नवगण राजुरी येथील प्रसिद्ध श्री गणेश मंदिरातील दानपेटीची चोरी

हिंदूंची मंदिरे असुरक्षितच !

बीड – तालुक्यातील नवगण राजुरी येथील प्रसिद्ध श्री गणेश मंदिरात १ नोव्हेंबरला पहाटे चोरांनी दानपेटीसह दुचाकी चोरली. त्यानंतर दुसरी दानपेटी चोरून ती वाहनात ठेवतांना आवाज झाला. त्यामुळे झोपलेल्या काही लोकांना जाग आल्याने ती दानपेटी तिथेच टाकून चोरांनी पोबारा केला. घटनेची माहिती मिळताच ग्रामीण पोलीस ठाण्याचे साहाय्यक पोलीस निरीक्षक सुजित बडे यांनी घटनास्थळी भेट दिली. त्यानंतर स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक भारत राऊत, दरोडा प्रतिबंधक पथक, श्‍वान पथक, ठसेतज्ञ यांनी पाहणी केली.

राजुरी गावात ९ ठिकाणी गणपति असल्याने ‘नवगण राजुरी’ अशी गावाची ओळख आहे. राज्यभरातून लोक येथे दर्शनासाठी येत असतात. श्री गणेश मंदिरात ‘सीसीटीव्ही’ छायाचित्रक बसवण्यात आले आहेत; मात्र चोरांनी ‘सीसीटीव्ही’चा व्हिडिओही पळवला आहे.