धर्माचरणाची आवड, साधनेचे गांभीर्य असणारी आणि देवावर श्रद्धा असलेली कु. प्रेरणा विजय पाटील !

कु. प्रेरणा विजय पाटील हिची तिच्या कुटुंबियांना जाणवलेली तिची गुणवैशिष्ट्येपुढे दिली आहेत.

१. जन्माच्या वेळी

कु. प्रेरणा पाटील

‘कु. प्रेरणा जन्मानंतर ७ घंट्यांपर्यंत रडली नव्हती.

२. स्वच्छतेची आवड

प्रेरणाला स्वच्छतेची आवड आहे. एकदा मंदिरात वितरणकक्षाच्या (स्टॉल) सेवेला गेल्यानंतर आरंभी तिने मंदिर झाडून स्वच्छ केले. हे पाहून इतर साधकांनीही तिला झाडण्यासाठी साहाय्य केले.

३. समयसूचकता

ती नेहमी महाशिवरात्र आणि एकादशी या दिवशी वितरणकक्षाच्या (स्टॉल) सेवेला जाते. एकदा ‘फ्लेक्स’ लावतांना दोरा कापण्यासाठी काहीही साहित्य नव्हते. त्या वेळी तिने मंदिरात जाऊन पेटती उद्बत्ती आणून दोरा कापला.

४. आईला घरकामात साहाय्य करणे

प्रेरणाला आईला घरकामात साहाय्य करायला पुष्कळ आवडते. तिची आई शेतात किंवा सेवेसाठी बाहेर गेल्यावर ती घर झाडणे, भांडी घासणे, शेतावर आईसाठी चहा-पाणी घेऊन जाणे, लहान भावाचा अभ्यास घेणे, भावाकडे लक्ष देणे इत्यादी कामे करते.

५. देवपूजा भावपूर्ण करणेेे

प्रेरणा देवपूजा भावपूर्ण करते. ती पूजा करत असतांना देवघरात देवाचे अस्तित्व जाणवते. ती पूजा करतांना प्रत्येक कृती भावपूर्ण करते. तिने देवाला वाहिलेली फुले संध्याकाळपर्यंत टवटवीत असतात.

६. चित्रकलेची आवड

प्रेरणाला चित्रे काढण्याची आवड आहे. तिने श्रीकृष्ण आणि श्रीविष्णु यांची चित्रे काढली आहेत.

७. औषधी वनस्पतींची लागवड करणे

७ अ. ‘औषधी वनस्पतींची लागवड’ हा ग्रंथ वाचून २० प्रकारच्या औषधी वनस्पती लावणे : प्रेरणाला झाडे लावण्याची पुष्कळ आवड आहे. तिने ‘औषधी वनस्पतींची लागवड’ हा ग्रंथ वाचून २० प्रकारच्या औषधी वनस्पती लावल्या आहेत. तिने लावलेल्या झाडाला काहीही दुखापत झाली की, ‘त्याला किती त्रास झाला असेल ?’, असा विचार करून ती रडते.

७ आ. गुरुपौर्णिमेच्या दिवशी ‘आयुर्वेदिय औषधी वनस्पतींची लागवड’ या कक्षाची सेवा करतांना स्वतः लावलेल्या वनस्पतींची माहिती लोकांना सांगणे : वर्ष २०१८ च्या गुरुपौणिमेच्या वेळी तिला ‘आयुर्वेदिय औषधी वनस्पतींची लागवड’ या कक्षाची (स्टॉल) सेवा होती. तिने कोणत्याही मोठ्या व्यक्तीचे साहाय्य न घेता २ मास आधीपासूनच वनस्पतींची लागवड केली. तिने लागवड केलेल्या २० प्रकारच्या औषधी वनस्पतींची नावे आणि माहिती ती लोकांना व्यवस्थित सांगत होती. तिने रानातून गोळा केलेली रोपे सर्वजण विकत मागत होते.

८. लगेच कृती करणे

तिला एखादी गोष्ट समजली की, ती लगेच कृती करते. अडुळशाच्या पानांत टोमॅटो, मिरची आणि फळे ठेवली, तर ती अधिक दिवस टिकतात. हे ग्रंथात वाचल्यानंतर तिने लगेचच तशी कृती केली.

९. साधना

अ. प्रेरणा शाळेत गेल्यावर तिच्या मैत्रिणींना कुंकू लावण्याचे महत्त्व आणि सनातनच्या सात्त्विक उत्पादनांची माहिती सांगते. पुष्कळ मुली तिच्याकडून मेण, कुंकू, वाती आणि साबण घेतात. तिने सनातन-निर्मित ग्रंथांची माहिती सांगून २० ग्रंथांचे वितरण केले आहे. ती मैत्रिणींच्या घरी गेल्यावर त्यांच्या पालकांना सनातनच्या उत्पादनांची माहिती सांगते.

