पोलिसांनी महिलांच्या सुरक्षेला प्राधान्य द्यावे ! – नरेंद्र मोदी

पुणे – महिलांवरील अत्याचारांच्या घटना रोखण्यासाठी पोलिसांनी डोळ्यांत तेल घालून काम करावे. ‘देशातील महिलांना सुरक्षित वाटेल’, असे वातावरण निर्माण करण्यासाठी पोलिसांनी प्रभावीपणे प्रयत्न करावेत. महिलांवरील अत्याचारांच्या तक्रारींकडे कानाडोळा करू नये, अशा सूचना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिल्या. ‘आयसर’च्या (भारतीय विज्ञान शिक्षण आणि संशोधन संस्था) आवारात ‘देशांतर्गत सुरक्षा’ या विषयावर ६ ते ८ डिसेंबर या कालावधीत पोलीस महासंचालकांच्या परिषदेचेे आयोजन करण्यात आले होते. त्याच्या समारोपसत्राच्या वेळी ते बोलत होते. या प्रसंगी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा, गृह राज्यमंत्री जी. किशन रेड्डी, नित्यानंद राय यांच्यासह पोलीस आणि गुप्तचर विभागाचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.

या वेळी अमित शहा यांनी काही राज्यांमध्ये ‘अखिल भारतीय पोलीस विद्यापीठ’ आणि ‘अखिल भारतीय फॉरेन्सिक सायन्स विद्यापीठ’ यांची स्थापना करण्यात येणार असल्याची घोषणा केली. तीन दिवसांच्या या परिषदेत आतंकवाद, नक्षलवाद, कट्टरतावाद, किनारपट्टी सुरक्षा, सायबर सुरक्षा, अमली पदार्थ तस्करी यांसारख्या विषयांवर चर्चा करण्यात आली. गुप्तचर यंत्रणांमध्ये उल्लेखनीय कामगिरी करणार्‍या अधिकार्‍यांना नरेंद्र मोदी यांच्या हस्ते गौरवण्यात आले.