अयोध्येत मुसलमानांना भूमी दिल्यास ती मक्का होईल !

शंकराचार्य स्वामी निश्‍चलानंद सरस्वती यांचा पुनरूच्चार !

उडुपी (कर्नाटक) – हिंदु समाज मुसलमानांच्या विरोधात नाही; परंतु रामजन्मभूमीच्या सूत्रावर आपण कोणतीही तडजोड करू शकत नाही. रामजन्मभूमीतील एक इंचही भूमी मुसलमानांना देऊ शकत नाही. मुसलमानांना ५ एकर भूमी देण्याच्या सर्वोच्च न्यायालयाच्या निवाड्यामुळे अयोध्येच्या पवित्र भूमीत आध्यात्मिक संघर्ष निर्माण होऊ शकतो. अयोध्येची पवित्र भूमी ते दुसरी मक्का करतील आणि जगाची आध्यात्मिक राजधानी होऊ घातलेल्या अयोध्येचे मूळतत्त्वच नष्ट होईल, असे उद्गार पुरी येथील पुर्वाम्नाय गोवर्धन पिठाचे शंकराचार्य स्वामी निश्‍चलानंद सरस्वती यांनी येथे पत्रकार परिषदेत बोलतांना काढले.

केंद्र सरकारने न्यायालयाचा निर्णय रहित करावा !

शंकराचार्य पुढे म्हणाले की, आपली संसद सर्वोच्च न्यायालयापेक्षाही मोठी आहे आणि भाजपकडे संसदेत पूर्ण बहुमत आहे. सरकारकडे धाडस असल्यास संसदेत कायदा संमत करून सर्वोच्च न्यायालयाचा आदेश ते रहित करू शकतात आणि अयोध्येत मुसलमानांना भूमी देण्याचे रोखू शकतात.

धार्मिक सूत्रांवर सर्वोच्च न्यायालयाने निर्णय देऊ नयेत !

शबरीमला मंदिरातील सर्व वयोगटातील महिलांच्या प्रवेशाविषयी शंकराचार्य म्हणाले की, धार्मिक सूत्रांवर निर्णय घेण्यासाठी हिंदूंचे संत समर्थ आहेत. धार्मिक सूत्रांवर सर्वोच्च न्यायालयाने निर्णय देऊ नयेत.