आ. प्रेरणाला सनातनच्या ग्रंथांचे वाचन करायला पुष्कळ आवडते. तिने ‘गंगामहात्म्य’, ‘औषधी वनस्पतींची लागवड’ या ग्रंथाचे वाचन केले आहे. ती मैत्रिणींच्या वाढदिवसाला सनातनचे ग्रंथच भेट देते.

इ. ती गुरुपौर्णिमेला शाळेत न जाता सेवेला येते. ती ९ वर्षांची असल्यापासून वडिलांच्या अनुपस्थितीत बसमधून ‘दैनिक सनातन प्रभात’चे अंक उतरवून घेणे, त्यांचे वितरण करणे, अशा सेवा करते. घरात प्रवचन असले की, ती महिलांना बोलावून आणते.

ई. प्रेरणा स्वतः प्रतिदिन कापूर, अत्तर आणि देवतेची चित्रे यांचे उपाय करून इतरांनाही ते करायला सांगते. ती शाळेतही उपाय करते आणि मैैत्रिणींनाही करायला सांगते.

उ. ती खाऊसाठी दिलेले पैसे, तसेच तिला पाहुण्यांंनी दिलेले पैसे वर्षभर साठवून ते गुरुपौर्णिमेला अर्पण करते.

ऊ. तिने वर्ष २०१९ च्या गुरुपौर्णिमेला पूर्णवेळ साधना करण्याचा ध्यास घेतला. त्यानुसार ती आता पूर्णवेळ साधना करत आहे. ती प्रथम सनातनच्या मिरज आश्रमात, नंतर देवद आश्रमात आणि आता रामनाथी आश्रमात पूर्णवेळ साधना करत आहे.

१०. धर्माचरणाची आवड

कु. प्रेरणा इंग्रजी माध्यमाच्या शाळेत असूनही प्रतिदिन कुंकू लावून आणि हातांत बांगड्या घालून शाळेत जाते. तिला अडीच वर्षांची असल्यापासून शाळेत जाण्याची आवड होती. शाळेत ती सर्वांची लाडकी होती. ती शाळेतल्या मुलींनाही कुंकू लावण्यास सांगते. ‘आपण हिंदू आहोत ना ? मग कुंकू लावले पाहिजे. कुंकू लावल्याने आपल्याला चैतन्य मिळते’, असे ती ठामपणे इतरांना सांगते.

११. कार्यशाळेसाठी आश्रमात गेल्यावर तेथील वातावरणाशी समरस होणे

वयाने लहान असूनही तिला मिरज आश्रमात झालेल्या ४ दिवसांच्या ‘युवा साधक साधना’ या विषयावरील कार्यशाळेत सहभागी होण्याची संधी मिळली. तिला ‘कार्यशाळेत जाणार का ?’, असे विचारताच ती लगेच सिद्ध झाली. आतापर्यंत ती कधीच एकटी राहिली नव्हती. ती कार्यशाळेत इतकी रममाण झाली होती की, तिथे गेल्यावर तिने एकदाही घरी भ्रमणभाष केला नाही.

१२. कार्यशाळेतून आल्यानंतर प्रेरणात झालेले पालट

अ. कार्यशाळेत सद्गुरु स्वातीताईंनी ‘मला ईश्‍वरी राज्याच्या कार्यात भागीदार व्हायचे आहे’, हे साधनेसाठी प्रेरणादायी वाक्य शिबिरार्थींना सांगितले. ते तिच्या मनावर इतके बिंबले की, तिने पूर्णवेळ साधना करण्याचा ध्यासच घेतला.

आ. तेथून आल्यानंतर ती पहाटे ५ वाजता उठून नामजपाला बसायची.

इ. आता ती प्रत्येक प्रसंगात स्थिर असते.

ई. कार्यशाळेतून आल्यानंतर तिचा वर्गात तिसरा क्रमांक आला होता. तिने शिक्षकांना सांगितले, ‘‘मी शाळा सोडणार आहे आणि आश्रमात जाणार आहे.’’ त्या वेळी शिक्षक म्हणाले, ‘‘आश्रमात जाऊन काय करणार ? तुझी ३ मासांमध्ये किती प्रगती झाली आहे !

तुझा तिसरा क्रमांक आला आहे. पुढच्या वर्षी तुझा पहिला क्रमांक येईल.’’ त्या वेळी ती म्हणाली, ‘‘नाही. हा क्रमांक ज्यांच्यामुळे आला, त्यांच्याकडे (परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्याकडे) मला जायचे आहे.’’

