साम्यवादाचे खरे रूप समोर आणणारे योद्धा लेखक पू. सीताराम गोयल !

हिंदुत्वनिष्ठ पू. सीताराम गोयल यांच्या स्मृतीदिनाच्या निमित्ताने…

पू. सीताराम गोयल

हिंदुत्वनिष्ठ पू. सीताराम गोयल हे नि:स्वार्थी होते. त्यांना साधेपणाची आवड होती. साम्यवादी आणि इस्लामी राजनीती यांच्या कटू सत्याला समोर आणण्यासाठी त्यांनी आजीवन संघर्ष केला.

पू. सीताराम गोयल यांनी वर्ष १९५१ पासूनच ‘सोव्हिएत संघ’ आणि ‘लाल चीन’ यांची सत्य माहिती देशवासियांना ज्ञात करून देण्याचा वीडा उचलला. त्या काळी स्वत: पंतप्रधान नेहरू यांनी साम्यवादी देशांच्या संदर्भात मोठे अपसमज करून घेतले होते. अशा प्रतिकूल परिस्थितीत पू. गोयल यांनी कोणतेही आर्थिक साधन किंवा पद नसतांना ‘साम्यवादी सिद्धांत, त्यांचे व्यवहार आणि विश्‍वव्यापी अनुभव’ यांविषयी लिहून अन् अनुवाद करून जी प्रचार सामुग्री उपलब्ध करून दिली त्यातूनच त्यांच्यातील योद्धा लेखकाची प्रचीती येते. त्यांनी आजीवन शोध, अभ्यास आणि लेखन केले, तेही कोणत्याही सरकारी आणि बिगर सरकारी साहाय्यतेविना ! देशसेवेने प्रेरीत होऊन अथक परिश्रम, चिकाटी यांद्वारे जवळजवळ पाच दशके त्यांनी सरस्वतीमातेची सेवा केली.

पू. सीताराम गोयल यांची कौटुंबिक पार्श्‍वभूमी आणि विद्यार्थी जीवन

वर्ष १९२१ मध्ये एका गरीब कुटुंबामध्ये जन्मलेले सीताराम गोयल प्रथम गांधींच्या व्यक्तीमत्त्वाने प्रभावित झाले होते. विद्यार्थी जीवनात त्यांनी हरीजन आश्रमासाठी काम केले. विद्यार्थ्यांचे अध्ययन केंद्रही चालवले. २० व्या वर्षी ते मार्क्सवादाच्या प्रभावाखाली आले. त्यांनी वर्ष १९४४ मध्ये देहली विश्‍वविद्यालयात इतिहासामध्ये एम्.ए. ही पदवी घेतली. गुणवंत विद्यार्थी म्हणून त्यांना अनेक पुरस्कारही मिळाले.

पू. गोयल यांची साम्यवादाकडून हिंदुत्वाकडे झालेली वाटचाल

पू. सीताराम गोयल यांनी वर्ष १९४७ मध्ये भारताच्या विभाजनाला विरोध केला, तरीही वर्ष १९४८ मध्ये ते कोलकाता येथे ‘कम्युनिस्ट पार्टी’चे सदस्य होण्यासाठी निघाले होते. थोर विचारवंत आणि योगी असलेले रामस्वरूप गर्ग यांच्या संपर्कात आल्याने त्यांचा भ्रम तुटला. तेव्हापासून रामस्वरूप यांच्या विचारांचा सीताराम यांच्या जीवनावर अत्यधिक प्रभाव पडला. नंतर पू. गोयल यांनी त्यांचे संपूर्ण जीवन साम्यवाद्यांच्या कपटी विचारांपासून भारतियांना सावध करण्यासाठी समर्पित केले. चीन आणि माओवाद यांवर वर्ष १९५२ ते वर्ष १९५५ या काळात त्यांनी ७ पुस्तके लिहिली. भारतीय मार्क्सवादात ‘सोव्हिएत संघ आणि चीनचे गुणगान’, ‘इस्लामचा गौरव’ अन् ‘हिंदुत्वाप्रती शत्रुत्व’ हे तीन तत्त्वे नेहमी केंद्रस्थानी राहिली. त्यामुळे पू. सीताराम गोयल हे मार्क्सवाद्यांना उत्तरे देण्यासाठी त्यांच्या विरोधात उतरून हिंदुत्वाच्या बाजूने उभे राहिले.

पू. गोयल यांच्या लिखाणाचे करण्यात आलेले दमन

पू. सीतारामजी यांनी साम्यवाद्यांची घातक भूमिका, भारतीय इतिहासातील इस्लामी युग, इस्लामी तसेच ख्रिस्ती मिशनरी यांकडून हिंंदुत्वावर होत असलेले आक्रमण यांसदर्भात विस्तृतपणे लिखाण केले. यासाठी त्यांनी ‘व्हॉइस ऑफ इंडिया (हिंदी भाषेत ‘भारत -भारती’) नावाची प्रकाशन संस्था चालू केली. वर्ष १९५१ ते १९९८ पर्यंत त्यांनी स्वत: तीसहून अधिक पुस्तके, तसेच शेकडो लेख लिहिले; परंतु नेहरूवादी, डाव्या विचारसरणीच्या बौद्धिक वर्गाद्वारे सत्तेचा दुरूपयोग करून, तसेच षड्यंत्राद्वारे त्यांचे दमन करण्याचे प्रयत्न करण्यात आले. बेल्जियम विद्वान कोनराल्ड एल्स्ट यांनी म्हटले आहे की, गोयल यांच्या बोलण्याचे किंवा त्यांच्या पुस्तकांचे आजपर्यंत कोणीही खंडण करू शकले नाही. त्याविषयी जाणीवपूर्वक मौन राखण्याचे धोरण अवलंबण्यात आले. त्यामुळे त्यांच्या लेखनाविषयी सामान्यजण अनभिज्ञ आहेत.

लेखक : शंकर शरण (संदर्भ : ‘प्रवक्ता डॉट कॉम’ संकेतस्थळ)