पत्नी सौ. मिता यांच्या दुर्धर आजारपणात गुरूंनी पदोपदी साहाय्य केल्याची संभाजीनगर येथील श्री. शरद चावडा यांना आलेल्या अनुभूती !

श्री. शरद चावडा
सौ. मिता चावडा

‘कर्करोगामुळे केवळ ४ – ५ महिन्यांचे आयुष्य राहिले असतांना आजाराला संभाजीनगर येथील सौ. मिता यांनी आणि त्यांचे पती श्री. शरद चावडा यांनी अत्यंत स्थिर आणि भावाच्या स्थितीत राहून कसे तोंड दिले, हे या लेखावरून लक्षात येईल. जीवघेण्या आजारात आपला दृष्टीकोन कसा असला पाहिजे, याचा आदर्श त्यांनी सर्व साधकांपुढे ठेवला आहे. – (परात्पर गुरु) डॉ. आठवले

६.६.२०१७ या दिवशी संभाजीनगर येथील सौ. मिता शरद चावडा यांना छातीचा कर्करोग झाल्याचे निदान झाले. आजार झाल्याचे समजले तेव्हा तो शेवटच्या टप्प्यातील होता. त्यांनी औषधोपचाराच्या कालावधीतील त्रास हसतमुखाने सहन केले. त्यांनी मुलांच्याही मनाची सिद्धता करून घेतली. हे केवळ त्यांचे श्रीकृष्णाशी असलेले अनुसंधान आणि परात्पर गुरु डॉक्टर आठवले यांच्यावरील दृढ श्रद्धा यांमुळे साध्य झाले. असाध्य रोगाचे निदान झाल्यावरही स्थिर राहून त्यांनी त्यावर मात केली. त्यानंतर त्यांचे २.२.२०१८ ला निधन झाले.

त्यांचा मृत्यू झाला असला, तरी साधनेमुळे अशा दुर्धर आजारामध्येही ‘व्यक्ती स्थिर कशी राहू शकते’, ‘तिला भगवंत कशा अनुभूती देतो’, हे सर्वांना शिकण्यासारखे आहे. यातून आपल्या जीवनात साधनेचे महत्त्व किती अनन्यसाधारण आहे किंबहुना साधना कोणत्या स्तरापर्यंत कार्य करते, हे लक्षात येईल. या दृष्टीने हा लेख प्रसिद्ध करत आहोत. साधना करणार्‍या व्यक्तीला भगवंताच्या कृपेने चांगली गतीही मिळतेच, हे वेगळे सांगायला नको.

१. पत्नीच्या उपचारांसाठी मुंबईला जायचे ठरल्यावर मुलाच्या जेवणाचा आणि इतर गोष्टींचा विचार न होणे, त्या वेळी मुलाला पुण्याला नोकरी मिळाल्याचे कळल्यावर आनंद होणे अन् गुरुमाऊलीने मुलाची काळजी घेतल्याबद्दल कृतज्ञता व्यक्त होणे

‘पत्नीच्या रोगाचे निदान झाल्यापासून घरात आम्ही सर्वजण तिच्या औषधोपचाराचाच विचार करत होतो. तिला उपचारासाठी मुंबईला न्यायचे ठरले. तिच्या समवेत माझी मुलगी कु. रिद्धी आणि मी असे जायचे ठरवले; पण ‘आम्ही मुंबईला गेल्यावर कुशच्या (मुलाच्या) खाण्या-पिण्याचे आणि इतर गोष्टींचे कसे होणार ?’, हा विचारच माझ्याकडून झाला नाही. त्याच वेळी कुशने त्याच्या मेलवर त्याला पुणे येथे नोकरी मिळाल्याचा आणि दुसर्‍याच दिवशी रुजू होण्याचा संदेश दाखवला. घरातले सर्वजण आनंदी झाले. आम्ही सर्वांनी कृष्णचरणी कृतज्ञता व्यक्त केली. दयाघन गुरुमाऊलींचीच किमया ! त्यांनी आधीच कुशची काळजी घेतली होती.

