मुसलमानांनी काशीतील ज्ञानवापी मशीद आणि मथुरेतील कृष्ण जन्मस्थान हिंदूंना द्यावे !

भारतीय पुरातत्व खात्याचे माजी विभागीय संचालक के.के. महंमद यांचे आवाहन

एक मुसलमान पुरातत्वशास्त्रज्ञ असे सांगतात, याविषयी धर्मांध मुसलमान आणि त्यांचे नेते यांना काय म्हणायचे आहे ?

मंगळुरू (कर्नाटक) – काशीतील ज्ञानवापी मशीद आणि मथुरेतील कृष्ण जन्मस्थान हिंदूंकडे सुपुर्द करण्यासाठी मुसलमानांनी स्वतःहून पुढे सरसावले पाहिजे. अयोध्येतील रामजन्मभूमीविषयी तसे करण्याची एक चांगली संधी मुसलमानांनी घालवली आहे, असे प्रतिपादन भारतीय पुरातत्व खात्याचे माजी विभागीय संचालक के.के. महंमद यांनी येथे केेले. येथे एका कार्यक्रमात ‘सत्याचे उत्खनन’ या विषयावर आयोजित वार्तालापाच्या वेळी त्यांनी वरील विधान केले. अयोध्या येथील ऐतिहासिक रामजन्मभूमीचे उत्खनन करणार्‍या भारतीय पुरातत्व खात्याच्या पहिल्या पथकामध्ये महंमद यांचा सहभाग होता.

के.के. महंमद यांनी मांडलेली सूत्रे . . .

१. भारतीय पुरातत्व खात्याने अयोध्या येथे अनेक वेळा उत्खनन केले आणि प्रत्येक वेळी एकच सत्य सांगितले की, तेथे मंदिर अस्तित्वात होते. मी हे सत्य जेव्हा प्रसारमाध्यमांना प्रथमच सांगितले, तेव्हा माझ्या मनात एकच विचार होता की, मी एक पुरातत्वशास्त्रज्ञ असून ऐतिहासिक सूत्रावर बोलत आहे. मी एक मुसलमान असल्याने केवळ सत्यच बोलणे, हे माझे दुहेरी उत्तरदायित्व ठरते.

२. आपण भांडत राहण्यापेक्षा संघटित भारत निर्माण करण्यासाठी प्रयत्नरत राहिले पाहिजे. हिंदु धर्म मोठ्या प्रमाणात सहिष्णु धर्म आहे. भारत हिंदूबहुल देश असल्यामुळे तो खर्‍या अर्थाने धर्मनिरपेक्ष देश ठरला आहे.

३. सध्याची शिक्षणपद्धती आपल्या युवकांना भारतीय संस्कृतीशी जोडू शकत नाही. त्यासाठी श्रीरामासारख्या राष्ट्रपुरुषांचा इतिहास त्यांना शिकवावा लागेल.