गोधनाच्या उत्पादनामुळे नूतन अर्थव्यवस्था निर्माण होऊ शकते ! – डॉ. वल्लभभाई कथीरिया, अध्यक्ष, कामधेनु आयोग

डॉ. वल्लभभाई कथीरिया मार्गदर्शन करतांना

पुणे – गोमूत्र आणि गायीचे शेण यांपासून निर्माण होणार्‍या उत्पादनांची संख्या लक्षात घेता गायीचे दूध हे एक उपउत्पादन मानावे लागेल. गोधनाला केंद्रस्थानी ठेवून संशोधन आणि उत्पादन निर्मितीचे काम हाती घेतले, तर एक नूतन अर्थव्यवस्था निर्माण होऊ शकते, एवढी क्षमता गोधनामध्ये आहे, असे मत राष्ट्रीय कामधेनु आयोगाचे अध्यक्ष डॉ. वल्लभभाई कथीरिया यांनी व्यक्त केले. कामधेनु  सेवा प्रतिष्ठानच्या वतीने २९ नोव्हेंबर ते १ डिसेंबर २०१९ या कालावधीत बालेवाडी येथे आयोजित ‘वर्ल्ड काऊ कॉन्फरन्स अ‍ॅण्ड अ‍ॅग्री एक्स्पो’मध्ये (देशी गोवंश जागतिक परिषद) ते बोलत होते. त्या वेळी व्यासपिठावर परिषदेचे अध्यक्ष ज्येष्ठ शास्त्रज्ञ डॉ.विजय भटकर, नागपूर गोविज्ञान केंद्राचे सुनील मानसिंहका, भारतातील सर्वांत मोठ्या गोशाळेचे संचालक महंत रवींद्रानंद सरस्वती महाराज, मथुरा वृंदावनचे सुहास महाराज, प्रा. नितीन मर्कंडेय, जैविक जीवनशैली विज्ञानचे ताराचंद बेलची, कन्हेरी मठाचे मठाधिपती काडसिद्धेश्‍वर महाराज, ईस्कॉनचे विश्‍वस्त संजय भोसले अन् डॉ. जनार्दन चितोडे, कामधेनु  सेवा प्रतिष्ठानचे अध्यक्ष विवेक रत्नपारखी, उपाध्यक्ष विजय ठुबे, सचिव समीर देवधर आदी मान्यवर उपस्थित होते. उपस्थित मान्यवरांच्या हस्ते अग्निहोत्र प्रज्वलीत करून परिषदेचे उद्घाटन करण्यात आले. प्रतिष्ठानचे उपाध्यक्ष विजय ठुबे यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक केले. मिलिंद कुलकर्णी यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले. या परिषदेनिमित्त आयोजित गो-प्रदर्शनामध्ये भारतातील ३० जातीवंत देशी गोवंश पाहायला मिळाले. त्यांच्याविषयीची सविस्तर माहिती विविध माध्यमांद्दारे दिली गेली.

डॉ. कथीरिया पुढे म्हणाले,

१. गोधनाचे महत्त्व युवकांपर्यंत पोचवण्यासाठी त्याची उपयुक्तता वैज्ञानिक कसोटीवर सिद्ध करावी लागेल. आजपर्यंतच्या अनेक पिढ्यांचे गोधनाशी श्रद्धा आणि भावना या स्वरूपाचे नाते होते; मात्र २१ व्या शतकातील विज्ञान-तंत्रज्ञानाचा वापर करणार्‍या नवीन पिढीला वैज्ञानिक कसोटीवर गोधनाचे महत्त्व पटवून दिल्यास गोसेवा क्षेत्रात युवा उद्योजक सक्रीय होण्यास हातभार लागेल.

२. गोधनाला केंद्रस्थानी ठेवून देशभरातल्या पांजरपोळ, गोशाळा, आयआयटी अशा ठिकाणी सध्या विविध स्तरांवर कार्य चालू आहे. या सर्व संस्थांचे एक जाळे निर्माण करून त्यांच्याकडून आलेल्या सूचनांचे संकलन करून शासनाकडे पाठवले जाईल. भ्रमणभाषमध्ये गायीच्या शेणापासून सिद्ध केलेल्या ‘चीप’चा वापर केला, तर भ्रमणभाषमधील किरणोत्सर्गाचे प्रमाण ६० टक्क्यांनी न्यून होते, असे वैज्ञानिकदृष्ट्या सिद्ध झाले आहे.

गोमाता म्हणजे अध्यात्म आणि विज्ञानाचा केंद्रबिंदू ! – डॉ. विजय भटकर

ज्येष्ठ शास्त्रज्ञ डॉ. विजय भटकर मार्गदर्शन करतांना

भारतीय संस्कृती गीता आणि गोमाता या दोन घटकांभोवती गुंफलेली आहे. ‘वातावरणातील पालट’ या एका प्रश्‍नाने सध्या सर्व जगाला वेठीस धरले असून याचे उत्तर शोधण्याचा प्रयत्न जगभरातील वैज्ञानिक करत आहेत. हा प्रश्‍न सोडवण्याचे शाश्‍वत उत्तर केवळ भारताकडे आहे. ‘वातावरणातील पालटामुळे सर्व मानवजात नष्ट होईल’, अशी भाकीते जगभरातील वैज्ञानिकांनी केली. आयआयटीसारख्या महत्त्वपूर्ण संस्था आता गोधनासंदर्भात संशोधन करत आहेत. आपण खातो, ते अन्न विषयुक्त आहे. त्यामुळे कर्करोगासारख्या अनेक व्याधींचे प्रमाण वाढले आहे. त्यावर उपाय म्हणून सेंद्रिय शेतीचा अवलंब केला, तर हेच विषयुक्त अन्न विषमुक्त होईल आणि आपल्या अनेक पिढ्यांना त्याचा लाभ होईल. आंतरराष्ट्रीय पातळीवरही गो-चिकित्सेला मान्यता मिळत आहे. युरोपातील लोक संशोधन करण्यासाठी भारतीय गायींना तिकडे नेत आहेत. ‘आंतरराष्ट्रीय परिषदांमधून गोधनाची उपयुक्तता आणि त्याचा मानवी जीवनावर होणारा सकारात्मक परिणाम’ यांविषयी शोधनिबंध दिले जातात. अध्यात्म आणि विज्ञान यांचा केंद्रबिंदू गोमाता आहे. या दोन्हींच्या संयोगातून वाटचाल केल्यास भारत विश्‍वगुरु होईल.

परिषदेतील प्रदर्शनाची वैशिष्ट्ये

परिषदेत अनेक राज्यांमधील वेगवेगळ्या देशी गायींचे प्रदर्शन, बकरी इतक्या उंचीची पागनूर जातीची गाय, गायींविषयी वैज्ञानिक माहिती, गोपालन विषय माहिती दालन, गाय आणि आरोग्य विषय माहिती, अमेरिकी तज्ञांद्वारे मार्गदर्शन, गायीच्या उत्तम वानांची निवड अन् पैदास तंत्रज्ञान आणि त्याचा वापर यांची माहिती, चारा पिके महत्त्व अन् उत्पादन महत्त्व माहिती अशा स्वरूपाचे प्रदर्शन भरवण्यात आले होते. या प्रदर्शनाचा स्थानिक नागरिकांनी उत्स्फूर्तपणे लाभ घेतला.