२. साधिकेने उपायांचे साहित्य समवेत घेण्यास सांगून ‘प.पू. भक्तराज महाराज यांच्या गाडीतून जात आहोत’, असा भाव ठेवण्यास सांगणे आणि त्याप्रमाणे भाव ठेवून अन् नामजप, प्रार्थना करत मुंबईला पोेचणे

७.६.२०१७ या रात्री मुंबईला जाण्यासाठी निघतांना एका साधिकेचा दूरभाष आला. ‘उपायांचे सगळे साहित्य घेतले ना ?’, असे त्यांनी विचारले आणि ‘प.पू. भक्तराज महाराज (प.पू. बाबा) यांंच्या गाडीतून जात आहोत, असा भाव ठेवा’, असे सांगितले. मी धन्य झालो. हा निरोप मी कु. रिद्धी आणि पत्नी यांना सांगितला. ‘प.पू. बाबांच्या गाडीतून प्रवास करत आहोत’, असा भाव ठेवून आणि नामजप, प्रार्थना, जयघोष करत आम्ही दुसर्‍या दिवशी सकाळी मुंबईला माझ्या बहिणीकडे पोेचलो.

३. पत्नीच्या माहेरच्या नातेवाइकांनी प्रश्‍नांचा भडीमार केल्यावर गुरुदेवांच्या कृपेने स्थिर आणि शांत राहता येणे

माझ्या बहिणीची मुलगी डॉ. मोनालीस ही पत्नीला बघताच घाबरली आणि म्हणाली, ‘‘हिची प्रकृती फार खराब आहे. तिला जवळच्या सरकारी रुग्णालयात भरती करावे लागेल.’’ आम्ही तिला लगेच रुग्णालयात भरती केले. तिला वेदनाशामक औषधे देण्यात आली आणि ‘सलाईन’वर ठेवले. त्यानंतर काही वेळातच पत्नीचे भाऊ, बहीण आणि सगळे नातेवाइक रुग्णालयात पोेचले अन् मला बघून चिडले. ते सर्वजण मला प्रश्‍नांवर प्रश्‍न विचारत होते, ‘रोग शेवटच्या टप्प्यात येईपर्यंत कसे काय लक्षात आले नाही ? एवढे दुर्लक्ष करणे जीवघेणे आहे. उपचाराचे काय ठरले ? कुठे करणार ? कसे करणार ?’ त्या वेळी मी शांत होतो. ‘ओळखीच्या आधुनिक वैद्यांच्या संपर्कात आहे’, एवढेच मी बोललो. नंतर सर्वजण तिला बघायला रुग्णालयाच्या खोलीत गेले आणि तिला पाहून आश्‍चर्यचकित झाले. ती गाढ झोपलेली होती. तिचा तोंडवळा हसरा आणि शांत दिसत होता. गुरुदेवांच्या कृपेनेच मी स्थिर राहू शकलो.

४. सद्गुरु (कु.) स्वाती खाडये यांना पत्नीच्या आजारपणाविषयी कळवल्यावर त्यांनी तिला श्रीकृष्णाचा नामजप करण्यास सांगणे आणि तेव्हापासून तिचा नामजप सातत्याने अन् भावपूर्ण होऊ लागणे

संभाजीनगरला देवीस्वरूप सद्गुरु स्वातीताई येणार असल्याचे कळल्यावर मी एका साधिकेला सांगितले, ‘‘पत्नीच्या आजाराविषयी सद्गुरु ताईंना सांग आणि त्यांचा जो निरोप असेल, तो मला दूरभाष करून कळव.’’ त्यानंतर संध्याकाळी सद्गुरु ताईंचा ‘सौ. मिताला चांगल्या आधुनिक वैद्यांना दाखवा आणि तिला कृष्णाचा नामजप करण्यास सांगा’, हा निरोप मिळाला. तो तिला सांगितल्यावर ती आनंदी झाली. तिने हात जोडून कृतज्ञता व्यक्त केली. तेव्हापासून तिचा जप सातत्याने आणि भावपूर्ण होऊ लागला आहे.

