‘महर्षि अध्यात्म विश्‍वविद्यालया’च्या अंतर्गत चालू असलेल्या ‘ज्योतिषशास्त्रा’च्या संदर्भातील संशोधन कार्यात सहभागी होऊन साधनेच्या सुवर्णसंधीचा लाभ घ्या !

साधकांना सूचना आणि ज्योतिषी, वाचक, हितचिंतक अन् धर्मप्रेमी यांना नम्र विनंती !

‘ज्योतिषशास्त्र’ ही भारताने विश्‍वाला दिलेली एक अमूल्य देणगी आहे. ज्योतिषशास्त्राद्वारे व्यक्तीचे प्रारब्ध, स्वभाव, कार्यक्षेत्र, तिला असलेला शारीरिक, मानसिक आणि आध्यात्मिक या स्तरांवरील त्रास इत्यादी गोष्टींविषयी जाणून घेता येते. ज्योतिषशास्त्राद्वारे संभाव्य नैसर्गिक आपत्ती, राष्ट्रावरील संकटे यांविषयी अंदाज बांधता येतो. अशा प्रकारे ज्योतिषशास्त्र व्यष्टी आणि समष्टी अशा दोन्ही स्तरांवर उपयुक्त आहे. ज्योतिषशास्त्राच्या संवर्धनासाठी ‘महर्षि अध्यात्म विश्‍वविद्यालया’च्या वतीने परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या मार्गदर्शनानुसार ज्योतिषशास्त्रात संशोधन कार्य चालू आहे. या संशोधन कार्याचे वैशिष्ट्य म्हणजे हे संशोधन आध्यात्मिक विषयांवर करण्यात येत आहे. या संशोधन कार्यात सहभागी होण्याची संधी आता उपलब्ध झाली आहे.

ज्योतिषशास्त्र हे १४ विद्यांपैकी एक आहे. हिंदु धर्माने सांगितलेल्या १४ विद्या आणि ६४ कला यांच्या माध्यमातून मनुष्याला साधना करून ईश्‍वरप्राप्ती करता येते. ‘महर्षि अध्यात्म विश्‍वविद्यालया’त ‘विद्या आणि कला यांच्या माध्यमातून ईश्‍वरप्राप्ती कशी करून घ्यावी ?’, याविषयी शिक्षण देण्यात येते. त्यामुळे ज्योतिषशास्त्रात संशोधनात्मक कार्य करत असतांनाच त्याद्वारे साधना करून ‘ईश्‍वरप्राप्ती करून घेणे’, हा मनुष्य जन्माचा मूळ उद्देश साध्य होणार आहे. सध्या गोवा येथील रामनाथी आश्रमात ज्योतिषशास्त्रासंबंधी पुढील सेवा उपलब्ध आहेत. यातील काही सेवा घरी राहूनही करता येतील.

१. आध्यात्मिक विषयांवर ज्योतिषशास्त्रीय संशोधन करणे (प्रातिनिधिक उदाहरणे पुढे दिली आहेत.)

१ अ. व्यक्तीला असलेल्या आध्यात्मिक त्रासाविषयी संशोधन करणे : सध्याच्या कलियुगात बहुतांश व्यक्तींना वाईट शक्तींचा त्रास असतो. त्यामुळे त्यांना शारीरिक आणि मानसिक या स्तरांवरील त्रासांना सामोरे जावे लागते. ‘संबंधित व्यक्तीला वाईट शक्तींचा त्रास आहे का ?’ ‘त्यावर कोणता उपाय करायला हवा ?’, या संदर्भात ज्योतिषशास्त्राच्या दृष्टीकोनातून संशोधन करायचे आहे. ‘महर्षि अध्यात्म विश्‍वविद्यालया’च्या संग्रहात आध्यात्मिक त्रास असणार्‍या आणि नसणार्‍या व्यक्तींच्या ३०० हून अधिक जन्मकुंडली सध्या उपलब्ध आहेत.

१ आ. दैवी बालकांच्या कुंडलीतील विशेष योगांच्या संदर्भात संशोधन करणे : ‘महर्षि अध्यात्म विश्‍वविद्यालया’ने उच्च लोकांतून पृथ्वीवर जन्म घेतलेल्या १ सहस्रहून अधिक दैवी बालकांना ओळखले आहे. संतांनी सांगितल्यानुसार पुढे हिंदु राष्ट्राची स्थापना झाल्यावर हेच बालक राष्ट्रात सुव्यवस्था निर्माण करतील. ज्योतिषशास्त्राच्या दृष्टीकोनातून या दैवी बालकांच्या कुंडलीतील विशेष योगांच्या संदर्भात संशोधन करायचे आहे. ‘महर्षि अध्यात्म विश्‍वविद्यालया’च्या संग्रहात स्वर्गलोक, उच्च स्वर्गलोक, महर्लोक आणि जनलोक येथून जन्म घेतलेल्या दैवी बालकांच्या जन्मकुंडली उपलब्ध आहेत.

१ इ. आवश्यक कौशल्य : यासाठी ज्योतिषशास्त्राचे प्राथमिक ज्ञान आणि संगणक हाताळता येणे आवश्यक आहे.

२. समाजासाठी उपयुक्त विषयांवर ज्योतिषशास्त्रीय संशोधन करणे (प्रातिनिधिक उदाहरण पुढे दिले आहे.)

२ अ. आगामी संकटकाळात तरून जाण्यासाठी विशिष्ट उपासना : अनेक संतांनी सांगितल्यानुसार येणार्‍या काही वर्षांत भारतासह पृथ्वीवर भीषण आपत्काळ येणार आहे. त्या वेळी नैसर्गिक आपत्ती, युद्ध आदी घटनांमुळे मोठ्या प्रमाणात जनसंहार होण्याची शक्यता आहे. मनुष्याने ईश्‍वराची भक्ती केल्यास त्याच्यात सात्त्विकता निर्माण होऊन ईश्‍वर त्याचे रक्षण करील. त्या दृष्टीने ‘ज्योतिषशास्त्रानुसार व्यक्तीने कोणती उपासना करणे आवश्यक आहे ?’, याचे संशोधन होणे आवश्यक आहे.

२ आ. आवश्यक कौशल्य : यासाठी ज्योतिषशास्त्राचे जाणकार हवेत. त्यांना ज्योतिष क्षेत्रातील अनुभव हवा.

३. ज्योतिषविषयक ग्रंथांची निर्मिती

‘महर्षि अध्यात्म विश्‍वविद्यालया’च्या संग्रहात ज्योतिषासंबंधी तात्त्विक माहिती, विश्‍लेषणात्मक लिखाण यांविषयी लिखाण उपलब्ध आहे, तसेच ज्योतिषविषयक ३५० हून अधिक ग्रंथ उपलब्ध आहेत. उपलब्ध लिखाण, ग्रंथांतील माहिती आणि नवीन संशोधन यांच्या आधारे आध्यात्मिक अन् समाजासाठी उपयुक्त अशा विषयांवर ज्योतिषविषयक ग्रंथांची निर्मिती करण्याचा ‘महर्षि अध्यात्म विश्‍वविद्यालया’चा मानस आहे. ग्रंथांची निर्मिती जलद गतीने व्हावी, यासाठी लिखाणाचे संकलन करणे, ग्रंथांच्या अनुक्रमाणिका सिद्ध करणे, अनुक्रमाणिकेनुसार लिखाण लावून घेऊन त्याचे अंतिम संकलन करणे इत्यादी सेवांसाठी साधकांची आवश्यकता आहे.

३ अ. आवश्यक कौशल्य : यासाठी ज्योतिषशास्त्राचे प्राथमिक ज्ञान असणे आवश्यक आहे. ज्योतिषशास्त्रातील जाणकार व्यक्तींचीही आवश्यकता आहे.  संगणक हाताळता येणे आवश्यक आहे. मराठी भाषेचे व्याकरण आणि शब्दरचना यांचे किमान ज्ञान असणे आवश्यक आहे. यामुळे ग्रंथसंकलन शिकवणे सुलभ होईल.

४. समाजातील ज्योतिषांना संपर्क करणे किंवा त्यांना प्रत्यक्ष भेटणे

‘महर्षि अध्यात्म विश्‍वविद्यालया’च्या ज्योतिष संशोधन कार्याला सर्वत्रच्या ज्योतिषांचे साहाय्य लाभावे, तसेच त्यांनी साधनेस प्रवृत्त व्हावे, यासाठी विविध राज्यांतील ज्योतिषांना संपर्क करणे किंवा त्यांनी प्रत्यक्ष भेटणे, अशी सेवा उपलब्ध आहे.

५. ज्योतिष अधिवेशनांमध्ये ‘महर्षि अध्यात्म विश्‍वविद्यालया’चे ज्योतिषाच्या संदर्भातील संशोधन सादर करणे

अनेक राज्यांत विविध ज्योतिष संस्थांकडून ज्योतिष अधिवेशने आयोजित केली जातात. त्यात ‘महर्षि अध्यात्म विश्‍वविद्यालया’ने केलेले ज्योतिषविषयीचे संशोधन सादर करण्याची सेवा उपलब्ध आहे.

या सेवा करण्यास इच्छुक असल्यास; परंतु सेवेचे कौशल्य नसल्यास संबंधितांना त्या संदर्भातील प्रशिक्षण देण्यात येईल. वरील सेवा करू इच्छिणार्‍यांनी जिल्हासेवकांच्या माध्यमातून पुढील सारणीनुसार आपली माहिती [email protected] या संगणकीय पत्त्यावर अथवा टपाल पत्यावर पाठवावी. ई-मेल पाठवतांना त्याच्या विषयामध्ये ‘ज्योतिष सेवा’ (Jyotish Seva) असा कृपया उल्लेख करावा.

टपालासाठी पत्ता : श्री. रूपेश लक्ष्मण रेडकर, द्वारा महर्षि अध्यात्म विश्‍वविद्यालय, भगवतीकृपा अपार्टमेंट, एस्-१, दुसरा मजला, बिल्डिंग ए, ढवळी, फोंडा, गोवा. ४०३४०१.