वारीची परंपरा अधिकाधिक वृद्धींगत करणारे संत आणि श्रद्धा अन् भक्ती यांद्वारे आजही तो वसा चालू ठेवणारे वारकरी !

कार्तिक शुक्ल पक्ष एकादशीला (८ नोव्हेंबर २०१९ या दिवशी) कार्तिकी एकादशी आहे. त्यानिमित्ताने…

१. ‘वारी’ या शब्दाच्या व्युत्पत्ती

१ अ. वार : ‘अमरकोषात ‘वार’ हा शब्द ‘समुदाय’ या अर्थाने वापरला आहे. यावरून ‘भक्तांचा समुदाय’, असा ‘वारी’ शब्दाचा अर्थ काढता येतो.

१ आ. वारी : संस्कृत भाषेत ‘वारि’ म्हणजे पाणी. पाण्याचा प्रवाह जसा अनेक वळणे घेऊन समुद्राला मिळतो, तसा वारकर्‍यांच्या भक्तीच्या प्रेमाने भारलेला प्रवाह पंढरपूरला येऊन मिळतो.

१ इ. फेरा किंवा खेप : संत ज्ञानेश्‍वरांनी ज्ञानेश्‍वरीत ‘वारी’ हा शब्द ‘फेरा’ किंवा ‘खेप’ या अर्थाने वापरला आहे. ‘ही वारी कधी चालू झाली ?’, याविषयी विद्वानांमध्ये मतभेद आहेत; मात्र ‘ज्ञानेश्‍वर माऊलींनी ‘वारी’ची महती अधिक प्रमाणात वाढवली’, असे म्हणता येईल.

१ ई. पदोपदी भगवंताचे कीर्तन करणे म्हणजे वारी : श्री शिवलीलामृत ग्रंथात श्रीधरस्वामी म्हणतात,

    ‘ज्यासी न घडे सत्समागम । त्याने करू जावे तीर्थाटन ॥’ – श्रीधरस्वामी

अर्थ : प्रतिदिनच्या रहाटगाडग्यात ज्याला सत्समागम होत नाही, त्याने तीर्थाटन करावे.

हे करतांना आपोआपच संतदर्शन होते. पंढरपूरच्या वारीत या दोन्ही गोष्टी होतात. सर्व जातीभेद विसरून ‘वासुदेवः सर्वम् ।’ म्हणजे ‘सर्वकाही वासुदेवच आहे’, याचा बोध घेत जनसामान्यही भक्तीचा रस चाखू शकतात. केवळ पायी चालणे म्हणजे वारी नसून पदोपदी भगवंताचे कीर्तन करणे म्हणजे वारी.

२. प्राचीन काळापासून प्रतिष्ठित असलेले पंढरपूर

पद्मपुराण आणि स्कंदपुराण यांतील उल्लेखावरून ‘पंढरपूर हे देवस्थान प्राचीन काळापासून प्रतिष्ठित होते’, असे दिसते. तेव्हापासून लोक पंढरपूरला दर्शनासाठी येत होते.

३. भक्त पुंडलिकाने मागितलेला वर

‘भक्त पुंडलिकाने पांडुरंगाकडे ‘दर्शनास आलेल्या सर्वांची पापे नष्ट कर’, असा वर मागितला’, असा उल्लेख पद्मपुराणात आहे.

४. ‘रुसून गेलेल्या रुक्मिणीच्या शोधार्थ श्रीकृष्ण दिंडीरवनात (आजचे पंढरपूर) आला आणि पुंडलिकासाठी तिथेच उभा राहिला’, अशी आख्यायिका असणे

एकदा रुक्मिणी श्रीकृष्णावर रुसून दिंडीरवनात गेली. श्रीकृष्ण तिला शोधत-शोधत दिंडीरवनात पुंडलिक जेथे आई-वडिलांची सेवा करत होता, तेथे आला. पुंडलिकाने दिलेल्या विटेवर श्रीकृष्ण तिथेच ‘अठ्ठावीस युगे’ उभा राहिला.

‘इति स्तुत्वा ततो देवं प्राह गद्गदया गिरा ।
    अनेनैव स्वरूपेण त्वया स्थेयं ममान्तिके ॥
    ज्ञानविज्ञानहीनानां मूढानां पापिनामपि ।
    दर्शनान्ते भवेन्मोक्षः प्रार्थयामि पुनः पुनः ॥ – स्कन्दपुराण

अर्थ : त्यानंतर अशा प्रकारे स्तुती करून तो आनंदाने देवाला म्हणाला, ‘‘आपण याच रूपामध्ये माझ्याजवळ राहावे. आपल्या केवळ दर्शनाने मूढ, अज्ञानी आणि पापी लोकांनाही मुक्ती मिळावी’, अशी आपल्या चरणी मी पुनःपुन्हा प्रार्थना करतो.’’

