केवळ साधकांच्या आध्यात्मिक उद्धाराचा उद्देश ठेवून अहोरात्र प्रयत्न करणार्‍या गुरुमाऊलीला साधकांकडून कोणतीच आर्थिक किंवा वैयक्तिक लाभाची अपेक्षा नसणे

‘जगात प्रत्येक गोष्टीला किंमत मोजावी लागते; परंतु गुरुदेवांच्या आश्रमात प्रत्येक गोष्ट विनामूल्य होत असते. गुरुदेव, स्वतःचा कुठलाही लाभ नसतांना केवळ साधकांतील स्वभावदोषांचे निर्मूलन होण्यासाठी त्यांना आश्रमात विनामूल्य ठेवून घेतात. त्यांच्या साधनेचा सर्व भार उचलतात. हे लक्षात येऊन त्यांच्याप्रती वाटलेली अपार कृतज्ञता व्यक्त करण्याचा हा छोटासा प्रयत्न गुरुमाऊलींच्या सुकोमल चरणी अर्पण !

परात्पर गुरु डॉ. आठवले

१. व्यवहारात प्रसाधनगृहाचा वापर केल्यावर पैशाची मागणी होणे; परंतु गुरुमाऊली आश्रमात सर्वकाही विनामूल्य उपलब्ध करून देत असणे आणि तेव्हा गुरुमाऊली म्हणजे कल्पवृक्ष असल्याची जाणीव होणे

‘१७.११.२०१७ या दिवशी रामनाथी आश्रमातून मी रात्रीच्या गाडीने पंढरपूरला जाण्यासाठी पणजीला संध्याकाळी ७.३० वाजता पोचलो. तेव्हा तेथील बस आगारामधील प्रसाधनगृहात गेलो. बाहेर पडतांना तेथे बसलेल्या व्यक्तीने माझ्याकडे पैशांची मागणी केली. मी त्यांना सांगितले, ‘अहो, मी केवळ लघुशंकेसाठी गेलो होतो’, तरीही त्याने तेथील नियमानुसार माझ्याकडून पैसे घेतले. (सुलभ शौचालयांची जी व्यवस्था सर्वत्र लागू आहे, त्यात लघुशंकेसाठी २ रुपये आकारले जातात.) तेव्हापासून माझ्या मनात विचारांचे मंथन चालू झाले, ‘व्यवहारात चतुर व्यापारी एखादी गोष्ट खरेदी करतांना किती चिकित्सा करतो ? आणि अधिकाधिक लाभ स्वतःच्या पदरात पाडून घेतो. असा व्यवहार आम्हा लोकांनाही माहिती आहे. आम्ही आमच्या जीवनात याच पद्धतीने वागतो.’ या लहानशा प्रसंगातून देवाने मला गुरुदेवांची (परात्पर गुरु डॉक्टर आठवले यांची) महानता लक्षात आणून दिली. ‘मी कल्पवृक्षाच्या खाली बसून गारगोटी मागतो आहे !’ याची मला जाणीव झाली.

आधुनिक वैद्य श्रीपाद पेठकर

२. परात्पर गुरुमाऊलींना कुठलाही लाभ होत नसूनही साधकांची आध्यात्मिक उन्नती होण्यासाठी ते साधकांचा सर्व व्यय करत असणे

माझ्या मनात विचार आला, ‘मी १० दिवस रामनाथी आश्रमात वास्तव्यास होतो. दोन वेळा चहा आणि अल्पाहार, दोन वेळा महाप्रसाद, निवास, स्नान, प्रसाधनगृहाचा वापर या सर्व गोष्टींचे मोल अनमोल आहे; परंतु व्यावहारिक दृष्टीने विचार केला, तर काही सहस्र रुपये दहा दिवसांत व्यय झाले. आश्रमातील  सर्व साधकांचे पथ्यपाणी सांभाळून, ज्याला-त्याला त्याच्या आवश्यकतेनुसार सर्व काही मिळते. साधकांच्या सर्व सुखांचा येथे विचार केला जातो. स्वभावदोष निर्मूलन प्रक्रियेसाठी आलेले कित्येक साधक ३ – ४ मास प्रकियेसाठी येथे थांबतात. यात गुरुदेवांंचा कोणताही आर्थिक आणि वैयक्तिक लाभ नाही, तरी ‘परात्पर गुरुमाऊली आपल्यासाठी एवढे का करतात ?’, तर आपले मन ईश्‍वरचरणी अर्पण व्हावे; पण आपले मन अगणित स्वभावदोष आणि प्रचंड अहंभाव, तसेच विकार अन् वासना यांनी बरबटलेले आहे.

