भाजप अल्पमताचे सरकार स्थापन करणार नाही, महायुतीचे शासन येईल ! – सुधीर मुनगंटीवार

श्री. सुधीर मुनगंटीवार

मुंबई – शिवसेनेशी सत्तास्थापनेविषयी काही स्तरावर चर्चा चालू आहे. भाजप अल्पमताचे सरकार स्थापन करणार नाही. आम्हाला महायुतीचे शासन आणण्याची इच्छा आहे, असे प्रतिपादन भाजपचे नेते सुधीर मुनगंटीवार यांनी पत्रकार परिषदेत केले. ७ नोव्हेंबर या दिवशी सुधीर मुनगंटीवार आणि भाजपचे प्रदेशाध्यक्ष आमदार चंद्रकांत पाटील यांनी राज्यपालांची भेट घेतली; पण त्या भेटीत सत्तास्थापनेविषयी कोणतीही चर्चा करण्यात आलेली नाही. शिवसेना मुख्यमंत्रीपदावर ठाम राहिल्याने आणि सत्तास्थापनेविषयी अद्यापही धोरण निश्‍चित झालेले नसल्याने मुनगंटीवार यांनी पत्रकार परिषदेत ‘आज सत्ता स्थापनेसाठी दावा करणार नाही’, अशी भूमिका स्पष्ट केली.

या वेळी पत्रकारांच्या प्रश्‍नांना उत्तर देतांना मुनगंटीवार म्हणाले की, शिवसेनेचे आमदार फोडण्याचा प्रश्‍नच येत नाही; मात्र जनमताचा आदर करण्यात यावा, ही इच्छा आहे. भाजप चर्चेसाठी कितीही पावले पुढे येण्यास सिद्ध आहे. तसेच भाजप अन्य कोणत्याही पर्यायांचा विचार करणार नाही. काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस यांची विरोधी पक्षात बसण्याची भूमिका आहे. देवेंद्र फडणवीस यांना शिवसैनिक समजावे आणि त्यांच्या रूपाने शिवसेनेचाच मुख्यमंत्री होईल.

अडीच वर्षांच्या मुख्यमंत्रीपदाचा प्रस्ताव आल्यास बोलणी चालू होतील ! – संजय राऊत

मुंबई – ‘ठरल्याप्रमाणे करा’, असा आमचा एका ओळीचा प्रस्ताव आहे. आमच्याकडे पर्याय असून त्याविना आम्ही बोलत नाही. आमच्याकडे संख्याबळ झालेले आहे, ते आम्ही सभागृहात दाखवू. शिवसेना आशेवर नाही, तर आत्मविश्‍वासावर जगते. भाजपकडून अडीच-अडीच वर्षे मुख्यमंत्रीपदाचा प्रस्ताव आल्यास बोलणी चालू होतील, अशी भूमिका शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी ७ नोव्हेंबरला पत्रकार परिषदेत घोषित केली.

या वेळी खासदार राऊत पुढे म्हणाले की, शिवसेना आणि श्री. उद्धव ठाकरे नेहमी भूमिकेवर ठाम राहिले आहेत. भाजप त्याच्या भूमिकेवर ठाम आहे का ?, हा प्रश्‍न आहे. शिवसेनेच्या सगळ्या आमदारांनी एकमुखाने श्री. उद्धव ठाकरे यांच्या भूमिकेला पाठिंबा दिला आहे. ते जो निर्णय घेतील, तो आम्हाला मान्य असेल. जर जनादेश मिळाला आहे, तर भाजप सत्तास्थापनेचा दावा का करत नाही ? वर्ष २०१४ ची आणि आताची परिस्थिती यांमध्ये भेद आहे. स्वत:ला शिवसैनिक म्हणत असाल, तर शिवसैनिकाप्रमाणे शब्द पाळा. सगळ्यात मोठा पक्ष असूनही भाजप सत्ता स्थापन करत नाही, याचा अर्थ असा होतो की, ते संख्याबळ जमवू शकलेले नाहीत. ‘सत्ता स्थापन करण्यास आम्ही असमर्थ आहोत’, हे भाजपने घोषित करावे, मग शिवसेना पुढील कार्यवाही करील. आम्ही महाराष्ट्रात शिवसेनेचा मुख्यमंत्री बनवणारच.