गीताज्ञानदर्शन

सनातनचे ज्ञानयोगी संत पू. अनंत बाळाजी आठवले ह्यांच्या ‘गीताज्ञानदर्शन’ ह्या सनातनच्या ग्रंथसंपदेतील ग्रंथातील मजकूर क्रमश: प्रसिद्ध करत आहोत.

॥ श्रीकृष्णाय नम: ॥

पू. अनंत आठवले

ईश्‍वराचे स्वरूप स्पष्ट करून द्वैत किंवा अद्वैत भावाने भक्ती करण्यास सांगणारा

अध्याय ९ – राजविद्याराजगुह्ययोग

२.  साधना – ईश्‍वराची अनन्यभक्ती करणे

आ. द्वैत किंवा अद्वैत भावाने उपासना करणे : ‘ज्ञानरूपी यज्ञ’ ही भक्ती दोन प्रकारे करता येते. (अध्याय ९, श्‍लोक १५) ‘एकत्वेन’ – ‘एक परमात्मा वासुदेवच सर्वकाही आहे आणि आपणही त्याचेच अंश आहोत’, अशा एकीभावाने भक्ती करणे. ‘पृथक्त्वेन’ – ‘सूर्य, इंद्र इत्यादींमध्ये तोच परमात्मा आहे’, अशा भावाने त्याची वेगवेगळ्या रूपांत उपासना करणे किंवा द्वैतभावाने उपासना करणे. (अध्याय ९, श्‍लोक १५)

विवेचन

वेगवेगळ्या रूपांत उपासना आणि द्वैतभाव यांमध्ये अंतर आहे. अद्वैत मानूनही केवळ भक्तीच्या सोयीसाठी एखाद्या रूपाची उपासना केली जाऊ शकते, जशी आद्य शंकराचार्य, संत ज्ञानेश्‍वर इत्यादींनी कधी कधी केली. द्वैतामध्ये ‘मी ईश्‍वरापेक्षा वेगळा आहे’, अशी भावना असते.

इ. सर्व कर्मे ईश्‍वरार्पण करणे. श्रीकृष्ण सांगतात, ‘जे काही करशील, खाशील, देशील आणि तपश्‍चर्या करशील, ते सर्व मज, ईश्‍वराला अर्पण कर.’ (अध्याय ९, श्‍लोक २७)

॥ श्रीकृष्णार्पणमस्तु ॥

संदर्भ : सनातनचा ग्रंथ ‘गीताज्ञानदर्शन’