आतंकवाद : नेपाळमार्गे !

संपादकीय

राममंदिराच्या खटल्याचा निकाल जवळ येत चालला    आहे. त्या पार्श्‍वभूमीवर देशात, विशेषतः उत्तरप्रदेशात आतंकवादी आक्रमण करण्याचा प्रयत्न आतंकवादी संघटनांकडून केला जाण्याची शक्यता आहे. काही आतंकवादी राज्यात घुसल्याची माहितीही गुप्तचर यंत्रणांनी दिली आहे. उत्तरप्रदेश राज्याची सीमा नेपाळला लागून असल्याने पाकपुरस्कृत आतंकवादी सध्या नेपाळच्या मार्गाचा वापर करून भारतात घातपात करण्याचा प्रयत्न करत असल्याचेही समोर आले आहे. अमेरिकेच्या परराष्ट्र विभागाच्या ‘कंट्री रिपोर्ट ऑन टेररिजम २०१८’ या अहवालामध्येही जिहादी आतंकवादी नेपाळचा वापर करत असल्याचे म्हटले आहे. भारतात बंदी घातलेल्या सीमी या आतंकवादी संघटनेची निर्मिती असणार्‍या ‘इंडियन मुजाहिदीन’ने सध्या नेपाळला तिचा अड्डा बनवला आहे, तसेच तिने लष्कर-ए-तोयबा, जैश-ए-महंमद आणि हरकत उल-जिहादी इस्लामी या अन्य आतंकवादी संघटनांशी हातमिळवणी केली आहे. भारतासाठी ही नवीन डोकेदुखी निर्माण झाली आहे. इंडियन मुजाहिदीन बंदी घातल्यानंतर, तसेच यासिन भटकळ याला अटक केल्यानंतर शक्तीहीन झाली असली, तरी पूर्ण नष्ट झालेली नाही. तसेच जैश आणि तोयबा यांच्याशी हातमिळवणी केल्यामुळे तिचा धोका निर्माण झाला आहे. त्यातच राममंदिराचे सूत्र आतंकवादी आक्रमण करण्यासाठी त्यांना एक संधी म्हणून समोर आले आहे. त्याद्वारे मनातील घुसमट आक्रमण करून व्यक्त करण्याचा आणि देशात अशांतता निर्माण करण्याचा त्यांचा प्रयत्न असणार आहे. राममंदिराच्या निकालाच्या पार्श्‍वभूमीवर देशातील सर्व सुरक्षा यंत्रणा आणि गुप्तचर यंत्रणा सक्रीय झाल्या असल्या, तरी देशातील धर्मांध या आतंकवाद्यांना साहाय्य करून काहीतरी मोठे घडवून आणतील, अशी शक्यता अधिक आहे. त्यांच्यावर या यंत्रणा लक्ष देत असतीलच; मात्र नेपाळमध्ये जो काही आतंकवाद्यांनी त्यांचा अड्डा निर्माण केला आहे, त्यावर कारवाई होणे आवश्यक असणार आहे. भारत स्वतःहून तशी कारवाई करू शकत नाही; मात्र नेपाळ सरकारला याविषयी कारवाई करण्यास सांगू शकतो. कदाचित् भारताने आतापर्यंत तसे सांगितलेही असू शकते; मात्र प्रश्‍न असा आहे की, नेपाळमधील चीनच्या ताटाखालचे मांजर असलेले साम्यवादी सरकार या आतंकवाद्यांवर आणि त्यांच्या अड्ड्यांवर कारवाई करणार का, हा आहे. एकीकडे चीन पाकमधील आतंकवाद्यांच्या विरोधात आंतरराष्ट्रीय स्तरावर कारवाई होण्याच्या मार्गात अडथळा निर्माण करत असतांना नेपाळला तो पाकपुरस्कृत आतंकवाद्यांवर कारवाई करण्यास तेथील सरकारला मान्यता देईल, असे वाटत नाही. हे आतंकवादी भारतात घातपात करणार असतील, तर ते रोखण्याचा प्रयत्न चीन करणार नाही, हे स्वाभाविक आहेे, असेच म्हणावे लागले.