(यासंदर्भात सत्कार सोहळ्यात चर्चा होत असतांना कु. प्रेरणाने स्पष्ट केले की, जेव्हा मला साधनेसंदर्भात ठाऊक नव्हते, तेव्हा माझा शाळेत कधी क्रमांक आला नाही. जेव्हा मी शिक्षणाला साधनेची जोड दिली, तेव्हाच माझा शाळेतही क्रमांक आला.

या वेळी सद्गुरु (सौ.) बिंदा सिंगबाळ म्हणाल्या, ‘‘अहं अल्प असल्यामुळे तिच्यात कर्तेपणा नाही. ती धर्माचरणाविषयी सांगते. विचारही मोकळेपणाने व्यक्त करते.तिच्या बोलण्यातून सिद्ध होते की, ती महर्लोकातून आली आहे.’’)

१३. क्षात्रभाव

प्रेरणा ७ वीत शिकत असतांना (वर्ष २०१७ मध्ये) शाळेत शिक्षिका इतिहास हा विषय शिकवत होत्या. त्या म्हणाल्या, ‘‘गुढीपाडव्याच्या दिवशी औरंगजेबाने छत्रपती संभाजी महाराजांना ठार मारले आहे. त्यामुळे गुढी उभी करायची नाही.’’ तेव्हा प्रेरणाने उठून सांगितले, ‘‘हे योग्य नाही. ‘गुढीपाडवा’ हा हिंदूंचा पूर्वापार चालत आलेला सण आहे. प्रभु श्रीरामचंद्र वनवासातून परत आले. त्या वेळी विजयाचे प्रतीक म्हणून ‘गुढीपाडवा’ हा सण साजरा केला जातो.’’ वर्गातील मुलींना ते पटले नाही. तेव्हा तिने कार्यालयात (ऑफिसमध्ये) जाऊन शिक्षकांना हे सांगितले. तेव्हा त्यांना हेे पटले आणि त्यांनी वर्गात येऊन विद्यार्थ्यांना ते समजावून सांगितले.

१४. भाव

१४ अ. रांगोळीत पहिला क्रमांक आल्याचे श्रेय सनातनचा ग्रंथ आणि परात्पर गुरुदेव डॉक्टर यांना देणे : कु. प्रेरणा इयत्ता पहिलीमध्ये शिकत असतांना तिने रांगोळी स्पर्धेमध्ये भाग घेतला होता. त्या वेळी तिने प्रार्थना आणि नामजप करत रांगोळी काढल्यामुळे तिचा सलग २ वर्षे प्रथम क्रमांक आला.  पारितोषिक वितरणाच्या वेळी प्रमुख पाहुण्यांना आश्‍चर्य वाटले. त्यांनी विचारले, ‘‘एवढ्या लहान मुलीचा प्रथम क्रमांक कसा काय आला ?’’

– सौ. उज्वला आणि श्री. विजय पाटील

त्या वेळी तिने सांगितले, ‘‘सनातनच्या ग्रंथातील रांगोळी काढल्यामुळे आणि परात्पर गुरु डॉक्टरांनी ती माझ्याकडून काढून घेतल्यामुळे माझा प्रथम क्रमांक आला.’’

(यासंदर्भात सत्कार सोहळ्याच्या वेळी सद्गुरु (सौ.) बिंदा सिंगबाळ म्हणाल्या, ‘‘सामान्यतः सर्वांना कौतुकाची पारितोषिकाची ओढ वाटते. कर्तेपणाही असतो. कु. प्रेरणाने सर्व श्रेय भगवंताला दिले.’’)

१४ आ. देवावरील श्रद्धा : प्रेरणाने १८.७.२०१८ या दिवशी ‘व्हॉट्सअ‍ॅप’वर एक संदेश पाहिला. ‘दुधाचा संप होता. एवढ्या दुधाचे काय करायचे; म्हणून एक माणूस दुधानेच म्हशीला अंघोळ घालत होता.’ हेे पाहून ती लगेच म्हणाली, ‘‘त्या ऐवजी त्याने त्या दुधाचा देवाला अभिषेक केला असता, तर त्याला त्याचे पुण्य मिळाले असते.’’

१४ इ. ‘प्रत्येक प्रसंगात परात्पर गुरु डॉ. आठवले काळजी घेणारच आहेत’, असा भाव असणे : कु. प्रेरणा काहीही चांगले झाले की, लगेच कृतज्ञता व्यक्त करते. प्रेरणा ९ वर्षांची असतांना एकदा आमच्याकडे एकादशी निमित्त वितरणकक्षाच्या सेवेचे नियोजन होते. सकाळी लवकर उठून सेवेला जायचे असल्याने आईने फराळाचे काही बनवले नव्हते. त्या दिवशी प्रेरणाचाही उपवास असल्यामुळे मी तिला विचारले, ‘‘काय करायचे?’’ तेव्हा ती म्हणाली, ‘‘परात्पर गुरु डॉक्टर बघून घेतील. आपण सेवेला वेळेत जाऊया.’’ सेवेला गेल्यानंतर आम्हाला तेथे प्रसाद म्हणून मसाले दूध आणि साबुदाणा वडे देण्यात आले. लगेच ती म्हणाली,‘‘बघितलेस ! परात्पर गुरु डॉक्टर आपली किती काळजी घेतात ! त्यांच्या चरणी कोटीशः कृतज्ञता !’’