५. पुढच्या उपचारांसाठी नातेवाइकांनी सर्वतोपरी साहाय्य करणे

सद्गुरु ताईंचा निरोप मिळाल्यानंतर काही घंट्यांतच कर्णावतीहून माझी भाची डॉ. दक्षा हिचा दूरभाष आला. ‘ज्युपिटर’ रुग्णालयातील एका ओळखीच्या हुशार आधुनिक वैद्यांशी चर्चा केली असून त्यांनी उद्याचीच भेटीची वेळ दिली आहे’, असे तिने सांगितले. एका भाच्याने ठेव रक्कम (Deposit) भरून उपचाराच्या पुढच्या प्रक्रियेची निश्‍चिती करून घेतली. रात्री उशिरापर्यंत नातेवाइकांचे साहाय्यासाठीचे दूरभाष येत होते. आम्हा दोघांकडून गुरुदेव आणि सद्गुरु ताई यांच्या चरणी सतत कृतज्ञता व्यक्त होत होती.

६. गुरुमाऊलीच्या कृपेने आधुनिक वैद्यांची भेट होऊन त्यानंतरचे औषधोपचार काही घंट्यांतच चालू होणे

रुग्णालयात गेल्यावर रुग्णाची नोंदणी, आधुनिक वैद्यांची भेट, रुग्णाची पडताळणी, ‘एक्स-रे’, ‘पेट-स्कॅन’ होऊन त्यानंतर त्वरित औषधोपचार चालू झाले. हे सर्व केवळ काही घंट्यांतच पूर्ण झाले. हा गुरुदेवांचाच महिमा ! आधुनिक वैद्यांनी सांगितले, ‘‘दुसर्‍या दिवसापासून ‘केमोथेरपी’ चालू करायची असून ६ ‘केमो’ नंतर ‘पेट-स्कॅन’ केल्यावर पुढच्या ६ ‘केमो’ करायच्या आहेत. त्यानंतर परत ‘पेट-स्कॅन’ करून पुढचे औषधोपचार ठरवण्यात येतील.’’

७. पत्नीवर ‘केमोथेरेपी’चा कुठलाही ‘साईड इफेक्ट’ न होणे आणि तिचा उत्तम प्रतिसाद पाहून आधुनिक वैद्याही खुश होणे

पहिल्या ‘केमो’नंतर आधुनिक वैद्या पडताळण्यासाठी आल्या. दिवसभर केलेल्या उपचारांना रुग्णाने दिलेला प्रतिसाद पाहून आधुनिक वैद्या खुश झाल्या. पत्नीने हसतमुखाने आधुनिक वैद्यांना नमस्कार केला आणि ती ‘जय श्रीकृष्ण’ असे म्हणाली. ‘केमो’चा तिच्यावर कुठलाही ‘साईड इफेक्ट’ झाला नव्हता. यावर आधुनिक वैद्यांचा विश्‍वासच बसेना.

८. रोग चौथ्या टप्प्यात गेल्यामुळे पत्नीची हाडे ठिसूळ झाली असून तिची काळजी घ्यावी लागेल’, असे आधुनिक वैद्यांनी सांगणे, ‘संभाजीनगरहून चारचाकीने आलो’, असे सांगितल्यावर ते आवाक् होणे आणि प.पू. भक्तराज महाराज यांच्या कृपेमुळे सर्व सुरळीत झाल्याचे लक्षात येऊन कृतज्ञता व्यक्त होणे

त्यानंतर एकदा तपासणीसाठी आधुनिक वैद्यांकडे गेलो होतो. ते म्हणाले, ‘‘रुग्णाचा प्रतिसाद चांगला आहे; पण रोग चौथ्या टप्प्यात आहे. छाती, यकृत (लिव्हर), पोट आणि पाठीतली ३ हाडे (Back Bone) यांवर रोगाचा परिणाम दिसत आहे. तिची हाडे ठिसूळ झाली आहेत. तिची पुष्कळ काळजी घ्यावी लागेल. वजन उचलणे आणि फिरणे बंद करावे लागेल. ती केवळ स्नानगृहापर्यंत गेली, तर चालेल.’’ आम्ही ‘काय होऊ शकते ?’, असे विचारल्यावर त्यांनी सांगितले, ‘‘हाडे मोडण्याची पुष्कळ संभावना आहे.’

