अत्यंत प्रगल्भ असलेली आणि लहानपणापासूनच सेवेची ओढ असलेली कु. प्रेरणा पाटील (वय १३ वर्षे) जन्म-मृत्यूच्या फेर्‍यांतून मुक्त !

कु. प्रेरणा पाटील भेटवस्तू देऊन सत्कार करतांना पू. (कु.) रेखा काणकोणकर

रामनाथी (गोवा) – पूर्णवेळ साधना करणे, हे शिवधनुष्य आहे. त्यातही लहान वयात शाळा-महाविद्यालयांच्या मोहातून बाहेर पडून आश्रमात राहून साधनारत राहण्यासाठी मनाचा मोठा त्याग असावा लागतो. आई-वडील, कुटुंबीय, मित्र-मैत्रिणी यांच्यापासून दूर राहून केवळ ईश्‍वरप्राप्तीसाठी प्रयत्न करणार्‍या अशा निरागस जिवांवर ईश्‍वरही भरभरून कृपावर्षाव करत असतो. लहानपणापासूनच धर्माचरणी असलेली, प्रगल्भ विचार असलेली, सेवेची ओढ असलेली आणि अवघ्या १२ व्या वर्षी देवाच्या ओढीने मणेराजुरी, जिल्हा सांगली येथून रामनाथी आश्रमात पूर्णवेळ साधना करण्यासाठी आलेली बालसाधिका कु. प्रेरणा विजय पाटील (वय १३ वर्षे) आज जन्म-मृत्यूच्या फेर्‍यांतून मुक्त झाली. मार्गशीर्ष शुक्ल पक्ष षष्ठी (२.१२.२०१९) या दिवशी कु. प्रेरणा हिचा वाढदिवस होता. या दिवशीच ‘कु. प्रेरणा पाटील हिने ६१ टक्के आध्यात्मिक पातळी गाठली असल्याची घोषणा सनातनच्या सद्गुरु (सौ.) बिंदा सिंगबाळ यांनी केली अन् कु. प्रेरणाच्या वाढदिवसाचा आनंद द्विगुणित केला. सनातनच्या संत पू. (कु.) रेखा काणकोणकर यांनी भेटवस्तू आणि प्रसाद देऊन कु. प्रेरणा हिचा सत्कार केला. या वेळी कु. प्रेरणासह आश्रमात पूर्णवेळ साधना शिकण्यासाठी आलेल्या साधकांनी कु. प्रेरणाची गुणवैशिष्ट्ये कथन केली.

‘अशीच प्रगती करून संतपदापर्यंत जाशील’, असे आशीर्वचन या वेळी सद्गुरु (सौ.) बिंदा सिंगबाळ यांनी दिले. 

अशी केली घोषणा !

रामनाथी आश्रमात पूर्णवेळ साधना शिकण्यासाठी आलेल्या साधकांसाठी सद्गुरु (सौ.) बिंदा सिंगबाळ यांच्या मार्गदर्शनाचे आयोजन करण्यात आले होते. त्या वेळी कु. प्रेरणा हिचा वाढदिवस असल्यामुळे सर्वांनी तिला शुभेच्छा दिल्या. रामनाथी आश्रमात साधकांचा वाढदिवस साजरा करतांना त्यांनी पुढील वर्षभरासाठी साधनेच्या दृष्टीने कोणता संकल्प केला, तेही जाणून घेतात. तसे कु. प्रेरणा हिला विचारले असता तिने ‘प्रत्येक चूक स्वीकारून ईश्‍वरप्राप्ती करणार’, असा संकल्प केल्याचे सांगितले. वयाच्या अवघ्या १२ व्या वर्षी केलेल्या प्रेरणाच्या या संकल्पानेच सर्वांना अंतर्मुख केले. ‘तिचा ईश्‍वरप्राप्तीचा निश्‍चय किती ठाम आहे’, ‘तिची कोणत्याच गोष्टीविषयी तक्रार नसते. तिला ईश्‍वरप्राप्तीचा ध्यास आहे’, असे मनोगत साधकांनी या वेळी सांगितले. त्यानंतर सद्गुरु (सौ.) बिंदा सिंगबाळ यांनी हे गोड गुपित उघड केले. सद्गुरु (सौ.) बिंदाताई म्हणाल्या, ‘‘साधनेची आवड असल्यामुळे ती लहान वयातच सर्व सोडून आली. मागच्या जन्मीची साधना असल्यामुळे तिला पूर्णवेळ साधनेची संधी मिळाली. आजच्या वाढदिवसाला तिला भगवंताने अमूल्य भेट दिली आहे. कु. प्रेरणाला देवाने जन्म-मृत्यूच्या फेर्‍यांतून मुक्त केले आहे. ती एक भाग्यवान जीव आहे.’’

कु. प्रेरणा पाटील – देवाने सर्व करवून घेतले !

सर्व देवानेच करवून घेतले; पण श्रेय आपल्याला देतो.

सद्गुरु (सौ.) बिंदा सिंगबाळ – तिची प्रत्येक गोष्ट सुंदर आहे; म्हणून ती देवाला आवडते !

