तिरुपती देवस्थानचे ख्रिस्तीकरण !

आंध्रप्रदेशातील प्रसिद्ध तिरुमला तिरुपती देवस्थानाच्या ‘www. tirumala.org’ या अधिकृत संकेतस्थळाला भेट दिल्यावर तेथे येशूची प्रार्थना दिसत असल्याचे समोर आले. हे अतिशय संतापजनक आहे. प्रत्येक हिंदु भाविकाच्या मनात ‘एकदा तरी आंध्रप्रदेशमधील तिरुमला पर्वतरांगांमध्ये वसलेल्या तिरुपती बालाजीचे दर्शन घ्यावे’, अशी सुप्त इच्छा असते. प्रतिदिन ५ लाख भाविक तिरुपती बालाजी मंदिराला भेट देतात. यावरून तिरुपती बालाजीविषयी हिंदूंच्या मनात असलेले अढळ स्थान आपल्या लक्षात येईल. हिंदूंसाठी अत्यंत पवित्र असलेल्या देवस्थानाच्या अधिकृत संकेतस्थळावर येशू ख्रिस्ताचे गुणगान असणारी प्रार्थना प्रसारित होणे, हे हिंदु भाविकांना रूचलेले नाही. याविषयी देवस्थान मंडळ आता सारवासारव करत आहे; मात्र यामुळे हिंदूंच्या श्रद्धास्थानावर आघात झाला, त्याचे काय ? कधी मक्का, मदिना किंवा व्हॅटिकन चर्च यांच्या अधिकृत संकेतस्थळांवर अन्य धर्मियांच्या देवतांच्या प्रार्थना प्रसारित होऊ शकतील का ? मग हिंदूंच्याच देवतांच्या संदर्भात असे का होते ? देवस्थान मंडळ आता ‘हे संकेतस्थळ ‘हॅक’ झाले होते का ?’, याचा शोध घेत आहे.  या देवस्थान मंडळावर आता हिंदूंचा जराही विश्‍वास राहिलेला नाही. यापूर्वीही संकेतस्थळावर येशू ख्रिस्त आणि ख्रिस्ती धर्म यांचे गुणगान करणारी माहिती प्रसारित झाली होती. यावरून देवस्थान मंडळ सांगत असलेली कारणे खोटी असल्याचे आपल्या लक्षात येईल. हिंदुंनी या देवस्थान मंडळाचा हिंदूद्वेष आणखी किती काळ सहन करायचा ?

हिंदुविरोधी देवस्थान मंडळ !

तिरुमला तिरुपती देवस्थान हे जगातील श्रीमंत धार्मिक स्थळांपैकी एक आहे. या देवस्थान मंडळात १६ सहस्र अधिकारी आणि कर्मचारी कार्यरत आहेत. एवढ्या मोठ्या प्रमाणात कर्मचारी-अधिकारी असणारे देवस्थान भारतात बहुदा एकमेव असेल. या देवस्थान मंडळाचा थाटही मोठा आहे. एखाद्या सरकारी यंत्रणेत ज्या प्रकारे विविध विभाग असतात, त्याच प्रकारे या देवस्थान मंडळातही अभियांत्रिकी विभाग, जल व्यवस्थापन, मनुष्यबळ विकास, वित्त आणि लेखा, वन आणि उद्यान असे विविध विभाग आहेत. केवळ भाविकांनी अर्पण केलेल्या केसांच्या लिलावाद्वारे या देवस्थानाला २०३ कोटी रुपयांचे उत्पन्न मिळाले होते. ही आकडेवारी आहे वर्ष २०११ ची. आता हा आकडा नक्कीच अधिक असणार, याविषयी संशय नाही. यावरून या मंदिराचे उत्पन्न किती कोटींच्या घरात असेल, याची आपल्याला कल्पना येईल. देवस्थानाला मिळालेले हे वैभव, ऐश्‍वर्य ही तिरुपती बालाजीची कृपा ! ही सर्व त्याचीच लीला ! पण देवस्थान मंडळाला असे वाटत नाही; कारण या देवस्थान मंडळावर नियुक्त झालेले अधिकारी आणि कर्मचारी हे आंध्रप्रदेश सरकार नियुक्त करते. या देवस्थान मंडळात अनेक अहिंदू कर्मचारी आणि अधिकारी यांची नियुक्ती झाल्याचे पुढे आले आहे. याविषयी हिंदू आवाज उठवतात; मात्र त्याकडे जाणूनबुजून दुर्लक्ष केले जाते. या मंदिरामध्ये प्रवेश करतांना ‘माझी बालाजीवर श्रद्धा आहे’, अशा आशयाचे लिखाण तेथील नोंदवहीत लिहावे लागते. हा नियम सर्वांना लागू आहे. हाच नियम तेथे काम करणार्‍यांना का लागू नाही ? ज्यांना तिरुपती बालाजीविषयी काही वाटत नाही किंवा ज्यांची श्रद्धा अन्य ठिकाणी बांधली गेली आहे, ते या मंदिराचे नियम आणि परंपरा कसे पाळतील ?

