कतरासगड (झारखंड) येथील संजय चौरसिया यांनी गाठली ६१ टक्के आध्यात्मिक पातळी

श्री. संजय चौरसिया यांचा श्रीकृष्णाची प्रतिमा देऊन सत्कार करतांना पू. (सौ.) सुनीता खेमका

झारखंड – कतरासगड, झारखंड येथील श्री. संजय चौरसिया यांनी ६१ टक्के आध्यात्मिक पातळी गाठून ते जन्म-मृत्यूच्या फेर्‍यांतून मुक्त झाल्याचे २८ नोव्हेंबर या दिवशी एका सत्संग सोहळ्यात घोषित करण्यात आले. या सोहळ्यात सनातन संस्थेचे धर्मप्रचारक पू. प्रदीप खेमका यांनी स्वतःचा साधनाप्रवास सांगतांना त्यांच्या आस्थापनात नोकरी करणार्‍या त्यांच्या सहकार्‍यांचीही वैशिष्ट्ये सांगितली. त्या वेळी पू. खेमका यांनी त्यांचे सहकारी श्री. संजय चौरसिया यांची वैशिष्ट्ये सांगत त्यांनी ६१ टक्के आध्यात्मिक पातळी गाठल्याचे घोषित केले. या वेळी सनातनच्या संत पू. (सौ.) सुनीता खेमका यांनी श्री. चौरसिया यांचा श्रीकृष्णाची प्रतिमा देऊन सत्कार केला.

श्री. संजय चौरसिया यांची जाणवलेली गुणवैशिष्ट्ये

श्री. संजय चौरसिया

श्री. संजय चौरसिया हे सनातन संस्थेचे संत पू. प्रदीप खेमका यांच्याकडे मागील १५ वर्षांपासून नोकरी करत आहेत. ‘सनातनच्या सात्त्विक उत्पादनांची मागणी घेऊन त्यांचा पुरवठा करणे आणि त्यांचा लेखी हिशोब ठेवणे’, या सेवा ते करतात, तसेच ते हिंदी पाक्षिक ‘सनातन प्रभात’च्या ९७ अंकांचे वितरणही करतात. पू. (सौ.) सुनीता खेमका आणि श्री. शंभू गवारे यांना जाणवलेली त्यांची गुणवैशिष्ट्ये पुढे दिली आहेत.

१. कार्यपद्धतीचे पालन करणे

श्री. शंभू गवारे

‘श्री. संजय यांचा सर्वांप्रती एकसमान भाव असतो. त्यांच्या मनामध्ये ‘कार्यपद्धतीचे पालन केल्याने चुका होत नाही’, असा विचार असतो. यासाठी ते सर्वांना ‘कार्यपद्धतीचे पालन करायला हवे’, असे सांगत असतात. ते आमच्या घरी सात्त्विक उत्पादने पाठवतात, तेव्हा कार्यपद्धतीही लिहून देतात, तसेच पैशांचा हिशोबही परिपूर्ण करतात. त्यांनी केलेल्या उत्पादनांच्या देवाण-घेवाणीमधील हिशोबामध्ये गोंधळ नसतो.’ – (पू.) सौ. सुनीता खेमका, कतरास, झारखंड.

२. तत्परता

‘एकदा मी त्यांच्याकडे उदबत्तीची मागणी केली होती आणि त्यांना सांगितले, ‘‘तातडी नाही. एक-दोन दिवसांत दिल्यात, तरी चालेल.’’ तरीही त्यांनी सांगितले, ‘‘तुम्ही मागणी दिली आहे ना, तर तुम्हाला आजच्या आजच साहित्य मिळायला हवे.’’ त्याप्रमाणे त्यांनी काही घंट्यांतच उदबत्ती आणून दिली.

३. आज्ञापालन

त्यांना काही वर्षांपूर्वी सद्गुरु (डॉ.) चारुदत्त पिंगळेकाका यांनी त्यांच्या सेवेमध्ये कार्यपद्धतीचे पालन करण्याच्या हेतूने मार्गदर्शनपर सूत्रे सांगितली होती. तेव्हापासून ‘त्या अनुषंगाने एखाद्या साधकाकडून चूक होऊ शकते’, असे लक्षात आल्यावर संजयदादा त्वरित सांगतात, ‘‘दादा, चूक होऊ शकते. सद्गुरूंनी जे सांगितले आहे, त्याचे पालन व्हायला हवे. तुम्ही त्या संबंधित साधकाशी बोला.’’

४. ऐकण्याची आणि शिकण्याची वृत्ती

एका सेवेमध्ये मी संजयदादांना सांगितले, ‘‘आपण हिशोब ठेवता, त्यामध्ये पालट करण्याची आवश्यकता आहे. अन्य ठिकाणी साधक असे करत नाहीत.’’ ‘हिशोब कशा प्रकारे करू शकतो ?’, हे मी त्यांना समजावून सांगितले. दुसर्‍या दिवशी काही सेवेनिमित्त मी त्यांच्या सेवेच्या ठिकाणी गेलो होतो. तेव्हा दादांनी सांगितल्याप्रमाणे कृती करण्यास आरंभ केला होता.’

– श्री. शंभू गवारे, कतरास, झारखंड.

श्री. संजय चौरसिया यांच्यामध्ये जाणवलेला पालट

पू. (सौ.) सुनीता खेमका

पूर्वी सेवा सांगितल्यावर ताण येणे, पू. खेमकादादांनी सांगितले आहे; म्हणून सेवा करणे अन् आता सेवा सांगितल्यावर ती परिपूर्ण होण्यासाठी प्रयत्न करणे : ‘पूर्वी कुणी काही बोलले, तर त्यांना ताण यायचा. त्यांच्या मनामध्ये ‘कसे होईल ?’, असा विचार असायचा; परंतु तरीही ते कृती करत होते. ती कृती करण्यामागे ‘पू. खेमकादादांनी सांगितले आहे आणि आपण येथे नोकरी करतो’, असे विचार त्यांच्या मनामध्ये असायचे. आता त्यांना कोणतीही सेवा मिळाल्यावर ‘ही सेवा परिपूर्ण कशी होईल ?’, असा त्यांचा भाव असतो. कोणतीही मागणी असेल, तर ते वेळेत पाठवण्याचा प्रयत्न करतात. ‘साधकांना वेळेत साहित्य मिळाले, तर त्यांची सेवा वेळेत चालू होईल’, असा त्यांचा विचार असतो.’

– (पू.) सौ. सुनीता खेमका (१.९.२०१९)