अ‍ॅमेझॉन जंगलातील आगीमुळे अमेरिकेच्या एंडिज पर्वतरांगेतील हिमनग विरघळू लागले !

वॉशिंग्टन – अ‍ॅमेझॉन खोर्‍यातील जंगलाला काही मासांपूर्वी लागलेल्या भीषण आगीचा परिणाम जंगलापासून २ सहस्र किलोमीटर दूर असलेल्या अमेरिकेच्या एंडिज पर्वतरांगेतील हिमनगांवर होत आहे. या धुरातील काळ्या कार्बनमुळे येथील हिमनग वेगाने विरघळत आहेत, अशी माहिती एका संशोधनातून उघड झाली आहे. ब्राझील विद्यापिठातील तज्ञांच्या गटाने वर्ष २००० ते २००६ या कालावधीत घडलेल्या आगीच्या घटना, धुराची स्थिती, पाऊस आणि हिमनगांची विरघळण्याची गती यांचा अभ्यास करून आकडेवारी जमा केली आहे. त्यामध्ये वरील माहिती उघड झाली आहे. या माहितीमध्ये पुढे असेही म्हटले आहे की, फक्त आगीतून निघणार्‍या काळ्या कार्बनमुळे हिमनग विरघळण्याचे प्रमाण ३ ते ४ टक्क्यांपर्यंत आहे, तसेच धुली कण आणि आगीतून सिद्ध होणारे काळे कार्बन एकत्र आल्याने याचे प्रमाण ६ टक्क्यांपर्यंत पोचले आहे. अ‍ॅमेझॉनमधील जंगलाला लागेल्या आगीमुळे निसर्गाचीही मोठ्या प्रमाणात हानी झाली आहे.