नेपाळमध्ये कारवाई करावी !

नेपाळ आणि भारत यांच्यातील मैत्रीपूर्ण संबंधांमुळे गेल्या अनेक वर्षांपासून दोन्ही देशांमध्ये पारपत्र आणि व्हिसा यांचे बंधन नसल्याने कोणीही सहजपणे ये-जा करू शकतो. याचा जसा लाभ आहे, तसा तोटाही आहे. भारतातील अनेक गुन्हेगारांनी गुन्हा केल्यानंतर नेपाळमार्गे विदेशात पलायन केल्याच्या अनेक घटना यापूर्वी घडल्या आहे. अनेक आतंकवादीही असेच पळून गेले आहेत. कमलेश तिवारी यांची हत्या करणारे आरोपीही याच मार्गाने परदेशात पळून जाणार होते. दोन्ही देशांमध्ये प्रत्यार्पण कायदा नसल्याचाही लाभ गुन्हेगारांना मिळत आहे. त्यामुळे भारताने जिहादी आतंकवाद्यांची कितीही माहिती नेपाळला दिली, तरी नेपाळ त्यांच्यावर एकवेळ कारवाई करील; मात्र तो भारताच्या कह्यात त्यांना देणार नाही. भारत नेपाळसमवेत प्रत्यार्पण कायदा करण्याच्या प्रयत्नात आहे; मात्र तो होईल का, याची शक्यता अल्पच दिसत आहे. कारण नेपाळने चीनसमवेतही हा करार केलेला नाही, हे विशेष. अशा वेळी जर इंडियन मुजाहिदीन आणि अन्य आतंकवादी संघटना नेपाळ मार्गाचा वापर करत भारतात एखादे आक्रमण करण्यात यशस्वी ठरले, तर भारताला काहीतरी ठोस कारवाई करण्याचा निर्णय घ्यावा लागेल. भारत त्यांचा निर्माता पाकवर पुन्हा मोठी कारवाई करील, यात शंका नाही; मात्र नेपाळमधील त्यांच्या अड्ड्यांवर कारवाई करणेही आवश्यक ठरणार आहे. अशा वेळी भारताला नेपाळमध्ये सर्जिकल स्ट्राईक किंवा एअर स्ट्राईक करता येणार नाही; कारण नेपाळमध्ये आतंकवाद्यांचे प्रशिक्षण केंद्र किंवा तळ नाही. ते त्या भूमीचा वापर लपण्यासाठी आणि कट रचण्यासाठी करत आहे. अशा वेळी गोपनीय पद्धतीने नेपाळमध्ये जाऊन या आतंकवाद्यांचा काटा काढावा लागेल. ज्या प्रकारे दुसर्‍या महायुद्धाच्या वेळी हिटलरने ज्यूंचा वंशसंहार करण्याचा प्रयत्न केल्याचा सूड म्हणून इस्रायलने या वंशसंहारामध्ये सहभागी असलेल्या हिटलरच्या नेत्यांना जगातील विविध देशांत जाऊन गोपनीय कारवाई करून ठार केले होते. अशा प्रकारच्या धाडसी कारवाया भारताला कराव्या लागतील. आतापर्यंत भारताने अशी कारवाई केल्याचे ऐकिवात नाही; मात्र जिहादी आतंकवादावर कारवाई करण्यासाठी भारताला आता तेही करावे लागले, असेच नेपाळच्या घटनेवरून लक्षात येते. त्याच वेळी भारताला पाकचा संपूर्ण नायनाट करण्याचा प्रयत्न चालू ठेवावा लागेल; कारण जोपर्यंत पाकिस्तानचे अस्तित्व आहे, तोपर्यंत जिहादी आतंकवाद नष्ट होणार नाही, हे सत्य आहे. जर भारताने पाकचा नायनाट केला, तर भारताच्या विरोधात असलेल्या भारतातील आणि पाकव्यतिरिक्त अन्य देशांतून कारवाया करणार्‍या आतंकवाद्यांवर चाप बसेल. ते कधी होणार हाच मुख्य प्रश्‍न आहे. भारताने ते धाडस दाखवावे, असेच जनतेला वाटते.