आज्ञापालन आणि प.पू. डॉ. आठवले यांना अपेक्षित अशी प्रत्येक कृती करण्यासाठी तत्पर असलेले पू. रघुनाथ राणेआजोबा (वय ८१ वर्षे) !

वाढदिवसानिमित्त पू. राणेआजोबा यांच्या चरणी सनातन परिवाराचा शतशः नमस्कार !

‘कार्तिक शुक्ल पक्ष एकादशी (८.११.२०१९) या दिवशी पू. रघुनाथ वामन राणे (पू. राणेकाका) यांचा वाढदिवस आहे. सेवाकेंद्रातील आम्हा सर्व साधकांना पू. राणेकाकांचा ५ वर्षे सत्संग लाभला. या अनमोल सत्संगातून त्यांची लक्षात आलेली गुणवैशिष्ट्ये आणि शिकायला मिळालेली सूत्रे येथे देत आहे.

पू. रघुनाथ राणे

१. गुणवैशिष्ट्ये

१ अ. साधी राहणी आणि टापटीपपणा : पू. राणेकाका हे अगदी साधेपणाने राहत असत. त्यांचे वैयक्तिक साहित्य आणि कपडे अल्प प्रमाणात अन् गरजेपुरतेच होते. सर्व साहित्य एका पिशवीत व्यवस्थित ठेवलेले असायचे. पू. काकांना एखाद्या वस्तूची आवश्यकता लागली, तर ते तेवढीच वस्तू बाहेर काढून घेत असत.

१ आ. नियोजनबद्ध दिनक्रम : पू. काकांचा दिनक्रम ठरलेला असे. पू. काकांनी वैयक्तिक आणि सेवेचे नियोजन कधी लिखित स्वरूपात ठेवले नाही. पू. काकांना ‘पाडिले वळण इंद्रिया सकळा’ हे वर्णन तंतोतंत लागू पडते. पहाटे उठण्यासाठी त्यांनी कधीही गजर लावला नाही किंवा ‘मला जाग आली नाही, तर उठवा’, असे कधी सांगितले नाही. पू. काका पहाटे ३ वाजता उठून नामजप पूर्ण करीत असत. त्यानंतर चूल पेटवून पाणी तापले की, आवरून सकाळी ६.४५ वाजता सिद्ध असत.

१ इ. उत्तम स्मरणशक्ती : पू. राणेकाका यांची स्मरणशक्ती उत्तम होती. कोणती घटना कधी घडली, सेवाकेंद्रात नवीन आलेला साधक कधी आला, कधी गेला, हे पू. काकांच्या बरोबर लक्षात असायचे. ते घडलेले काही वैशिष्ट्यपूर्ण प्रसंग उदाहरण म्हणून सांगत असत.

१ ई. आज्ञापालन : पू. काकांच्या प्रत्येक कृतीतून ‘आज्ञापालन’ हा गुणांचा राजा आहे, हे आम्ही शिकलो. पू. बाबा नाईक यांनी सांगितलेल्या प्रत्येक सूत्राचे पू. काका कटाक्षाने पालन करत.

२. शिकायला मिळालेली सूत्रे

२ अ. स्वतःच्या सेवेची पूर्वसिद्धता करणे आणि साधकांना त्यांच्या सेवेची आठवण करून देणे : पू. काका कोणतीही नवीन सेवा करण्यापूर्वी त्या सेवेची पूर्वसिद्धता करत असल्याने पू. काकांचा वेळ कधीही वाया जात नाही. तसेच ते सेवेसाठी वापरलेले साहित्य प्रतिदिन स्वच्छ करून आणि धुऊन ठरलेल्या जागेवर ठेवत असत. समष्टी सेवा करतांना इतर साधकांचा वेळ वाया जाऊ नये, यासाठी ते साधकांच्या सेवेच्या संदर्भातील गोष्टी लक्षात ठेवून त्यांना त्याविषयी आठवण करून देत असत.

२ आ. मुले आणि पुतणे यांच्यावर घरातील दायित्व सोपवून गावी जाणे-येणे थांबवणे : पू. काका प्रतिवर्षी गणेशोत्सव आणि गावातील वार्षिक यात्रेसाठी आवर्जून घरी जात असत. नंतर पू. काकांनी मुले आणि पुतणे यांच्यावर घरातील दायित्व सोपवून गावी जाणे-येणे थांबवले.