‘आम्ही संभाजीनगरहून चारचाकीने आलो’, असे मी आधुनिक वैद्यांना सांगितले. तेव्हा ते आवाक् झाले. प.पू. भक्तराज महाराज यांनीच तिची फुलासारखी काळजी घेतली आणि त्यामुळे आम्ही संभाजीनगरहून मुंबईला उपचारासाठी सुखरूप पोहोचलो. आम्ही सर्वांनी गुरुदेव आणि श्रीकृष्ण यांच्या चरणी कृतज्ञता व्यक्त केली.

९. संत आणि साधक यांनी दूरभाष करून धीर देणे

९ अ.सद्गुरू राजेंद्र शिंदे यांनी आठवण काढणे आणि ‘पत्नीचा आजार बरा होईल’, असे म्हणून आश्वस्त करणे : ‘केमोथेरपीच्या पहिल्याच दिवशी देवद आश्रमातून सौ. रिता सावरिया (माझी मामी) यांचा दूरभाष आला. त्या म्हणाल्या,”सद्गुरू राजेन्द्रदादानी तुझी आठवण काढली. मी त्यांना सांगितले की, पत्नीला झालेल्या कर्करोगाच्या उपचारासाठी तू मुंबईला गेला आहेस. तेव्हा ते म्हणाले, “काही होणार नाही. गुरुदेव आहेत न !”

९ आ. पू. गडकरीकाकांनी दूरभाष करून विचारपूस करणे : पू. गडकरीकाकांनी ‘वहिनींचे उपचार कुठे चालू आहेत ? त्या कशा आहेत ? उपचारानंतर त्यांना रामनाथीला घेऊन जा’, असे सांगितले.

९ ई. (आताचे पूजनीय) अधिवक्ता चपळगावकर आणि (आताचे पूजनीय) अधिवक्ता सुरेश कुलकर्णी यांनी ‘काळजी करू नकोस’, असे सांगणे : अधिवक्ता चपळगावकर म्हणाले, ‘‘शरद, काळजी करू नकोस. कर्करोग बरा होणार आहे. माझेच उदाहरण बघ. गुरुदेव आहेत ना !’’ अधिवक्ता सुरेश कुलकर्णी यांनी सांगितले, ‘‘काही काळजी करू नकोस. मुंबईहून आल्यावर मला सांग. मी भेटायला येईन.’’

९ उ. संभाजीनगरचे साधक म्हणाले, ‘‘आपले गुरु महान आहेत. सर्व व्यवस्थित होणार !’’

१०. असाध्य रोगामुळे पत्नीचे आयुष्य ४ – ५ मास राहिलेले असतांना ती साडेतीन मासांतच पूर्णतः बरी होणे आणि तिचा पुनर्जन्म झाला असल्याचे जाणवणे

‘हे गुरुदेवा, या सर्वांच्या माध्यमातून धीर देऊन तुम्ही मला आश्‍वस्त करत आहात. तुमच्या चरणी कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी माझ्याकडे शब्दच नाहीत. तुम्हीच आमच्याकडून कृतज्ञताही व्यक्त करवून घ्या.’

हे गुरुदेवा, सौ. मिताला झालेला असाध्य रोग पाहता वैद्यकशास्त्राच्या निदानानुसार तिचे आयुष्य ४ – ५ मास राहिले होते; मात्र ती केवळ साडेतीन मासांतच पूर्णतः निरोगी होऊन परतली. तिचा पुनर्जन्मच झाला. देवा, हे केवळ आणि केवळ तुझ्या कृपेच्या वर्षावानेच साध्य झाले.

‘तुझी कृपादृष्टी आम्हा सर्वांवर अशीच राहू दे आणि सर्वांची जलद आध्यात्मिक उन्नती होऊ दे’, अशी तुझ्या चरणी प्रार्थना आहे. हे सर्व देवानेच माझ्याकडून लिहून घेतले; म्हणून त्याच्या चरणी कृतज्ञता व्यक्त करतो.’

– श्री. शरद चावडा (पती), संभाजीनगर (जानेवारी २०१८)

• या लेखात प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या भाव तेथे देव या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक