जागृती चालूच राहील !

संपादकीय

सध्याच्या सर्वांत प्रभावी आणि जनमानसावर मोहिनी घालणार्‍या चित्रपटाच्या माध्यमातून होणारे हिंदूंच्या श्रद्धास्थानांचे विडंबन सजग हिंदूंनी कितीही विरोध केला, तरीही अद्याप थांबत नाही. अभिनेते सलमान खान यांची निर्मिती असलेल्या ‘दबंग ३’  चित्रपटातून पुन्हा एकदा साधू-संतांना पाश्‍चात्त्य संगीताच्या तालावर हिडिस नृत्य करतांना दाखवण्यात आले आहे. हिंदूंचा विरोध चालू झाल्यावर त्याला सलमान खान आणि त्याच्याच पंथाची नृत्य दिग्दर्शिका शबीना खान या दोघांनी दिलेले उत्तर सामान्य श्रद्धाळू हिंदूला चीड आणणारे आहे. वर्ष १९६० पासून चित्रपटांतून झालेला हिंदूंच्या श्रद्धास्थानांचा अवमान आणि विडंबन यांच्या उदाहरणांची सूची मोठी आहे. ‘हे नियोजनबद्ध किंवा जाणूनबुजून होत आहे का ?’, या आरोपाला पुष्टी देणारे हे उत्तर आहे. सलमान खान यांनी ‘हिट अँड रन’ प्रकरणात जेवढ्या बेदरकारपणे गाडी चालवली असेल, तेवढ्याच बेमुवर्तखोरपणे त्यांनी उत्तर दिले आहे. ‘हे साधू नाहीत, तर नाचणार्‍यांनी तसा पोशाख केला आहे’, असे उत्तर देणारे खान हिंदूंना मूर्ख समजत आहेत का ? असे आहे, तर नाचणार्‍यांनी मुल्ला मौलवींचा पोशाख का केला नाही ? कारण ‘हिंदु सहिष्णु आहेत’, ‘हेच याचे उत्तर आहे’, असे नाईलाजाने म्हणावे लागते. वर्ष २०१४ मध्ये सलमान खान यांनी यवतमाळमध्ये एका ‘फॅशन शो’मध्ये घातलेल्या कपड्यांवर ‘अल्लाह’ लिहिले होते. त्यामुळे त्यांच्यावर गुन्हा नोंद होऊनही त्यांना काही फरक पडलेला नाही. ‘विविध प्रकारच्या गुन्ह्यांतून आणि आरोपांतून आपण बाहेर येऊ शकतो’, अशी उद्दाम मानसिकता झाली आहे, असेच एकंदर त्यांच्या वर्तनावरून वाटते.

हिंदुत्वनिष्ठांसमोरील अडचणी !

सध्या उपलब्ध कायद्यानुसार हिंदूंच्या धार्मिक भावना दुखावण्याच्या संदर्भात ‘कलम २९५ अ’नुसार तक्रार नोंदवली जाण्याची सोय आहे; परंतु पोलीस बहुसंख्य वेळा ही तक्रार नोंदवून घेण्यास टाळाटाळ करतात, असा अनुभव हिंदुत्वनिष्ठांना येतो. हिंदुत्वनिष्ठांनी बराच वेळ पटवून दिल्यानंतर पोलीस काहीतरी कृती करण्यास सिद्ध होतात. इथपासूनच हिंदूंच्या संघर्षाला आरंभ होतो म्हटल्यावर ‘पुढे जाऊन आरोपीला शासन होणे’ ही प्रक्रिया किती लांब असेल, याची कल्पना येते. कायद्याच्या वाक्यरचनेची आखणी ही गुंतागुंतीची आणि क्लिष्ट असल्याचा लाभ आरोपींना काही वेळा मिळतो आणि ते सुटतात. एखाद्या धर्माभिमानी अधिवक्त्याने पुढाकार घेऊन धार्मिक भावना दुखावल्याचे प्रकरण लढवायला घेतले, तरीही केवळ तो श्रद्धाळू हिंदु किंवा भाविक असणे पुरेसे नसते, तर त्याला त्या प्रकरणाच्या अनुषंगाने धर्मातील तात्त्विक अंगाचा अभ्यास असणेही अपरिहार्य ठरते. याचसमवेत एखाद्या चित्रपटातील विडंबनाच्या संदर्भातील प्रकरण न्यायालयात गेले, तरी चित्रपट प्रदर्शित होण्यापूर्वी त्याचा निवाडा होणे अपेक्षित असते. सध्याच्या न्यायप्रक्रियेत प्रलंबित खटल्यांमुळे तीही अवघड गोष्ट आहे. बहुसंख्य वेळा परिनिरीक्षण मंडळाच्या (सेन्सॉर बोर्ड) सदस्यांना हिंदूंच्या धार्मिक भावनांशी काही देणे-घेणे नसते. समजा एखाद्या चित्रपटाला मंडळाने प्रमाणपत्र दिले असेल आणि हिंदूंनी त्याविषयी आक्षेप घेतला, तरी मंडळाला केंद्र सरकारकडून अनुमती आल्याविना ते रहित करता येत नाही. त्यासाठी केंद्रीय मंत्रीमंडळाची बैठक होणे आवश्यक असते. त्यामुळे ही प्रक्रिया जवळजवळ अशक्यप्राय असते. अशा प्रकरणांत शिक्षेची तरतूदही अल्प असल्याने आरोपींना शिक्षेचा धाक वाटत नाही.