कु. प्रेरणाची प्रत्येक गोष्ट सुंदर आहे. तिच्यात मनाची निर्मळता, सेवेची तळमळ, असे अनेक दैवी गुण आहेत. तिचे गुण पाहायला, ऐकायला आणि अनुभवायला मिळाले, हे आपले भाग्य आहे. प्रेरणा ही गुणी मुलगी आहे; म्हणून देवाला ती आवडते. ईश्‍वरप्राप्तीचा पुढील प्रवासही ती शीघ्रतेने करेल. शुद्ध, निर्मळ मनात भगवंत अवतरतो. तिच्यासारखे गुण सर्वांनी वाढवूया आणि स्वभावदोष अन् अहं घालवण्यासाठी प्रयत्न करूया. सर्वांनी देवाला अपेक्षित असे होऊया.

पू. (कु.) रेखा काणकोणकर – कु. प्रेरणाची सर्व प्रकारच्या सेवा करण्याची सिद्धता असते !

कु. प्रेरणा कोणत्याही सेवेला नाही म्हणत नाही. ती वयाने लहान असल्यामुळे तिला अधिक वेळ झोप घेता यावी; म्हणून तिला सांगितले की, सकाळी ८ वाजता सेवेला ये. त्या वेळी ती म्हणाली की, नको लवकरच येते; मला सेवा करायची आहे.

क्षणचित्रे

१. जेव्हापासून कु. प्रेरणाला पाश्‍चात्त्यांच्या पद्धतीने वाढदिवस साजरा करण्याचे आध्यात्मिक दुष्परिणाम समजले आहेत, तेव्हापासून तिला ‘वाढदिवस सात्त्विक पद्धतीने साजरा करायला हवा’, असे वाटते. यंदा ‘आश्रमात तिचा वाढदिवस साजरा करणार’, याचा आनंद झाला होता.

२. या सत्संगानंतर कृतज्ञता व्यक्त केली, तेव्हा अनेक साधकांना सुंदर अनुभूती आल्या. केवळ दीड घंट्याच्या सत्संगानंतर उपस्थित साधकांना आध्यात्मिक स्थिती अनुभवता आली. ‘हलके वाटले’, ‘निळा प्रकाश जाणवला’, ‘श्रीकृष्णाचे सुदर्शनचक्र फिरत आहे’, ‘वातावरण स्तब्ध झाले आहे’, अशा प्रकारच्या अनुभूती साधकांना आल्या. ६७ टक्के आध्यात्मिक पातळी असलेल्या कु. स्वाती गायकवाड यांना या कृतज्ञतेच्या वेळी ‘क्षीरसागरात श्रीविष्णु पहुडले आहेत’, असे दिसले. ‘तेथील अत्यंत शांत वातावरणात क्षीरसागराच्या लाटांचा नाद कसा असेल’, ते अनुभवता आले.

साधकांनी व्यक्त केलेले मनोगत !

१. कु. म्रिण्मई केळशीकर : तिचे साधनेचे दृष्टीकोन पक्के असल्याने तिच्या नित्य आचरणात ते दिसून येते. एकदा काही बालसाधक तिची थट्टा करत होते. त्या वेळी तिने अत्यंत शांतपणे सांगितले, ‘‘तुम्ही चिडवल्यामुळे मला राग नाही आला; मात्र यामुळे तुमची साधना खर्च होईल.’’ ती अबोल असली, तरी तिच्यात प्रेमभाव आहे. साधकाच्या मनाची स्थिती कशी आहे, हे तिच्या सहजतेने लक्षात येते आणि ती साधकांना साहाय्यही करते.

२. श्री. सोनीकर : कु. प्रेरणा वयाने लहान आणि अबोल असली, तरी स्वतःची सेवा करतांना तिला इतरांच्या काही चुका लक्षात आल्या, तर ती त्या लगेच सांगते. त्या वेळी तिची तत्त्वनिष्ठा लक्षात येते.

स्वतःची प्रगती व्हायला हवी, तर पूर्ण अंतर्मुख झाले पाहिजे ! – सद्गुरु (सौ.) बिंदा सिंगबाळ

पूर्णवेळ साधना शिकण्यासाठी आलेल्या साधकांना मार्गदर्शन !

सद्गुरु (सौ.) बिंदा सिंगबाळ

१. साधकाला आतून घडवते, ती सेवा !

परात्पर गुरु डॉ. आठवले स्थूल रूपातून सर्वत्र असू शकत नाहीत. ते संतांच्या रूपाने, आध्यात्मिक उन्नती झालेल्या साधकांच्या माध्यमातून आपल्याला भेटतात. पू. (कु.) रेखा काणकोणकर आता परात्पर गुरु डॉक्टरांना भेटण्याचे माध्यम आहेत. स्वयंपाकघरातील लहान लहान कृतीही कशा करायच्या, त्याचे बारकावे पू. रेखाताई सांगतात. पू. रेखाताईंच्या मार्गदर्शनाचा पूर्ण लाभ होण्यासाठी प्रयत्न करा. संगणकीय सेवा सर्वजण आनंदाने निवडतात; मात्र भांडी घासणे, ओटा पुसणे अशा सेवा करतांना संघर्ष होतो. या सेवांच्या माध्यमातून देवच आपली अंतर्बाह्य स्वच्छता करतो. साधकाला आतून घडवते, ती सेवा !