आंदोलन तीव्र हवे !

आंध्रप्रदेशमध्ये सध्या वाय.एस्.आर्. काँग्रेस सत्तेवर आहे. या पक्षाचे मुख्यमंत्री जगनमोहन रेड्डी हे कट्टर ख्रिस्ती आहेत. अशा कट्टरतावाद्यांच्या हाती अधिकार आणि सत्ता असल्यास ते हिंदूंना छळण्यास आरंभ करतात. रेड्डी यांच्याकडूनही असेच होत आहे. ते या कृती उघड नाही, तर छुप्या पद्धतीने करतांना दिसतात. तिरुमला तिरुपती मंदिराचे ख्रिस्तीकरण करणे, हा त्यातीलच एक भाग आहे. हे टप्प्याटप्प्याने, इतरांच्या नकळत त्यांना करायचे आहे. त्यामुळे हे घातक आहे. हिंदु धर्माचे शत्रू कोण आणि त्यांची कारवाया करण्याची पद्धत यांविषयी अवगत झाल्यास आपल्याला त्यांच्या कटकारस्थानांची खोली लक्षात येईल. त्यामुळे अशा घटनांकडे दुर्लक्ष करणे खुळेपणाचे होईल.

धर्मांध मुसलमानांनी तलवारीच्या बळावर हिंदूंचे धर्मांतर केले. ख्रिस्ती असलेल्या ब्रिटिशांनी मात्र वेगळा मार्ग अवलंबला. त्यांनी हिंदूंच्या श्रद्धास्थानांविषयी हिंदूंच्या मनात अपसमज निर्माण करून त्यांचा बुद्धीभेद केला आणि त्यांचे वैचारिक धर्मांतर केले. त्याचाच कित्ता जगनमोहन रेड्डी गिरवत आहेत. हिंदूंना अतिशय पवित्र असणार्‍या देवस्थानांचे पावित्र्य भंग करणे, तेथील प्रथा-परंपरा बंद करणे, सातत्याने त्यांच्या श्रद्धास्थानांवर आघात करून हिंदूंच्या मनात दुय्यमतेची भावना निर्माण करण्याचा त्यांचा डाव आहे. हे लक्षात घेऊन हिंदूंनीही सावध होणे आवश्यक आहे. तिरुमला तिरुपती देवस्थान सरकारच्या जोखडातून मुक्त करण्यासाठी हिंदूंना व्यापक लढा द्यावा लागेल. केेरळमध्ये साम्यवाद्यांचे सरकार असतांनाही तेथील हिंदूंनी शबरीमला मंदिरातील परंपरांचे पालन होण्यासाठी वैध मार्गाने मोठ्या प्रमाणात आंदोलन उभारले आणि त्याचे राष्ट्रीय स्तरावर पडसाद उमटले. तिरुमला तिरुपती देवस्थानात सातत्याने हिंदुविरोधी घटना घडत आहेत; मात्र याचे पडसाद राष्ट्रीय स्तरावर उमटतांना दिसत नाहीत. त्यासाठी हिंदूंनी व्यापक संघटनाद्वारे हे आंदोलन अधिकाधिक तीव्र करणे आवश्यक आहे. शबरीमला मंदिरात होणारी धर्महानी रोखण्यासाठी अनेक राजकीय पक्ष आणि हिंदुत्वनिष्ठ संघटना संघटित झाल्या होत्या. जर केरळमध्ये असे होऊ शकते, तर ते आंध्रप्रदेशमध्येही होऊ शकते ! एकदा का हिंदू जागृत झाल्याचे हिंदुद्वेष्ट्यांच्या लक्षात आले की, ते हिंदुविरोधी कृती करण्यास धजावणार नाहीत. त्यामुळे परिणामकारक हिंदूसंघटन अपरिहार्य आहे !