लोकलमध्ये महिलांची छळवणूक होत असल्याचा सर्वेक्षणातून निष्कर्ष

समाजकंटकांकडून होणारा छळ रोखण्यासाठी महिलांनीही स्वरक्षण प्रशिक्षण घेऊन सक्षम व्हावे !

(प्रतिकात्मक चित्र)

मुंबई – मुंबई रेल्वे विकास महामंडळाने केलेल्या सर्वेक्षणानुसार उपनगरीय रेल्वे मार्गावरून प्रवास करणार्‍या महिलांचा समाजकंटकांकडून छळ केला जातो. (आता तरी रेल्वे पोलीस प्रशासन यावर ठोस उपाय काढणार का ? – संपादक)

एका खासगी संस्थेच्या साहाय्याने पश्‍चिम रेल्वेच्या विरार ते डहाणू आणि मध्य रेल्वेच्या नेरळ ते कर्जत या स्थानकांदरम्यान प्रवास करणार्‍या महिलांचे नुकतेच सर्वेक्षण करण्यात आले.

पश्‍चिम रेल्वेमार्गावर ४५ टक्के महिलांपैकी केवळ एक चतुर्थांश महिला तक्रार प्रविष्ट करण्यासाठी पुढे येतात, तर मध्य रेल्वेमार्गावर ६० टक्के महिला तक्रार प्रविष्ट करतात. काही महिला सुरक्षा हेल्पलाईनच्या साहाय्याने आपली समस्या सोडवतात. वरील मार्गांवर रेल्वेच्या फेर्‍या अल्प असल्यामुळे गर्दीचे प्रमाण अधिक आहे. ऐन गर्दीच्या वेळी आसनव्यवस्था उपलब्ध न झाल्याने महिलांना उभ्यानेच प्रवास करावा लागतो. अनेक महिलांना रेल्वे स्थानकावर, तसेच लोकलच्या डब्यात प्रवेश करतांना खाद्यपदार्थांचे अनधिकृत कक्ष, फेरीवाले यांचा त्रास सहन करावा लागतो. या सर्वांवर नियंत्रण ठेवण्यासाठी महिलांच्या डब्यात महिला पोलीस ठेवण्याची मागणी केली जात आहे.