मंदिरांच्या सुव्यवस्थापनाला भक्तांची विचारधाराच पोषक !

श्री तुळजाभवानी मंदिर संस्थानमधील देवीचे दागिने गहाळ प्रकरणाचा १०५ पृष्ठांचा अहवाल त्रिसदस्यीय समितीने जिल्हाधिकार्‍यांना नुकताच सादर केला. मंदिर संस्थानच्या धार्मिक व्यवस्थापक पदाचा पदभार हस्तांतर करतांना ‘रजिस्टर’मध्ये नोंद असलेल्या अनेक मौल्यवान वस्तू गहाळ झाल्याची तक्रार पुजारी मंडळाचे माजी अध्यक्ष आणि देवीचे पुजारी किशोर गंगणे यांनी केली होती. याविषयी ५ मास चौकशी केल्यानंतर या तक्रारीतील अनेक सूत्रांमध्ये तथ्य असल्याचे समोर आले आहे. यामध्ये श्री तुळजाभवानी मंदिरातील देवीच्या अंगावरील मौल्यवान माणिक, २ चांदीचे खडावा आणि विविध राजे-रजवाड्यांनी दिलेली ७१ पुरातन नाणी मंदिर संस्थानचे अधिकारी आणि कर्मचारी यांनी गहाळ केली आहेत.

श्री तुळजाभवानी देवस्थानामध्ये मागील १८ वर्षांपासून कार्यरत असलेले साहाय्यक धार्मिक व्यवस्थापक दिलीप नाईकवाडी यांनी सेवानिवृत्तीनंतर त्यांच्याकडील पदभार नूतन धार्मिक व्यवस्थापक एस्.एस्. इंतुले यांच्याकडे १६ ऑगस्ट २०१८ या दिवशी सोपवला होता. नाईकवाडी यांनी मौल्यवान वस्तूंविषयी कोणताही कायदेशीर पदभार नसतांना मौल्यवान वस्तू हाताळल्या आहेत, तसेच खजिना पेटीच्या ११ चाव्यांपैकी ३ चाव्या हरवल्या असल्याचे अहवालात नोंद करण्यात आले आहे. त्यामुळे कोणी कितीही खोटेपणा केला, तरी देवाच्या दारात सत्य कधी ना कधी समोर येतेच आणि ते समोर आलेही ! आता संबंधितांवर कठोर कारवाई होणे आवश्यक आहे.

मंदिर संस्थानचे अधिकारी आणि कर्मचारी यांचा सावळागोंधळ पाहता मंदिर संस्थानमध्ये पुष्कळ मोठ्या प्रमाणात मनमानी कारभार चालू असल्याचे चित्र स्पष्ट झाले आहे. हा सावळागोंधळ गंगणे यांनी केलेल्या तक्रारीनंतर समोर आला; पण याआधी हा सर्व प्रकार कोणाच्याच लक्षात आला नाही का ? कि त्याकडे जाणूनबुजून दुर्लक्ष केले गेले ?, मंदिर संस्थानचा खजिना प्रतिवर्षी अद्ययावत केला जात नाही का ?, असे अनेक प्रश्‍न भाविकांच्या मनामध्ये निर्माण होत आहेत. श्री तुळजाभवानी देवीला भाविकांनी श्रद्धेने दिलेल्या दागिन्यांमध्ये वाढ होण्याऐवजी उलट घटच झाली आहे. हा प्रकार अत्यंत निषेधार्ह आहे. विदेशातील अनेक हिंदू तेथील हिंदु मंदिरांचे योग्य प्रकारे व्यवस्थापन सांभाळत आहेत; मात्र बहुसंख्य हिंदू असणार्‍या भारतात मंदिरांमध्ये अनागोंदी कारभार चालू आहे. यासाठी संबंधितांवर योग्य कारवाई होणे आवश्यक आहे. मंदिराचा व्यवस्थापक देवीभक्त असेल, तर तो मनोभावे मंदिराचा सांभाळ करू शकतो, हेही तितकेच खरे. पगारी पुजारी किंवा व्यवस्थापक ‘स्वत:ला काय लाभ होईल’ एवढाच स्वार्थी विचार करतात, असेच या आणि आतापर्यंत घडलेल्या घटनांवरून लक्षात येते. भक्त मात्र ‘मंदिरासाठी मी अजून काय करू’, असा विचार करतो. मंदिरांच्या सुव्यवस्थापनाला भक्तांची विचारधाराच पोषक आहे. विचारांमधील हा भेद पाहून मंदिरे भक्तांच्या कह्यात असायला हवीत, असेच भाविकांना वाटते !

– श्रीमती वर्षा कुलकर्णी, सोलापूर