री. विद्याधर नारगोलकर यांनी समितीच्या वरील उपक्रमाविना इतर सामाजिक उपक्रमांविषयी श्री. पाटील यांना अवगत केले. त्या वेळी श्री. पाटील यांनी समितीचा वरील उपक्रम चांगला असल्याचे सांगितले. निवेदनाची एक प्रत संचालक बालभारती यांना देण्याविषयी सुचवले. तसेच ‘हे निवेदन येथील समितीच्या बैठकीसमोर चर्चेसाठी ठेवू’, असे आश्‍वासन दिले.

या वेळी पुणे सार्वजनिक सभेचे अध्यक्ष श्री. विद्याधर नारगोलकर, सावरकर विचार मंचचे डॉ. नीलेश लोणकर, राष्ट्रप्रेमी सचिन बनसोडे, हिंदु जनजागृती समितीचे सम्राट देशपांडे आणि कृष्णाजी पाटील उपस्थित होते.

वरील विषयाचे निवेदन बालभारती महाराष्ट्र राज्य पाठ्यपुस्तक निर्मिती मंडळाचे पुणे संचालक श्री. विवेक गोसावी यांना देण्यात आले.

संचालकांच्या वतीने व्यक्तीगत साहाय्यक सचिव श्री. टी.एन्. माळी यांनी निवेदन स्वीकारले. ‘निवेदनातील मागणी योग्य असून प्राथमिक शाळा अभ्यासक्रमातील विद्यार्थ्यांना भेसळीच्या संदर्भात संकेतस्थळावरून माहिती गोळा करण्यास सांगणे म्हणजे भ्रमणभाषचा वापर करण्यास सुचवणे चुकीचे आहे. याविषयी हे अभ्यासक्रमात अंतर्भूत कसे करता येईल, हे पाहू आणि काही लागल्यास तुम्हाला संपर्क करू’, असे ते म्हणाले.