बहुपयोगी टाकळा

सूर्योदय आणि सूर्यास्त सांगणारी ‘टाकळा’ वनस्पती

‘टाकळा ही वनस्पती विशेषतः कोकणात प्रसिद्ध आहे. प्रतिवर्षी पावसाळ्यात टाकळीची सहस्रावधी झाडे उगवतात आणि वाढतात. मार्गशीर्ष (डिसेंबर) मास आला की, ही झाडे जागच्या जागी सुकून जातात. याच्या कोवळ्या पाल्याची भाजी, हाच काय तो याचा उपयोग कोकणातील बहुतेकांना ठाऊक आहे. टाकळा ही सूर्यविकासिनी वनस्पती आहे, म्हणजे सूर्यास्ताच्या वेळेस तिची पाने मिटतात आणि सूर्योदयाच्या वेळी ती मोकळी होतात. पावसाच्या दिवसांत ज्या वेळी सूर्य अभ्राच्छादित (ढगांनी झाकलेला) असतो, त्या वेळी खेडेगावांतील लोकांचे टाकळा हे एक घड्याळच आहे. टाकळ्याची पाने मिटू लागली, म्हणजे गुराखी मुले सूर्यास्ताची वेळ जवळ आली, असे समजून आपले गुरांचे कळप घराकडे आणण्याची सिद्धता करतात, तसेच शेतकरी लोक आपली शेतांतील कामे आटोपून घरी येण्याची सिद्धता करू लागतात.

आयुर्वेदानुसार टाकळ्याचे गुणधर्म

टाकळ्याच्या अंगी कफ, त्वचेचे विकार, कृमी (जंत), श्‍वास (दमा), ताप, मेह (मधुमेह), खोकला आदी विकार दूर करण्याचे गुण आहेत.

कॉफीला पर्याय – टाकळ्याचे बी

अंगातील सुस्ती आणि आळस घालवून रक्तवृद्धी करण्यासाठी आणि जागरणापासून होणारे त्रास न्यून करण्यासाठी टाकळ्याच्या बियांचा उपयोग होतो. कार्तिक आणि मार्गशीर्ष (नोव्हेंबर आणि डिसेंबर) या मासांच्या काळात टाकळ्याची झाडे वाळू लागतात. त्या वेळी ही झाडे कापून आणावीत. ही झाडे उपटू नयेत; कारण उपटल्याने टाकळ्याच्या शेंगा जास्त वाळलेल्या असल्यास आतील बी गळून खाली पडण्याचा संभव असतो. नंतर ही झाडे दोन-चार दिवस उन्हात सुकू द्यावीत. सुकल्यानंतर ती झाडे मोठ्या ताडपत्र्यावर अंथरून दांड्याने त्यांच्या शेंगा झोडपाव्यात, म्हणजे शेंगांतील बिया खाली पडतात. त्या गोळा करून एक-दोन दिवस उन्हात वाळवाव्या, म्हणजे त्यांच्या अंगचा दमटपणा जाऊन त्या चांगल्या टिकाऊ बनतात. हे बी कॉफीच्या बियांप्रमाणे तुपात तळून त्याची बारीक भुकटी करावी आणि ज्या वेळी कॉफी करायची असेल, त्या वेळी ही भुकटी पाण्यात चांगली उकळून त्यात दूध, साखर, जायफळ इत्यादी घालून गाळून घ्यावी. हा टाकळीचा अर्क चवीला कॉफीप्रमाणे असून फार गुणकारी आहे. अशा रितीने टाकळीचे बी उपयोगात आणता येते. बी काढून घेतल्यानंतर जी झाडांची खोडे राहतात, त्यांचा सरपणाप्रमाणे जळणाच्या कामी उपयोग होतो.’

(संदर्भ : व्यवहारोपयोगी वनस्पतीवर्णन, लेखक – गणेश रंगनाथ दिघे, वर्ष १९१३)