५. पहिली वारी

‘श्रीकृष्णाने श्री विठ्ठलाच्या रूपात विटेवर उभे राहून सर्व भक्तांचा उद्धार करावा’, हा वर पुंडलिकाने देवाकडे मागितला आणि तेव्हापासून ही ‘वारी’ चालू झाली. वारकरी पंथातील काही सांप्रदायिक भक्तांची अशीही एक धारणा आहे की, पहिली वारी महादेवाने केली.

६. इसवी सनाच्या आठव्या शतकात आदिशंकराचार्यांनी ‘पांडुरंगाष्टक’ नावाने प्रासादिक लिहिलेले एक स्तोत्र

महायोगपीठे तटे भीमरथ्या वरं पुण्डरीकाय दातुं मुनीन्द्रैः ।
समागत्य निष्ठन्तमानन्दकन्दं परब्रह्मलिङ्गं भजे पाण्डुरङ्गम् ॥
– आदिशंकराचार्य कृत पाण्डुरङ्गाष्टकम्

अर्थ : भीमा नदीच्या काठी असलेल्या महायोगपिठावर पुंडलिकाला वर देण्यासाठी मुनिश्रेष्ठांसह आलेल्या, आनंदाचा स्रोत असणार्‍या, परब्रह्मस्वरूप अशा पांडुरंगाची मी पूजा करतो.

७. वारीची परंपरा अधिकाधिक वृद्धींगत करणारे संत

संत ज्ञानदेव, संत नामदेव, संत एकनाथ आणि संत तुकाराम या प्रमुख संतांनी वारीची परंपरा अधिकाधिक वृद्धींगत केली. हा वसा अगदी आजपर्यंतच्या पालखी आणि दिंडी सोहळ्यात पाहावयास मिळतो.

७ अ. संत ज्ञानेश्‍वर

७ अ १. सर्व जाती आणि पंथ यांच्या लोकांना भक्तीमार्ग कळावा; म्हणून ‘विठ्ठल’नामाचा गजर करत पंढरपूरला पायी जाण्याचा वारीरूपी प्रवाह वृद्धींगत करणारे संत ज्ञानेश्‍वर ! : संत ज्ञानेश्‍वरांच्या आधी पंढरपूर हे देवस्थान प्रसिद्ध होते. ज्ञानेश्‍वरांचे आजोबा सिधोपंत हेही पंढरीचे वारकरी होते. पुढे ज्ञानेश्‍वरांनी या वारीला एक विशाल स्वरूप प्राप्त करून दिले. सर्व जाती आणि पंथ यांच्या लोकांना भक्तीमार्ग कळावा; म्हणून ‘विठ्ठल’नामाचा गजर करत पंढरपूरला पायी जाण्याचा वारीरूपी प्रवाह ज्ञानदेवांनी वृद्धींगत केला.

७ अ २. समाजात भक्तीचा प्रवाह खळाळत राहावा आणि नामस्मरणाचे सोपे तंत्र जनतेच्या मनी रुजावे; म्हणून वारीची परंपरा पुनरुज्जीवित करणारे संत ज्ञानेश्‍वर ! : संत ज्ञानेश्‍वर स्वतः एक सिद्ध पुरुष असून त्यांनी केवळ समाजात भक्तीचा प्रवाह खळाळत राहावा आणि नामस्मरणाचे सोपे तंत्र जनतेच्या मनी रुजावे; म्हणून वारीची परंपरा पुनरुज्जीवित केली. ज्ञानप्राप्ती झाल्यावर सामान्य जनांप्रती असलेली कणव या साधु पुरुषांच्या आचरणाने स्पष्ट होते. त्यांच्या या विश्‍वात्मक जाणिवेमुळे त्यांना ‘माऊली’ हे बिरुद सार्थ वाटते. ते म्हणतात,

    ‘अवघाची संसार सुखाचा करीन । आनंदे भरीन तिही लोक ।
जाईन गे माये तया पंढरपुरा । भेटेन माहेरा आपुलिया ॥’
– संत ज्ञानेश्‍वर महाराज

अर्थ : हे जग आनंदाने भरून टाकून माझ्या माहेरी, म्हणजे पंढरपुरी जाईन.

७ अ ३. वारी म्हणजे आनंदाने ओसंडून वाहणारे स्नेहसंमेलन : संत ज्ञानेश्‍वरांच्या दृष्टीने वारी हे आनंदाने ओसंडून वाहणारे एक स्नेहसंमेलनच होय. केवळ पायी चालत, टाळ कुटत जाणारे लोक वारकरी नसून पदोपदी ज्यांना देवाची प्रचीती आणि प्रतीती येते, ती वारी. वारीमुळे अहंकार विसरून एकमेकांच्या पायी लोटांगण घालणारे वैष्णव दिसतात. अध्यात्ममार्गावरील अत्यंत महत्त्वाची गोष्ट म्हणजे श्रद्धा आणि भक्ती. श्रद्धा दृढ होण्यासाठी वारीचे प्रयोजन आहे.

