विषारी विळखा !

संपादकीय

राजधानी देहलीतील धोक्याची पातळी ओलांडून गेलेले वायूप्रदूषण हे भयावह आपत्काळाचे निदर्शक आहे. हवेचे प्रदूषण मोजण्याच्या परिमाणात (एअर क्वालिटी इंडेक्स) ० ते ५० हा चांगला स्तर आणि ५०० हा अतीगंभीर स्तर सांगितला आहे. हवेच्या अशुद्धतेची ही पातळी देहलीत आता ६२५ ते १ सहस्र एवढी प्रचंड वाढून धोक्याच्या पातळीच्या कितीतरी पुढे गेली आहे. यावरून प्रदूषणाचे गांभीर्य लक्षात येते. त्यामुळे नागरिकांना दमा, श्‍वास घेता न येणे, डोळ्यांची जळजळ आदी अनेक त्रास चालू झाले आहेत. सरकारने शाळा ५ दिवस बंद ठेवल्या आहेत. नागरिकांना घराबाहेर न पडण्याचे आवाहन करण्यात आले आहे. काही विमान सेवा रहित केल्या आहेत, तर काही विमानांचे मार्ग पालटले आहेत. त्यातच पाऊस पडत असल्याने प्रदूषणाची पातळी अल्प व्हायला सिद्ध नाही. ही स्थिती आपत्कालीन आणि गंभीर आहे.

संतापजनक आप सरकार !

प्रदूषणावर आतापर्यंत कुठलीही ठोस उपाययोजना न काढणारे देहलीचे आप सरकार पंजाब आणि हरियाणा राज्यांमधील शेतकर्‍यांवर प्रदूषणाचे खापर फोडून मोकळे झाले आहे. धान्य किंवा गहू शेतातून काढल्यावर राहिलेली रोपे शेतकरी जाळून टाकतात (तसे करण्याशिवाय सध्या तिथे त्यांना दुसरा पर्याय नाही, असे शेतकर्‍यांचे म्हणणे आहे. ) आणि त्यामुळे हवेचे प्रदूषण वाढले आहे, असे देहलीचे मुख्यमंत्री केजरीवाल यांनी म्हटले आहे. पर्यावरण खात्यात काम करणारे आणि पर्यावरणतज्ञ अलोक गुप्ता यांनी याचे चपखल शब्दांत विश्‍लेषण केले आहे. त्यांनी म्हटले आहे की, ‘रोपे जाळल्यामुळे प्रदूषण हे निमित्त झाले आहे.’ त्यांना असे म्हणायचे आहे की, ‘समजा पाण्याची बादली पूर्ण भरली आणि त्यात काही थेंब पडल्यावर पाणी बादलीतून वाहू लागले, तर ते थेंब त्यासाठी किती कारणीभूत असतात ?’ तसे हे झाले आहे. परालीचे कारण पुढे करणे म्हणजे मूळ समस्येवरून लक्ष हटवण्यासाठी काढलेली पळवाट आहे.

देहलीत प्रचंड प्रमाणात झालेल्या प्रदूषणाची २ मुख्य कारणे म्हणजे प्रदूषण करणारी आस्थापने आणि चारचाकी गाड्या ही आहेत. कारखान्यातील प्रदूषणाला भ्रष्टाचारासह अनेक गोष्टी उत्तरदायी आहेत. पर्यावरणतज्ञ गुप्ता यांनी ही गोष्ट स्पष्ट केली आहे. केंद्र सरकारने वर्ष २०१६ मध्येच ‘पराली जाळणे’ हे देहलीमधील प्रदूषणाचे कारण होऊ शकत नाही’, हे स्पष्ट केले होते. पंजाब सरकारने मात्र ३ सहस्र शेतकर्‍यांना पराली जाळल्याविषयी दंडही ठोठावला आहे.

आताही ‘प्रदूषणावर नियंत्रण ठेवण्यासाठी ३०० गट कार्यरत आहेत’, असे सरकार सांगत आहे. प्रत्यक्षात ते नियंत्रण कसे ठेवू शकणार ? हे मात्र कुठे स्पष्ट होत नाही; कारण सध्याच्या स्थितीवर नियंत्रण ठेवणे सरकारच्या काय कोणाच्याही हाताबाहेर गेले आहे. हे गट कचरा न जाळण्याचे आवाहन करत आहेत आणि पाणी मारत आहेत. या सर्व किती वरवरच्या उपाययोजना आहेत, हे सामान्य माणसालाही समजेल. त्यामुळे सरकार काहीतरी करत आहे, हे दाखवण्यासाठी लोकांच्या डोळ्यांत केलेली ही चक्क धूळफेक आहे.

