‘#SaveTirupatiFromMissionaries’ हा हॅशटॅग राष्ट्रीय ट्रेंडमध्ये प्रथम स्थानी !

तिरुमला तिरुपती देवस्थानाचे ख्रिस्तीकरण रोखा ! – धर्मप्रेमी हिंदूंची टि्वटरवर मागणी

मुंबई – आंध्रप्रदेश येथील हिंदूंचे प्रसिद्ध श्रद्धास्थान असलेल्या तिरुमला तिरुपती देवस्थानात ख्रिस्ती धर्माचा प्रसार करणार्‍या अनेक घटना घडत आल्या आहेत. याचाच विरोध म्हणून ४ डिसेंबर २०१९ या दिवशी धर्मप्रेमी हिंदु, तसेच बालाजीचे भक्त यांनी टि्वटरवर ‘#SaveTirupatiFromMissionaries’ हा टि्वटर ट्रेंड (एखाद्या विषयावर ट्विटरवर घडवून आणलेली चर्चा) यशस्वी केला. यामध्ये तिरुपती देवस्थानात ख्रिस्ती धर्मीय कशा प्रकारे त्यांच्या धर्माचा प्रसार करत आहेत, याविषयी जागरूकता करणार्‍या ट्वीटस् धर्मप्रेमींकडून करण्यात आल्या. तसेच तिरुपती देवस्थानात अहिंदु कर्मचार्‍यांची नेमणूक करण्याचा आणि मंदिर सरकारीकरण केल्याचा हा परिणाम आहे, असे अनेकांनी त्यांचे मत ट्वीटद्वारे व्यक्त केले. हा ट्रेंड थोड्याच कालावधीत प्रथम स्थानी पोचला. काही वेळाने तो द्वितीय स्थानी स्थिरावला. सुमारे २ घंटे तो द्वितीय स्थानी कायम होता. शेवटचे वृत्त हाती येईपर्यंत ३० सहस्रांहून अधिक लोकांनी या ट्रेंडमध्ये ट्वीट केले होते.

तिरुमला तिरुपती देवस्थानचे ख्रिस्तीकरण होत असल्याची उदाहरणे !

१. काही दिवसांपूर्वीच तिरुमला तिरुपती देवस्थानाच्या संकेतस्थळावरून ख्रिस्ती प्रार्थनेचा प्रसार होत असल्याचे निदर्शनास आले होते. हिंदुत्वनिष्ठांच्या विरोधानंतर ती प्रार्थना काढण्यात आली; परंतु यात प्रश्‍न असा उपस्थित होतो की, हिंदु देवस्थानाच्या संकेतस्थळावरून ख्रिस्ती प्रार्थना कशी काय प्रसारित झाली ?

२. याआधीही देवस्थानाच्या संकेतस्थळावर एका धार्मिक पुस्तिकेची ‘पी.डी.एफ्.’ अपलोड करण्यात आली होती. यामध्येही येशू ख्रिस्ताचा उल्लेख असल्याचे आढळून आले होते.

३. आंध्रप्रदेश वाहतूक मंडळाकडून तिरुमला ते तिरुपती बस सुविधा उपलब्ध करण्यात आली आहे. यातून प्रवास करणार्‍यांना देण्यात येणार्‍या तिकिटांच्या मागे जेरूसलेम यात्रेचे विज्ञापन प्रकाशित करण्यात आले होते. ‘या सर्व घटना बघता तिरुपती येथे ख्रिस्ती धर्माचा प्रसार वाढीस लागला आहे’, असे भाविकांकडून सांगण्यात येत आहे. (यावरून तिरुमला तिरुपती देवस्थानाचे ख्रिस्तीकरण करण्याचा पद्धतशीरपणे घाट घालण्यात आला आहे, हेच दिसून येते ! – संपादक)

४. मे २०१८ मध्ये तिरुपती देवस्थानाच्या कारभारात मोठा घोटाळा होत असल्याचे तेथील पुजार्‍याने सांगितले होते.