निमंत्रणपत्रिकेवर होणारा ६० लाख रुपयांचा व्यय टाळा !

  • श्री साईबाबा संस्थानला मुंबई उच्च न्यायालयाची सूचना

  • ५० ते ६० लाख रुपयांचा व्यय टळणार

  • हे न्यायालयाला का सांगावे लागते ? संस्थानला का कळत नाही ? भक्तांनी सरकारीकरण झालेल्या मंदिरांमध्ये श्रद्धेने केलेल्या अर्पणाचा अशा प्रकारे अपव्यय होतो, हेच यातून लक्षात येते !
  • अशी उधळपट्टी पूर्वी झाली असेल, तर संबंधितांकडून ती रक्कम वसूल केली पाहिजे !
  • ‘सरकारीकरण झालेल्या अन्य मंदिरांमध्ये असे काही चालू आहे का ?’ याचाही शोध सरकारने घ्यावा, अशी भक्तांची अपेक्षा आहे !
(प्रतिकात्मक चित्र)

संभाजीनगर – श्री साईबाबा संस्थानासंबंधी मुंबई उच्च न्यायालयाच्या संभाजीनगर खंडपिठामध्ये चालू असलेल्या सुनावणीच्या वेळी खंडपिठाने निमंत्रणपत्रिकेवर होणारा व्यय टाळण्याच्या सूचना संस्थानला दिल्या आहेत. या सूचनेमुळे ५० ते ६० लाख रुपये व्यय टाळता येणार आहे. संगणकीय पत्र, संदेश, सामाजिक माध्यमे यांचा वापर करून पत्रिका पाठवण्यावर भर दिला जावा, अशी अपेक्षा खंडपिठाने व्यक्त केली आहे, तसेच ग्रामीण भागांत साध्या कागदावर पत्रिका छापून पाठवावी आणि जिल्ह्यातील स्थानिक वृत्तपत्रांत विज्ञापनांद्वारे निमंत्रणपत्रिका पाठवण्यास प्राथमिकता द्यावी, असेही खंडपिठाने सुनावणीप्रसंगी स्पष्ट केले.

शिर्डी येथील श्री साईबाबा संस्थानचे भक्त परराज्यांसह विदेशांतही आहेत. या भाविकांना रामनवमी, दसरा, गुरुपौर्णिमा आदी दिवसांसाठी छापलेल्या पत्रिका पाठवण्यासाठी आजपर्यंत ५० ते ६० लाख रुपये व्यय होत होता.