देहलीत चारचाकी विकृती !

देहलीतील संस्कृतीवर पाश्‍चात्त्य संस्कृतीतील शिष्टाचाराचा प्रभाव देशातील अन्य शहरांच्या तुलनेत पुष्कळ अधिक आहे. देहलीत बहुतांश घरी माणसी एक चारचाकी गाडी असते. इतकेच नव्हे, तर महागडी गाडी घरासमोर असणे आणि त्यातून फिरणे यावरून व्यक्तीची पत ठरवली जाते. चारचाकीमुळे होणारे प्रदूषण अल्प करण्यासाठी योजलेली सम आणि विषम क्रमांक शेवटी असलेल्या गाड्या १ दिवसाआड चालवण्याची योजना प्रदूषण रोखण्यासाठी किती टक्के लाभदायक ठरली, याचा अभ्यास नेमकेपणाने पुढे आला नाही. त्याला विरोध झाला आणि ती बंद पडली. वर्ष २०१५ मध्ये चीनवरूनच आयात केलेली ही योजना आता आपत्काळामुळे ४ नोव्हेंबरपासून पुन्हा लागू करण्यात आली आहे. परदेशात आता सायकल चालवण्यावर भर देण्यात येत आहे. त्यामुळे नागरिकांनीही आपल्याला गाडीची नेमकी किती आवश्यकता आहे आणि अन्य पर्याय यांचा वापर करून ती कशी टाळू शकतो, हेही पाहायला हवे. सरकारने गाड्या उत्पादक अस्थापनांवरही काही बंधने घालायला हवीत.

कारखान्यांतून होणारे प्रदूषण रोखणे आणि यज्ञयाग हाच उपाय !

या सर्व स्थितीतून धडा घेऊन आतातरी आप सरकार प्रदूषण करणार्‍या आस्थापनांच्या नाड्या आवळून त्यांच्यावर कडक कारवाई करणार आहे का ? हा महत्त्वाचा प्रश्‍न आहे. नागरिकांनी यासाठी सरकारवर दबाव आणला पाहिजे. मानवी चुकांमुळे निसर्गाचा कोप होऊन आपत्काल येणार, हे सर्वच संत आणि भविष्यवेत्ते सांगत आहेत. मानवाने स्वार्थीपणाने आणि हव्यासाने सर्व प्रकारचे प्रदूषण वाढवून निसर्गचक्र फिरवले आहे. हे प्रदूषण काही अचानक वाढलेले नाही; परंतु धोक्याची घंटाही ऐकू न येण्याएवढे पैशाच्या सुखाने मनुष्याला बहिरे केले आहे. त्यामुळे प्रदूषणाच्या निसर्गकोपापासून वाचण्यासाठी स्थुलातील उपाययोजनांसमवेतच आता त्या निसर्गदेवतेलाच शरण जाणे त्याच्या हातात आहे, हे त्याने समजून घेतले पाहिजे. सनातन संस्कृतीतील ऋषिमुनींनी पर्यावरणपूरक धर्माचरण आणि कर्मकांडे सांगितली, हे चिनी उपाययोजना शोधणार्‍या आप सरकारच्या डोक्यात कधीतरी शिरेल काय ? यज्ञयाग, अग्निहोत्र हे सर्व विधी मानवाला पर्यावरण अनुकूल करून घेण्यासाठीही उपयोगी पडत होते, हे आप सरकारच्या लक्षात येईल, तो सुदिन म्हणावा लागेल ! आता जनतेनेच प्रदूषणापासून वाचण्यासाठी आध्यात्मिक उपायांची कास धरणे आवश्यक आहे. अजूनही तत्परतेने आणि ठोस पावले न उचलल्यास आपणच आपल्या हाताने आपला अंत करत आहोत, अशी स्थिती येईल, हे निश्‍चित, असेच म्हणावे लागेल !