(यासंदर्भात सत्कार सोहळ्याच्या वेळी सद्गुरु (सौ.) बिंदा सिंगबाळ म्हणाल्या, ‘‘वयाच्या ९ व्या वर्षी भूक लागलेली असतांनाही कु. प्रेरणा सेवेला आनंदाने गेली. अपेक्षा नसल्यामुळे देव भरभरून देतो. स्वेच्छा देव पूर्ण करत नाही. तिच्यातील भावामुळे देव सर्व करतो.’’)

१५. अनुभूती

१५ अ. देवाच्या कृपेने जन्मानंतर पायाला प्लास्टर घालण्याचे टळणे : जन्माच्या वेळी कु. प्रेरणाचा उजवा पाय आपोआप डोक्यापर्यंत वर जात होता. तेव्हा आधुनिक वैद्यांनी ‘सव्वा मास (महिना) तिचा पाय ‘प्लास्टर’मध्ये ठेवावा लागेल. त्यासाठी उद्या या’, असे सांगितले. त्यानंतर दुपारी देवाच्या कृपेने एका आजीने तिचा पाय कापडात गुंडाळून ठेवला. तसे केल्यानंतर संध्याकाळपर्यंत तो पाय नीट झाला. तेव्हा आधुनिक वैद्यांनी ‘आता प्लास्टर घालण्याची आवश्यकता नाही’, असे सांगितले. त्या वेळी सर्वांनाच आश्‍चर्य वाटले.

१५ आ. नामजप लिहिलेल्या वहीतील शाई पुसली जाऊनही अक्षर न पुसणे : प्रेरणा १४.४.२०१८ या दिवसापासून ‘श्री गुरुदेव दत्त ।’ हा नामजप वहीत लिहित होती. वही पूर्ण भरल्यानंतर तिने ती कपाटात ठेवली. दोन मासानंतर वही उघडून पाहिली असता वहीतील काही पानांवरील नामजपाच्या अक्षरांची (पेनची) शाई पूर्णपणे पुसली गेली होती; पण नामजपाची अक्षरे मात्र ओळखू येत होती. वहीच्या पानाच्या तेवढ्याच भागाला सुदर्शन चक्राप्रमाणे गोलाकार आला होता. बाजूच्या भागातील अक्षरे मात्र तशीच होती.

(यासंदर्भात सत्कार सोहळ्याच्या वेळी सद्गुरु (सौ.) बिंदा सिंगबाळ म्हणाल्या, ‘‘कु. प्रेरणाने भावपूर्ण जप लिहिल्यामुळे वहीतील अक्षरे तशीच राहिली. ‘भगवंत आणि त्याचे नाव शाश्‍वत आहे’, हे कु. प्रेरणाच्या उदाहरणातून लक्षात येते.)

१५ इ. झेंडूच्या एकाच झाडाला केशरी आणि पिवळा अशा दोन्ही रंगांची फुले येणे : प्रेरणाने लावलेल्या एका झेंडूच्या रोपट्याला प्रथम केशरी रंगाची फुले लागली. तिला पिवळा रंग आवडत असल्याने ‘झाडाला पिवळ्या रंगाची फुले यावीत’, असे तिला वाटत होते. त्यानंतर त्या झाडाला पिवळ्या रंगाचीही फुले येऊ लागली. एकाच झाडाला केशरी आणि पिवळा अशा दोन्ही रंगांची फुले येऊ लागली, तसेच ते झेंडूचे झाड झेंडूच्या इतर झाडांपेक्षा ६ मास अधिक काळ टिकले.

१६. स्वभावदोष

हट्टीपणा

‘श्रीकृष्णा, परात्पर गुरु डॉक्टर, तुम्हीच प्रेरणाची ही गुणवैशिष्ट्ये लिहून घेतलीत. त्यासाठी आम्ही तुमच्या चरणी कृतज्ञता व्यक्त करतो.’

– सौ. उज्वला विजय पाटील आणि श्री. विजय जयसिंग पाटील (कु. प्रेरणाचे आई-वडील), मणेेराजुरी, तालुका तासगाव, जिल्हा सांगली. (११.७.२०१९)