३. ‘साधक माझा प्राण आहे’, असे म्हणणारी गुरुमाऊली ब्रह्मांडात एकमेवाद्वितीय असणे

साधकांचे स्वभावदोष, विकार, वासना आणि अहं यांनी बरबटलेल्या मनाचे शुद्धीकरण होण्यासाठी, तसेच ईश्‍वरचरणी अर्पण होण्यासाठी आणि एकेका साधकासाठी एवढी किंमत मोजणारी आमची गुरुमाऊली आहे. अशी महान गुरुमाऊली साधकांच्या जीवनात येऊन साधकांचे जीवन आध्यात्मिक दृष्टीने समृद्ध करण्यासाठी झटत आहे. ‘साधक माझा प्राण आहे’, असे म्हणणार्‍या परात्पर गुरु डॉक्टरांच्या चरणी कोटी कोटी कृतज्ञता व्यक्त करणेही अत्यल्प वाटते. असे महान ‘गुरु’ संपूर्ण ब्रह्मांडात एकमेवाद्वितीय आहेत.

४. गुरुदेवांना आम्ही त्यांचे वाटणे हीच आमची ‘आध्यात्मिक श्रीमंती !’ आणि ती त्रैलोक्यात कोणाकडे नसणे

‘हे गुरुदेवा, तुमची महती, महानता आम्ही कधीच जाणू शकलो नाही. ती जाणणेही आमच्या अल्पमतीच्या पलीकडील आहे. आमच्यासारख्या क्षुुद्र जिवातील एखादा सूक्ष्म सद्गुण हेरून तुम्ही आम्हाला जवळ घेतले आणि आमच्या साधनेचा सर्व भार उचलला आहे. हे परात्पर गुरुदेवा, आम्ही तुम्हाला तुमचे वाटतो, हीच आमची ‘आध्यात्मिक श्रीमंती !’ आणि ती या त्रैलोक्यात कोणाकडेही नाही.

५. गुरुमाऊलीला साधकांच्या उद्धाराची तळमळ अधिक असणे आणि त्याविषयी कृतज्ञता वाटणे

‘हे गुरुदेवा, आम्ही आपल्या कृपाळू, दयाळू, परम पावन आणि परम मंगल अशा कृपाचरणी आलो आहोत. तुम्ही आम्हाला उद्धारून नेणारच आहात. ही काळ्या दगडावरची रेघ आहे; कारण आमच्या उद्धाराची तळमळ तुम्हालाच आमच्यापेक्षा अधिक आहे.

‘हे गुरुराया, आपल्याला अपेक्षित अशी सेवा आणि साधना आपणच करून घ्या. आपल्या चरणांशी राहून अखंड अनुसंधानात राहता येऊ दे, तसेच आपल्या कृपेस पात्र होता येऊ दे. आमच्या प्रयत्नांना आपणच बळ द्या. गुरुदेवा, कर्ते-करविते तुम्हीच आहात, तरी सूक्ष्मातून आमचा उद्धार करून स्थुलातील प्रारब्धभोग भोगण्यास बळ द्या’, अशी आपल्या चरणी प्रार्थना आहे.’

अखिल ब्रह्मांडात केवळ एकच, परात्पर गुरु डॉक्टर !
दयेचा अथांग सागर ।
परम कृपाळू करुणाकर ।
अवघ्या साधकांचे तारणहार ।
अखिल ब्रह्मांडात केवळ एकच ।
परात्पर गुरु डॉक्टर, परात्पर गुरु डॉक्टर, परात्पर गुरु डॉक्टर ॥ १ ॥

– आपल्या कृपाळू चरणांशी येण्यास आतुरलेला एक धूलीकण,

आधुनिक वैद्य श्रीपाद व्यंकटेश पेठकर, पंढरपूर, जिल्हा सोलापूर. (८.१२.२०१७)

या लेखात प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक