हिंदूंनो, दीपावली हा सण घरोघरी पणत्या लावून आनंदाने साजरा करूया !

श्री. चेतन हरिहर

१. सण साजरा करणे, म्हणजे त्यातून चैतन्याचा आनंद अनुभवणे, ही मोठी पर्वणीच असणे

हिंदु धर्मात अनेक सण आहेत. त्यांतील प्रत्येक सणाला त्याचे एक वेगळे महत्त्व आहे आणि ते साजरे करतांना त्यांचा आनंदही निराळा असतो. त्यासाठी हिंदु कुटुंबातील व्यक्ती घरापासून कितीही दूर असल्या, तरी ते एकत्र येऊन सण साजरा करतात. सण म्हणजे केवळ साजरे करणे इतकेच नसून त्यातून चैतन्य अनुभवणे, ही मोठी पर्वणीच आहे. हिंदूंच्या प्रमुख सणांपैकी एक  सण, म्हणजे दिवाळी !

२. दीपावली हा सण साजरा करण्याची पद्धत

दीपावली हा सण केवळ भारतापुरता मर्यादित नसून विदेशातही तो मोठ्या थाटात साजरा करतात. या सणाच्या नावाप्रमाणे घरोघरी तेलाचे दिवे (पणत्या) लावतात. आकाशकंदिल लावतात. दारात सडा-रांगोळी घालतात आणि फटाके वाजवून हा सण साजरा करतात.

३. दिवाळीत लावलेले दीप घर उजळून टाकणारे आणि आनंद देणारे असावेत; मात्र फटाके समाजात भय निर्माण करणारे असू नयेत !

हिंदूनो, एक लक्षात ठेवा, आपण घरात पणत्या लावतो. त्यामुळे केवळ आपल्यालाच नाही, तर आपल्या कटुंबाला आणि शेजार्‍यांंनाही आनंद मिळतो; परंतु नंतर आपण त्याच दिव्यावर फटाके लावतो. तेव्हा आपल्या कुटुंबाला आणि शेजार्‍यांना फटाक्यांच्या आवाजामुळे त्रास होतो. तेव्हा विचार करा. घरात पणत्या लावल्याने जे घर उजळून निघते, त्यांच्यातील एक दिवा आनंद देतो, तर दुसरा दिवा दुसर्‍यांना त्रस्त करतो. दिवाळीत लावलेले दीप घर उजळून टाकणारे असतात. त्याच समवेत ते दीप आनंद देणारे असावेत. त्या दिव्यांवर फटाके लावून समाजात भय निर्माण करणारे असू नयेत.

४. हिंदूनो, या वर्षीच्या दीपावलीपासून फटाके वाजवून समाजात भय निर्माण न करता दीपावली आनंदाने साजरी करूया !

आपण कधी पणती लावतांना दुर्घटना झाल्याचे ऐकले नाही; मात्र फटाके वाजवून दुर्घटना झाल्याची अनेक उदाहरणे आहेत. असे असतांना सणाचा आनंद हिरावून घेणारे फटाके का बरे लावायचे ? आपण आपले हिंदु धर्मातील सण आनंदाने साजरे करायला हवेत. दिवाळी सर्वांनाच आनंद देणारी असली पाहिजे. यासाठीच श्रीकृष्णाने भगवद्गीतेत सांगितले आहे, वसुधैव कुटुम्बकम् ।, म्हणजे संपूर्ण पृथ्वी हेच कुटुंब आहे. याचा अर्थ समजून घेऊन सण साजरा केल्यास त्यातून आपल्या समवेत संपूर्ण समाजालाही आनंद मिळेल. याचसाठी आपण या वर्षीच्या दिवाळीपासून फटाके वाजवून समाजात भय निर्माण न करता आनंदाने दीपावली साजरी करण्याचा निश्‍चय करूया.

– श्री. चेतन हरिहर, सनातन आश्रम, रामनाथी, गोवा. (१८.१०.२०१९)