‘चंद्रयान २’च्या ‘विक्रम लँडर’चा ठावठिकाणा नासाने शोधला

नवी देहली – भारतासाठी अत्यंत महत्त्वाची असलेली चंद्रयान-२ मोहीम अखेरच्या टप्प्यात अपयशी ठरली. चंद्रापासून २.१ कि.मी. उंचीवर असतांनाच शेवटच्या टप्प्यात अचानक ‘विक्रम लँडर’चा नियंत्रण कक्षाशी संपर्क तुटला. तेव्हापासून विक्रम लँडरचे ठावठिकाणा शोधण्याचे प्रयत्न चालू होते. शेवटी विक्रम लँडरचा शोध अमेरिकेची अंतराळ संशोधन संस्था ‘नासा’ने घेतला आहे. अमेरिकेच्या ‘ऑर्बिटरच्या कॅमेर्‍या’ने चंद्राच्या दक्षिण पृष्ठाकडील छायाचित्रे ‘ट्वीट’द्वारे प्रसारित केली आहेत. त्या छायाचित्रामध्ये चंद्राच्या भूपृष्ठावर विक्रम लँडरचे अवशेष दिसत आहेत.

विक्रम लँडर शोधण्यात भारतीय युवकाची मुख्य भूमिका

अमेरिकेची अंतराळ संशोधन संस्था ‘नासा’ला भारतीय ‘विक्रम लँडर’ सापडले असले, तरी ते शोधण्यामध्ये चेन्नईमधील इंजिनिअर शानमुगा सुब्रह्मण्यम् या युवकाने मुख्य भूमिका बजावली आहे. शानमुगा याने ‘नासा’ने काढलेल्या छायाचित्रांचे व्यवस्थित निरीक्षण करत दुर्घटनाग्रस्त झालेल्या ‘चंद्रयान २’च्या विक्रम लँडरचा ठावठिकाणा मिळवला आहे. यानंतर त्याने नासाला यासंबंधी माहिती दिली. काही वेळाने नासाने अधिकृतपणे याला दुजोरा दिला. याविषयी नासाने शानमुगा सुब्रह्मण्यम् यांचे आभार मानत कौतुकही केले आहे. शानमुगा सुब्रह्मण्यम् मॅकेनिकल इंजिनिअर आणि ‘कॉम्प्युटर प्रोगॅमर’ आहे. सध्या ते चेन्नईमधील ‘लेनॉक्स इंडिया टेक्नॉलॉजी सेंटर’मध्ये ‘टेक्निकल आर्किटेक्ट’ म्हणून काम करत आहेत.