पाककडून कर्तारपूर कॉरिडॉरच्या प्रचारासाठी खलिस्तानवादी आतंकवाद्यांची छायाचित्रे

कॉरिडॉरच्या जवळच्या परिसरात आतंकवाद्यांचा तळ कार्यरत असणे, खलिस्तानवादी आतंकवाद्यांची छायाचित्रे प्रसारित होणे यातून पाक कॉरिडॉरच्या माध्यमातून भारतावर आतंकवादी कारवाया करू पाहत आहे. यातून पाकचे खायचे आणि दाखवायचे दात हे वेगळेच आहेत, हेच पुन्हा एकदा दिसून येते. त्यामुळे भारताने पाकला धडा शिकवून आतंकवादाचे समूळ उच्चाटन करावे आणि कॉरिडॉरच्या माध्यमातून पाकच्या कुटनीतीला धडा शिकवावा, हीच अपेक्षा !

The poster has message of ‘Khalistan 2020’ and referendum written in bold letters. (Photo Credit : Govt of Pakistan/Twitter )

नवी देहली – शीख धर्माचे धर्मगुरु गुरुनानक देव यांच्या ५५० व्या जयंतीच्या निमित्ताने पाकिस्तानच्या पंजाब प्रांतात असलेल्या साहिब गुरुद्वाराचे उद्घाटन ९ नोव्हेंबरला करण्यात येणार आहे. या उद्घाटनाच्या कार्यक्रमाच्या प्रचाराच्या दृष्टीने पाकिस्तानच्या माहिती आणि प्रसारण मंत्रालयाने शीख भाविकांच्या स्वागताचा एक व्हिडिओ प्रसारित केला आहे. त्यामध्ये पंजाब प्रांतामध्ये कर्तारपूर कॉरिडॉरच्या उद्घाटनाच्या कार्यक्रमाचा फलक दाखवण्यात आला आहे. त्या फलकावर भारतीय सैन्याकडून ‘ऑपरेशन ब्लू स्टार’मध्ये ठार मारल्या गेलेल्या खलिस्तानी आतंकवाद्यांची छायाचित्रे छापण्यात आली आहेत. ही छायाचित्रे खालिस्तानी आतंकवादी भिंद्रनवाले, शाबेग सिंह आणि अमरिक सिंह यांची आहेत. या फलकावर ‘खलिस्तान २०२०’ अशी खलिस्तानच्या स्वातंत्र्याची मागणी केली आहे.

कर्तारपूर कॉरिडॉर चालू झाल्यानंतर पाकिस्तानातील विविध गटांना भारतविरोधी कारवाया करण्यासाठी त्याचा वापर करू न देणे, हे सुरक्षायंत्रणांसमोर मोठे आव्हान आहे. कर्तारपूर कॉरिडॉर चालू करण्यासाठी पाकिस्तानने जी तत्परता दाखवली आहे, त्यामागे खलिस्तान चळवळीला प्रोत्साहन देण्याचाही त्यांचा हेतू नाही ना ?, असा संशय व्यक्त केला जात आहे.

कॉरिडॉर खुले करण्यामागे पाकचा छुपा ‘अजेंडा’ ! – कॅप्टन अमरिंदर सिंह, मुख्यमंत्री, पंजाब

कर्तारपूर कॉरिडॉर भारतासाठी खुले करण्यामागे पाकचा छुपा ‘अजेंडा’ (कार्यक्रम) आहे. त्यामुळे सरकारने पहिल्या दिवसापासून सतर्कता बाळगायला हवी, असे विधान पंजाबचे मुख्यमंत्री कॅप्टन अमरिंदर सिंह यांनी केले आहे.