हिंदूंच्या संघटित प्रयत्नांचे यश !

हिंदु जनजागृती समिती गेल्या काही वर्षांपासून हिंदूंच्या श्रद्धास्थानांचा विविध माध्यमांतून होणारा अवमान आणि विडंबन यांविरोधात विविध स्तरांवर वैचारिक लढा देत आहे. परिणामी अनेक हिंदुत्वनिष्ठ संघटनांमध्येही जागृती होऊन ते कृतीशील झाले आहेत. अखिल भारतीय वारकरी परिषदेने ‘दबंग ३’ मधील विडंबनाच्या विरोधात निवेदने देऊन निषेध नोंदवला आहे. ‘बॉयकॉट दबंग ३’ (‘दबंग’वर बहिष्कार घाला !) हा धर्मप्रेमींनी चालवलेला ‘हॅशटॅग ट्रेंड’ ट्विटरवर द्वितीय स्थानी आला. पूर्वी विविध माध्यमांतून होणार्‍या हिंदूंच्या श्रद्धास्थानांच्या अवमानाविषयी कुणी निषेध नोंदवला, तरी त्याची नोंद विशेष घेतली जात नसे. आता प्रथितयश वृत्तपत्रांना त्याची नोंद तत्परतेने घ्यावी लागत आहे, हेही हिंदूंच्या लढ्याला आलेले यशच आहे. ‘लवरात्री’, ‘पद्मावती’ या चित्रपटांची नावे अखेर पालटावी लागली, हेसुद्धा मोठे यश आहे. एका धर्माभिमानी अधिवक्त्याने इम्रान हाश्मी याच्या चित्रपटात राष्ट्रप्रतिकांच्या अवमानाविषयी ट्वीट केल्यावर त्याच्या नवीन भीत्तिपत्रकांवर ती प्रतिके आढळली नाहीत. ‘सिंघम २’ या चित्रपटात ‘साधूचा अवमान आणि दर्ग्याला सॅल्यूट’ करणार्‍या पोलीस अधिकार्‍याचे प्रसंग हिंदूंच्या विरोधानंतर वगळले. त्या वेळी कलाकारही चर्चेसाठी आले होते. ‘गल्लीत गोंधळ दिल्लीत मुजरा’ या चित्रपटातील देवाला टोपी घालण्याचा प्रसंग ‘झी टॉकीज’ आस्थापनाने पालटला. ‘पीके’च्या विरोधात मोठे जनआंदोलन उभे राहिले. येथे ही उदाहरणे देण्याचा उद्देश एवढाच आहे की, वृक्षावर अनेक घाव घालावे लागतात, त्याप्रमाणे हिंदुत्वनिष्ठ प्रामाणिक प्रयत्न करत आहेत. आरोपींना शिक्षा झाली नाही, तरी हिंदूंनी निराश न होता संघटितपणे वैचारिक संघर्ष करून राष्ट्र आणि धर्म यांच्या बाजूने उभे राहिले पाहिजे. येणार्‍या काळात ही चळवळ वाढत जाऊन हा लढा यशस्वी होईल, हे निश्‍चित !