परात्पर गुरु डॉक्टर आठवले यांच्या नुसत्या आठवणीनेही बालकासमान रडणारे निर्मळ मनाचे कणकवली, सिंधुदुर्ग येथील पू. रघुनाथ राणे आजोबा !

पू. रघुनाथ राणे

१. नोकरी न करता वडिलांना साहाय्य करण्यासाठी शेती करणे आणि उत्तम शेतकरी म्हणून पुरस्कार मिळवणे

‘पू. रघुनाथ राणेआजोबा एकत्र कुटुंबात राहायचे. त्यांना ५ भाऊ आणि २ बहिणी आहेत. पू. राणे आजोबांचे शिक्षण जुन्या ७ व्या इयत्तेपर्यंत झाले आहे. त्यांना शिक्षकाच्या नोकरीसाठी बोलावणेही आले होते; पण वडिलांना शेतीच्या कामात साहाय्य करण्यासाठी ते घरीच राहिले. त्यांना उत्तम शेतकरी म्हणून पुरस्कारही मिळाला आहे. पू. आजोबांनी शेती समवेतच ‘आरोग्य रक्षक’ आणि ‘होम गार्ड’ म्हणूनही काम केले आहे.

२. साधना चालू केल्यावर कुलदेवीचे दर्शन होणे

पू. आजोबांनी सनातन संस्थेच्या माध्यमातून साधना चालू केल्यावर केवळ ३ दिवसांतच त्यांची कुलदेवता श्री महाकाली देवी हिने त्यांना दर्शन दिले. तेव्हापासून आजोबांची साधना जोमाने चालू झाली.

३. गुरुदेवांची प्रथम भेट जशीच्या तशी आठवणे

कणकवली येथेे झालेल्या सभेच्या वेळी पू. आजोबांची आणि परात्पर गुरु डॉ. आठवले यांची पहिली भेट झाली. दोघांनीही एकमेकांकडे बघून नमस्कार केला. तो क्षण आजोबांना अजूनही जसाच्या तसा आठवतो.

४. साधनेमुळे राग न्यून होणे

साधनेत येण्यापूर्वी पू. आजोबांचा स्वभाव रागीट होता. साधना करता करता त्यांचा राग न्यून होऊन त्यांच्यातील प्रेमभाव वाढला.

५. सध्या प्रकृती अस्वास्थ्यामुळे विचार व्यक्त करू न शकणे

आता पू. आजोबांना प्रकृती अस्वास्थ्यामुळे काही सांगताही येत नाही आणि लिहिताही येत नाही. वरील माहिती त्यांचा मुलगा श्री. सूर्यकांत राणे यांनी दिली. ते म्हणाले, ‘‘सध्या पू. आजोबांच्या मनाची स्थिती काय आहे ?’, हे त्यांनाच ज्ञात आहे; पण ते व्यक्त करू शकत नाहीत.’’

६. परात्पर गुरुदेवांच्या आठवणीने भाव दाटून येणे

पू. आजोबांना भेटून त्यांची माहिती घेऊन मी तेथून निघाले. तेव्हा आजोबा अगदी लहान मुलासारखे रडायला लागले. त्यांचा भाव दाटून आला होता. त्यांना बघून माझाही भाव दाटून आला. ‘त्यांना पुष्कळ काही सांगायचे आहे, बोलायचे आहे. त्यांना परात्पर गुरुदेवांची पुष्कळ आठवण येऊन रडू येत आहे’, असे मला त्यांच्याकडे बघून वाटत होते.

‘परात्पर गुरुदेव, तुम्हीच मला पू. आजोबांसारखी भक्ती करायला शिकवा’, हीच तुमच्या कोमल चरणी प्रार्थना आहे.’

– सौ. सुनीता पाटील, ठाणे (२८.७.२०१८)