७ आ. संत नामदेव : ‘नाचू कीर्तनाचे रंगी । ज्ञानदीप लावू जगी’, ही वारकरी परंपरेची नामदेवांनी दिलेली हाक नंतर संत एकनाथांनी खर्‍या अर्थाने जागृत ठेवली.

७ इ. संत एकनाथ महाराज : संत एकनाथ महाराजांनी वारीची परंपरा पुढे चालू ठेवली. इस्लामी आक्रमणांच्या धामधुमीत महाराष्ट्रात भक्तीपरंपरा वारीच्या माध्यमातून एकनाथांनी चालू ठेवली. यामुळे कठीण काळातही समाज धर्मप्रवण आणि ईश्‍वरार्पित चित्त राहिले. वारकरी संप्रदायाचे महाराष्ट्रावर या अर्थाने मोठे उपकार आहेत. संत एकनाथांनी ग्रंथातील वेदांत भारूडाच्या रूपाने लोकांपर्यंत पोचवला. भागवताच्या एकादश स्कंदावर त्यांनी लिहिलेली प्राकृत टीका ‘एकनाथी भागवत’ नावाने प्रसिद्ध आहे. श्‍लोकांना लोकांपर्यंत पोचवण्याचे हे महत्कार्य संत एकनाथांनी केले; म्हणूनच त्यांना वारकरी पंथाचा ‘खांब’ म्हणतात.

७ ई. संत तुकाराम महाराज : नाथांची परंपरा पुढे संत तुकाराम महाराजांनी चालू ठेवली. वारकरी संप्रदायात तुकोबांचा हा अभंग नित्यपाठात आहे.

    ‘हेचि व्हावी माझी आस । जन्मोजन्मी तुझा दास ।
    पंढरीचा वारकरी । वारी चुको नेदी हरि ।
    संतसंग सर्वकाळ । अखंड प्रेमाचा कल्लोळ ।
    चंद्रभागे स्नान । तुका मागे हेचि दान ॥’

    जसे ज्ञानदेवांचे ‘पसायदान’ प्रसिद्ध आहे, तसे तुकोबांनी मागितलेले हे एक दान आहे.

८. वारकरी पंथाचा सरळसोपा मार्ग

‘भजन, नामस्मरण आणि कीर्तन यांच्या माध्यमातून परमेश्‍वराला प्राप्त करणे’, हा वारकरी पंथाचा सरळसोपा मार्ग आहे. भागवत संप्रदायात याला ‘नवविधा भक्ती’ म्हणतात.

८ अ. नवविधा भक्ती

श्रवणं कीर्तनं विष्णोः स्मरणं पादसेवनम् ।
अर्चनं वन्दनं दास्यं सख्यम् आत्मनिवेदनम् ॥

अर्थ : भगवंताचे श्रवण, कीर्तन, स्मरण, पादसेवन, अर्चन, वंदन, दास्य, सख्य आणि आत्मनिवेदन या नऊ प्रकारच्या भक्ती आहेत.

८ आ. वारीचा मूळ गाभा : श्रवण, कीर्तन, स्मरण, पादसेवन, अर्चन, वंदन, दास्य, सख्य आणि आत्मनिवेदन या नऊ भक्ती एक ‘वारी’ केल्यास सिद्ध होतात अन् ‘याची देही याची डोळा’ माणसाचे जीवन कृतार्थ होते. हा वारीचा मूळ गाभा आहे.

९. हैबतबाबा अरफळकर

या प्रमुख संतांच्या निर्वाणानंतर त्यांच्या नावाने पालख्या आणि दिंड्या नेण्याचा प्रघात हैबतबाबा अरफळकर यांनी चालू केला. हैबतबाबा हे ग्वाल्हेरच्या शिंद्यांच्या दरबारी सरदार होते. त्यांनी सर्वप्रथम ज्ञानेश्‍वरांच्या पादुका गळ्यात बांधून पायी दिंडी काढली. ते लष्करी शिस्तीचे होते. त्यांचे तत्कालीन राजे अन् सरदार यांच्याशी जिव्हाळ्याचे संबंध असल्याने त्यांनी संत ज्ञानेश्‍वर महाराजांच्या पालखीला एक भव्य दिव्य स्वरूप मिळवून दिले. हत्ती, घोडे, पालखी इत्यादी व्यवस्था त्यांनी माऊलींच्या पालखीला करवली. महाराष्ट्रातील प्रमुख संतांच्या पालख्या आजही मोठ्या दिमाखात आणि शिस्तीत आषाढी एकादशीला पंढरपुरात पोचतात.’