२ इ. ‘आढावा हा आपला आरसा आहे’, असा दृष्टीकोन ठेवून ‘परात्पर गुरु डॉक्टरांना अपेक्षित असेच झाले पाहिजे’, असे पू. काकांनी सांगणे : पू. काका सत्संगाला अधिक महत्त्व देत असत. ‘आढावा हा आपला आरसा आहे’, असा दृष्टीकोन ठेवून ‘परात्पर गुरु डॉक्टरांना अपेक्षित असेच झाले पाहिजे’, असे पू. काका सर्व साधकांना सांगत असत. हे सांगतांनाही प्रसंगाचे गांभीर्य आणि परिस्थिती लक्षात घेऊन कधी कठोरपणाने, तर कधी सौम्यपणाने सांगत असत.

२ ई. परिस्थिती स्वीकारणे : पू. काकांच्या प्रकृती अस्वास्थ्यामुळे सेवाकेंद्रात राहण्यासारखी त्यांची शारीरिक स्थिती नव्हती. त्या वेळी पू. काकांना विचारल्यावर ते म्हणाले, ‘‘प.पू. गुरुदेव मला जिथे राहायला सांगतील, तिथे मी आनंदाने राहीन.’’ त्यानंतर ते मुलाकडे राहायला गेले.

२ उ. सेवाकेंद्राच्या जागेचा उपयोग करून २ वर्षे भात शेती, नाचणी, वरी आणि सोयाबीन यांची पिके काढणे : सेवाकेंद्रात भरपूर जागा आहे. पू. काकांनी त्या जागेचा विचार आणि पाहणी करून पू. बाबा नाईक यांच्या मार्गदर्शनानुसार प्रत्येक ठिकाणच्या साधकांचे नियोजन करून भात शेती, नाचणी, वरी आणि सोयाबीन यांची २ वर्षे पिके काढली. या शेतीच्या सेवेत पू. काकांनी साधिकांचाही समावेश करून घेतला. त्यामुळे प्रत्येकाला शेतीची माहिती झाली आणि त्यातील चैतन्याचा अनुभव घेता आला.

२ ऊ. सेवाकेंद्रात प्रतिवर्षी निघणार्‍या उत्पन्नाची नोंद ठेवून आढावा देणे : सेवाकेंद्रात प्रतिवर्षी चिकू, नारळ, केळी आणि पावसाळ्यात सर्व प्रकारच्या भाज्या, कणगरे, गोरकंद, तसेच मिरी ही पिके घेतली जायची. पू. काका या सर्व वस्तूंचे वजन करून बाजारभावाप्रमाणे त्यांची किंमत काढत असत. पू. काका सेवाकेंद्रात निघणार्‍या सर्व उत्पन्नाची नोंद ठेवून प्रतिवर्षी त्यांचा आढावा देत असत.

२ ए. घरी असतांनाही साधकांच्या आध्यात्मिक प्रगतीची चौकशी करणे : पू. काकांना आजारपणामुळे उठ-बस करण्यास आणि चालण्यास त्रास होत असे. पू. राणेकाका त्या अवस्थेतही बसून नामजप करत आणि प्रतिदिन दैनिक ‘सनातन प्रभात’ वाचत. पू. काकांना बोलता येत नसल्याने ते प्रत्येक गोष्ट पाटीवर लिहून त्याविषयीची माहिती विचारत असत. सेवाकेंद्रावर त्यांचे पुष्कळ प्रेम आहे. मी पू. राणेकाकांना भेटण्यासाठी ४ – ५ वेळा त्यांच्याकडे गेलो होतो. त्या वेळी पू. काकांनी साधकांच्या आधात्मिक प्रगतीची चौकशी केली. सेवाकेंद्रात असणार्‍या श्रीमती शेट्येकाकू संत झाल्याचे ऐकून पू. काकांना पुष्कळ आनंद झाला होता. साधक भेटल्यावर पू. काका हसून त्यांचे स्वागत करतात.

३. कृतज्ञता

प.पू. गुरुदेवांच्या कृपेमुळे मला हे लिखाण करण्याची प्रेरणा मिळाली. त्याविषयी प.पू. गुरुमाऊली आणि भगवान श्रीकृष्ण यांच्या चरणी कृतज्ञता व्यक्त करतो आणि ‘आम्हा साधकांमध्ये पू. राणेकाका यांचे गुण येवोत’, अशी प.पू. गुरुमाऊलींच्या चरणी मनोभावे प्रार्थना करतो.’

– श्री. मेघश्याम आंबेकर, ता. खेड, जिल्हा रत्नागिरी. (२.११.२०१९)