या प्रक्रियेत संघर्ष करून सहभागी झालो, तर वेळ लागेल; मात्र प्रक्रियेला जेवढ्या सहजतेने सामोरे जाऊ, तेवढा आनंद मिळेल.

२. खरा साधक ‘स्वतःचे काय चुकले’, ते विचारून घेऊन प्रयत्न करतो !

आपण घरून आश्रमात येतो, तेव्हा बंधनांची सवय नसते. आश्रमात समष्टी साधना करतांना आपल्या वागण्या-बोलण्यावर अनेक बंधने येतात. त्या वेळी स्वतःच्या मनासारखे होत नाही; म्हणून संघर्ष होतो. आपल्याला सत्य स्वीकारण्याची सवय नसते; म्हणून चुका सांगणार्‍यांची भीती वाटते. प्रतिमा जपल्यामुळे चुका सहजतेने स्वीकारता येत नाहीत. चुका झाल्या, तरी कोणी ‘आपल्याला सहन होणार नाही’, अशी शिक्षा तर करत नाही ना ?’, अशी भीती वाटते. आपल्याला देवाने साधनेसाठी सर्व प्रकारची अनुकूलता दिली आहे. देवाला प्रक्रियेच्या माध्यमातून आपली चित्तशुद्धी आणि मनोदेह, कारणदेह अशी सप्तदेहांची शुद्धी करायची आहे, तर मग आपल्याला चुकांची भीती का वाटते ? ‘स्वतः आदर्श आहोत’, असे ज्याला वाटते, त्याला स्वतःकडून अपेक्षा असतात, इतरांनी स्वतःचे कौतुक करावे, अशीही अपेक्षा असते. कौतुकाने अहं सुखावतो. खरा साधक ‘स्वतःचे काय चुकले’, ते विचारून घेऊन प्रयत्न करतो. त्यानंतर त्याचा प्रवास साधक-शिष्य-संत असा होतो.

३. चुका सांगणार्‍याच्या माध्यमातून देवच आपल्याला ईश्‍वरप्राप्तीच्या दिशेने घेऊन जातो

आपण एकटे काहीच करू शकत नाही. संघभावाने, इतरांचे साहाय्य घेऊन साधनेत पुढे पुढे जाता येते. आपल्याला इतरांचेही ऐकता यायला हवे. वयाने लहान असलेल्यांचेही ऐकता यायला हवे. परात्पर गुरु डॉक्टरांचा सहवास यापूर्वी ज्या साधकांनी अनुभवला आहे, त्या साधकांकडून आपल्याला हे समजू शकते की, परात्पर गुरु डॉक्टर किती खोलवर जाऊन साधकाकडून चुकीसंदर्भातील चिंतन करून घेतात. संत आणि साधक यांपेक्षा चुका सांगणार्‍याच्या माध्यमातून देवच आपल्याला ईश्‍वरप्राप्तीच्या दिशेने घेऊन जात असतो. जो चुका सांगतो, त्याच्या चुका आपण नको पाहायला. केवळ स्वतःच्याच चुका पाहायच्या. ‘साधकाने आपल्या चुका सांगितल्या; म्हणून आपणही त्याच्या चुका सांगूया’, ही सूडवृत्ती आणि बहिर्मुखता झाली. अशाने आपण कधीच सुधारणार नाही. त्यात स्वतःचाच वेळ जाणार. स्वतःची प्रगती व्हायला हवी, तर पूर्ण अंतर्मुख झाले पाहिजे.

‘कु. प्रेरणा लहान असल्यामुळे तिने सांगितलेल्या चुका स्वीकारतांना संघर्ष होतो’, असे एका साधकाने सांगितले. त्या वेळी सद्गुरु ताई म्हणाल्या की, चुका सांगणार्‍यांचे वय पाहू नका. समाजात वय, पद, शिक्षण यांना महत्त्व दिले जाते; मात्र साधनेत यादृष्टीने पाहिले जात नाही. त्या जिवाची मागील किती जन्मांची साधना आहे, ते आपल्याला ठाऊक नसते. संत जनाबाई आणि संत मुक्ताई यांचे वय अन् शिक्षण आपण कुठे पाहतो ?

४. भावासह सेवा करा !

इमारतीचा पाया पक्का असेल, तरच ती इमारत चांगली होते. वास्तूचा पाया चांगला होण्यासाठी भूमीपूजन करतात. तसेच साधनेच्या इमारतीचा पाया  पक्का होण्यासाठी प्रक्रियेचे प्रयत्न झोकून देऊन केले, तर पुष्कळ लाभ होतो. जमेल ते करा; पण भावासहित करा. भावासह सेवा केल्यामुळे ‘देवामुळे झाले’, याची जाणीव राहते.