(संदर्भ : त्रैमासिक ‘सद्धर्म’, जुलै २०१७)

‘हिंदूंचे ख्रिस्तीकरण व्हावे’, यासाठी लिहिलेला ‘The Cult of Vitthal’ हा ग्रंथ आणि भारतातील आधुनिक पंडितांचा त्यास पाठिंबा !

    ‘भगवान विष्णु भक्तांसाठी पंढरपूरला पांडुरंग (विठ्ठल), पुरीला जगन्नाथ आणि तिरुपतीला व्यंकटेश या रूपांत प्रगटला. ही तिन्ही क्षेत्रे वैष्णव परंपरा आणि भक्तीमार्ग यांची विलक्षण प्रभावी तीर्थक्षेत्रे नि हिंदूंच्या सहस्रो वर्षांपासूनची परंपरागत श्रद्धास्थाने आहेत. ही तिन्ही स्थाने वैदिक परंपरेची, म्हणजे सनातन हिंदु परंपरेची, अत्यंत तेजस्वी परमोज्वल धर्म आणि संस्कृती यांची श्रेष्ठ स्थाने आहेत.

१. ‘डलरी’ या पाद्य्राने ‘The Cult of Vitthal’ हा ग्रंथ लिहिणे

ख्रिस्ती मिशनर्‍यांची वक्रदृष्टी या तीर्थक्षेत्रांकडे वळली आणि त्यांनी त्या परंपरांचा विध्वंस केला. ‘हिंदूंचे ख्रिस्तीकरण व्हावे, निदान ‘हिंदु धर्म हा अधम आहे, नादान आहे’, हे दाखवावे’, यासाठी आणि पाश्‍चात्त्यांनी हिंदु संस्कृतीचा उच्छेद करण्यासाठी निर्माण केलेल्या दैवतीकरण (deityilogy) शास्त्राच्या चौकटीत ‘डलरी’ या पाद्य्राने ‘The Cult of Vitthal’ हा ग्रंथ लिहिला. ‘या देवता भटक्या जमातीच्या आहेत’, असे दाखवणारे वाङ्मय निर्माण केले.

२. भारतातीलच काही आधुनिक पंडितांनी या ग्रंथाला पाठिंबा देणे

‘भारताचा धर्म, संप्रदाय आणि देवतांचा नवीन इतिहास निर्माण केला पाहिजे अन् पाश्‍चात्त्यांच्या मानववंशशास्त्र, समाजशास्त्र आणि त्यांच्या परंपरेप्रमाणे तर्क, बुद्धी अन् युक्ती यांनुसार धर्म आणि संस्कृती यांची चिकित्सा अन् मांडणी केली पाहिजे’, अशी ठाम दृष्टी असलेली भांडारकर संस्था, त्याच परंपरेचे पाईक असलेले आंग्लछायेचे विद्वान डॉ. कात्रे, रामकृष्ण भांडारकर, रा. ना. दांडेकर, सुखठणकर, रा. चि. ढेरे, अशांनी पंढरपूरच्या पांडुरंगाचा आणि वारकरी संप्रदायाचा उच्छेद करणारा हा ‘डलरी’चा प्रबंध उचलून धरला. तिरुपति व्यंकटेश आणि पुरीच्या जगन्नाथाची परंपरा उच्छिन्न करण्यासाठी, तसेच ‘या देवता भटक्या जमातीच्या असून त्यांचे दैवतीकरण कसे झाले ?’, याचा नवा इतिहास हे मिशनरी पंडित आणि त्यांची थुंकी झेलणारे भांडारकरी वळणाचे आधुनिक पंडित आता अहमहमिकेने पुढे सरसावले आहेत.

३. डेक्कन महाविद्यालयाने ‘The Cult of Vitthal’ हा ग्रंथ मोनोग्राफ (प्रबंध) स्वरूपात प्रसिद्ध करणे

डेक्कन महाविद्यालयाने ‘The Cult of Vitthal’ हा ग्रंथ मोनोग्राफ (प्रबंध) स्वरूपात प्रसिद्ध केला. ‘रामायण हे धर्मशास्त्र आहे’, असे बिनतोड सिद्ध करणार्‍या डॉ. बक यांचे रामायणाच्या संदर्भातील उत्कृष्ट लेखन डेक्कन महाविद्यालयाने का प्रसिद्ध करू नये ?’

– गुरुदेव डॉ. काटेस्वामीजी (‘मासिक घनगर्जित’, ऑगस्ट २०१८)