चिखलगाव येथे ‘हिंदु राष्ट्र-जागृती सभा’ पार पडली

चिखलगाव (वणी), ९ डिसेंबर (वार्ता.)  येथील विदेही संत शंकरबाबा देवस्थानात यवतमाळ जिल्ह्यातील पहिली हिंदु राष्ट्र-जागृती सभा पार पडली. सभेच्या आरंभी हिंदु जनजागृती समितीचे श्री. दत्तात्रेय फोकमारे आणि श्री. लहू खामणकर यांनी दीपप्रज्वलन केले. श्री. लहू खामणकर यांनी ‘साधना आणि हिंदु राष्ट्र स्थापनेची आवश्यकता’ हा विषय मांडला, तर श्री. दत्तात्रेय फोकमारे यांनी ‘हिंदु राष्ट्र-जागृती सभे’चा हेतू सांगितला. पुरोहित श्री. दत्ताभाऊ पांडे यांनी पुष्पगुच्छ देऊन दोन्ही वक्त्यांचा सत्कार केला. सभेचे सूत्रसंचालन आणि आभार प्रदर्शन श्री. प्रवीण ढेंगळे यांनी केले.

सभेला १०० धर्माभिमानी उपस्थित होते. उपस्थित महिलांनी सत्संग घेण्याची मागणी केली. सभा संपेपर्यंत सर्वांनी बसून विषय ऐकला. ग्रामपंचायत सदस्य आणि केबलचे चालक श्री. संजय झाडे यांनी समितीच्या कार्यासाठी साहाय्य करणार असल्याचे सांगितले. सभास्थळी लावण्यात आलेल्या सात्त्विक उत्पादने आणि ग्रंथ यांच्या प्रदर्शनास उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला.