रेल्वेगाड्यांमध्ये महिलांच्या सुरक्षेसाठी महिला पोलीस कर्मचार्‍यांची गस्त

महिलांसाठी गस्त वाढवली, ही योजना स्तुत्यच आहे. रामराज्यात महिला पूर्णतः सुरक्षित होत्या. महिलांच्या सुरक्षेच्या दृष्टीने नीतीमान समाजनिर्मितीसाठी रामराज्याची स्थापना होणे अपरिहार्य आहे.

नाशिक – रेल्वेगाड्यांमध्ये महिलांच्या सुरक्षेसाठी महिला पोलीस कर्मचार्‍यांची गस्त चालू केली आहे. दिवाळीच्या सुटीमुळे प्रवाशांची वाढलेली गर्दी आणि महिला प्रवाशांची सुरक्षा यांसाठी नाशिकरोड रेल्वे सुरक्षा दलाने रेल्वेमध्ये महिला पोलीस कर्मचार्‍यांची गस्त चालू केली आहे.

देहलीला आठवड्यातून तीनदा जाणार्‍या राजधानी एक्सप्रेसमध्ये महिला प्रवाशांच्या सुरक्षिततेसाठी नाशिकरोड येथून दोन महिला पोलीस आणि एक जवान जळगावपर्यंत गस्त घालतात. जळगावहून हावडा मेलने पुन्हा ते गस्त घालत नाशिकरोडला येतात. रेल्वे प्रवाशांच्या सुरक्षिततेसाठी या पद्धतीची गस्त कायम ठेवून गस्तीच्या पोलीस कर्मचार्‍यांना शस्त्रही देणार असल्याचे रेल्वे सुरक्षा दलाचे पोलीस निरीक्षक एन्.व्ही. गुहिलोत यांनी सांगितले. रेल्वे सुरक्षा दलाने पोलीस गस्त वाढवल्याने प्रवाशांमध्ये समाधान व्यक्त केले जात आहे.

सौ. माई बुचके, संस्थापिका, साई महिला मंडळ आणि समाजसेविका – रेल्वे सुरक्षा दलाने महिलांच्या सुरक्षिततेसाठी उचललेले हे पाऊल कौतुकास्पद आहे. महिलांच्या सुरक्षेसाठी कायमस्वरूपी उपाययोजनाही केल्या पाहिजेत. ‘महिलांनीही स्वरक्षण प्रशिक्षण घेऊन कोणत्याही प्रसंगांना सामोरे जाण्यासाठी सिद्ध झाले पाहिजे’, असे वाटते.