गीताज्ञानदर्शन

सनातनचे ज्ञानयोगी संत पू. अनंत बाळाजी आठवले ह्यांच्या ‘गीताज्ञानदर्शन’ ह्या सनातनच्या ग्रंथसंपदेतील ग्रंथातील मजकूर क्रमश: प्रसिद्ध करत आहोत.

अनंत आठवले

॥ श्रीकृष्णाय नम: ॥

त्रिगुणांचे अधिक विवेचन, वर्णानुसार कर्मे आणि त्यांचे महत्त्व, तसेच कोणत्याही साधनेने पराभक्ती (ब्रह्माशी अभिन्नता) प्राप्त होते, हे सांगणारा

अध्याय १८ – मोक्षसंन्यासयोग

अध्याय १४ आणि १७ मध्ये वर्णित त्रिगुणांचे अधिक विवरण या अध्यायातही आहे.

१. तत्त्वज्ञान

१ अ. त्याग : काही पंडीत सकाम कर्मांच्या त्यागाला ‘संन्यास’ म्हणतात, तर काही विचारवंत सर्व कर्मांच्या फळांच्या त्यागाला ‘त्याग’ म्हणतात. (अध्याय १८, श्‍लोक २)

१ आ. सत्कर्मे फळांचा त्याग करून करणे : ‘यज्ञ, दान आणि तप ही कर्मे मनुष्याला पवित्र करतात; म्हणून त्यांचा त्याग करू नये’, असा आपला निर्णय असल्याचे श्रीकृष्णांनी सांगितले आहे. पुढे ते म्हणतात, ‘ही कर्मेही त्यांच्यातील आसक्ती आणि त्यांच्या फळांचा त्याग करून करावीत.’ (अध्याय १८, श्‍लोक ५ आणि ६)

१ इ. त्यागाचे प्रकार

१ इ १. तामसी : शास्त्रसंमत नित्य कर्मांचा संन्यासाच्या मोहाने (अज्ञानाने) त्याग करणे (शास्त्रविहित कर्मे चित्तशुद्धी करत असल्याने त्यांच्या त्यागाचा निषेध केला आहे.) (अध्याय १८, श्‍लोक ७)

१ इ २. राजसी : ‘कर्मांनी दुःखच होते’, असे मानून शरीराला कष्ट नकोत; म्हणून कार्य न करणे (अध्याय १८, श्‍लोक ८)

१ इ ३. सात्त्विक : शास्त्रविहित कर्मे कर्तव्य म्हणून, आसक्ती आणि फळ यांचा त्याग करून करणे (अध्याय १८, श्‍लोक ९)

१ ई. कर्म आणि कर्माचे फळ

१ ई १. कर्माचे फळ मिळणे वा न मिळणे : त्याग न करणार्‍यांना अनिष्ट, इष्ट आणि मिश्र अशी फळे मिळतात. आसक्ती आणि कर्तेपणाचा अभिमान यांचा त्याग करणार्‍यांना कर्मांचे फळ नसते. (अध्याय १८, श्‍लोक १२)

१ ई २. कोणतेही कर्म सिद्ध होण्यासाठी पाच कारणे आवश्यक असल्याने स्वतःलाच कर्ता मानणे अयोग्य ! : सर्व कर्मे सिद्ध होण्यासाठी, म्हणजे घडण्यासाठी अधिष्ठान (आधार, आश्रय), कर्ता, करण (साधन), वेगवेगळे प्रयत्न आणि दैव ही पाच कारणे असतात; म्हणून केवळ स्वतःला कर्ता मानणे अयोग्य आहे (अध्याय १८, श्‍लोक १३ ते १६) विषय स्पष्ट करण्यासाठी शेतीचे उदाहरण घेऊ. येथे शेत हे अधिष्ठान; शेतकरी हा कर्ता; नांगर हे करण; नांगर चालवणे आणि पाणी देणे हे प्रयत्न आहेत. वेळेवर पुरेसा पाऊस पडणे, पिकांवर कीड न पडणे इत्यादी सर्वच दैवाच्या अधीन आहे. म्हणून केवळ स्वतःला कर्ता मानणे अयोग्य आहे. (अध्याय १८, श्‍लोक १३ ते १६)

केवळ मनुष्याच्या देहाचा विचार केला, तर शरीर हे अधिष्ठान, जीवात्मा हा कर्ता; पाच ज्ञानेंद्रिये, पाच कर्मेंद्रिये, मन, बुद्धी आणि अहंकार हे करण; प्रयत्न ही चेष्टा आणि प्रारब्ध हे दैव आहे.

१ ई ३. कर्तेपणा नसणार्‍याला पाप न लागणे : ज्याच्यात कर्तेपणाचा भाव नाही आणि ज्याची बुद्धी सांसारिक पदार्थ अन् कर्म यांपासून अलिप्त आहे, त्याला कुठल्याही कर्माचे फळ, अगदी हातून घडलेल्या हत्येचे पापसुद्धा, बांधत नाही. (अध्याय १८, श्‍लोक १७)

१ ई ४. कर्माचे प्रेरक : ज्ञाता (जाणणारा), ज्ञान आणि ज्ञेय (जाणण्यास योग्य) हे कर्माचे प्रेरक आहेत. (अध्याय १८, श्‍लोक १८)

१ ई ५. कर्मसंग्रह : करण, कर्म आणि कर्ता हे कर्मसंग्रह आहेत. यांच्या संयोगाने कर्म होते. (अध्याय १८, श्‍लोक १८)

(क्रमश:)

॥ श्रीकृष्णार्पणमस्तु ॥

संदर्भ : सनातनचे प्रकाशन ‘गीताज्ञानदर्शन’