देशातील प्रसिद्ध मंदिरे पाडून त्याजागी उभारलेल्या मशिदींचा इतिहास !

अवघ्या देशवासियांचे लक्ष लागून राहिलेल्या रामजन्मभूमीच्या खटल्याच्या निकालास ४ नोव्हेंबर पासून प्रारंभ होत आहे. ‘गेली ५०० वर्षे प्रलंबित असलेल्या राममंदिराच्या उभारणीचा मार्ग आता मोकळा होईल’, अशी कोट्यवधी हिंदूंना आशा आहे. ‘इस्लामी आक्रमक बाबराने राममंदिर पाडून तेथे मशीद उभी केली. त्यामुळे रामजन्मभूमी ही हिंदूंच्या हक्काची आहे’, अशी हिंदूंची श्रद्धायुक्त भावना आहे. सुलतान आणि मोगल आक्रमकांनी मंदिरे पाडून येथील हिंदु संस्कृतीच्या खुणा पुसण्याचा प्रयत्न केला. केवळ राममंदिरच नव्हे, तर देशात अन्य ठिकाणीही अशाच प्रकारे मंदिरे पाडून तेथे मशिदी उभारण्यात आल्याचे असंख्य पुरावे आढळतात. केवळ हिंदूंकडूनच नाही, तर मुसलमान समाजातूनही याला पुष्टी मिळत आहे. अनुमाने २ वर्षांपूर्वी उत्तरप्रदेश शिया केंद्रीय वक्फ बोर्डाचे अध्यक्ष सैयद वसीम रिझवी यांनी एक प्रस्ताव आणला होता. यात त्यांनी देशातील मंदिरे पाडून त्याजागी उभ्या केलेल्या ९ मशिदी हिंदूंकडे परत सोपवण्याची मागणी केली होती. याविषयी ‘राष्ट्रीय हिंदी ‘दैनिक भास्कर’ मध्ये प्रसिद्ध झालेला लेख आमच्या वाचकांसाठी साभार प्रसिद्ध करत आहोत.

‘उत्तरप्रदेश शिया केंद्रीय वक्फ बोर्डाचे अध्यक्ष सैयद वसीम रिझवी यांनी ‘ऑल इंडिया मुस्लीम पर्सनल लॉ बोर्ड’ यांच्याकडे देशातील मंदिरे तोडून त्याजागी उभ्या केलेल्या ९ मशिदी हिंदूंकडे परत सोपवण्याची मागणी केली आहे. त्यांनी बोर्डच्या अध्यक्षांना पत्र लिहून त्यात म्हटले आहे, कोणत्याही धार्मिक स्थळाला बळजोरीने तोडून त्या जागी मशीद उभारणे योग्य नाही. दुसर्‍यांची श्रद्धास्थाने तोडून उभारलेल्या मशिदींमध्ये अल्लाचे अस्तित्व नाही. त्यामुळे या मशिदी हिंदु समाजाकडे द्यायला हव्यात. ‘ऑल इंडिया मुस्लीम पर्सनल लॉ बोर्ड’ने जर असे केले, तर इस्लामचा खरा हेतू सर्व जगाला कळेल. इतिहासकारांनी या ९ मशिदींचा अभ्यास करून मोगल आणि त्यांच्या आधी आलेले सुलतान यांनी या ९ ठिकाणी मंदिरे तोडून मशिदी बांधल्या असल्याचे सांगितले आहे. ती ९ स्थाने खाली दिली आहेत. ही मंदिरे किंवा धार्मिक स्थळे यांच्याविषयी वाद का आहे ? आणि ही मंदिरे तोडून तिथे कधी मशिदी उभारल्या गेल्या ?

हे आपण जाणून घेऊया. वसीम रिझवी यांनी त्यांच्या पत्रात ज्या ९ स्थळांचा उल्लेेख केला आहे, त्या सूत्रावरून पुष्कळ काळ दोन्ही धर्मांतील लोकांमध्ये वाद आहे.

१. अयोध्येतील राममंदिर

२. मथुरेतील श्री केशवदेव मंदिर

३. वाराणसी येथील काशी विश्‍वनाथ मंदिर

४. जौनपुर येथील अटालादेव मंदिर

५. बटना गुजरात येथील रूद्र महालय मंदिर

६. कर्णावती (अहमदाबाद) येथील भद्रकाली मंदिर

७. पंडुवा (बंगाल) येथील अदिना मशीद

८. विदिशा (मध्यप्रदेश) येथील विजय मंदिर

९. देहली येथील लालकोट (२७ हिंदु आणि जैन मंदिरे)

१. अयोध्येतील राममंदिर

अयोध्या येथील नियोजित राममंदिर

सर्व स्थळांमध्ये प्राधान्याने अयोध्येतील राममंदिर आणि बाबरी मशीद वादाकडे पाहता येईल. देशातील कोट्यवधी हिंदूंचे हे श्रद्धास्थान आहे. मर्यादापुरुषोत्तम श्रीरामांचा जन्म या स्थळी झाला, असे हिंदू मानतात. वर्ष १५२८-२९ या कालावधीमध्ये मोगल बादशहा बाबरचा सेनापती मीर बाकी याने बाबरच्या नावाने इथे मशीद बांधली. कोट्यवधी लोकांचे म्हणणे आहे की, या जागी पूर्वी राममंदिर होते, जे तोडून बाबरी मशीद उभारली गेली आहे.

मशीद उभारण्याच्या वेळी दोन्ही धर्मांतील लोकांमध्ये तणाव निर्माण झाला होता, असा उल्लेख इतिहासात आहे. भारताला स्वातंत्र्य मिळाल्यावर डिसेंबर १९४९ मध्ये मशिदीत रामललाची स्थापना झाली. हिंदूंचे म्हणणे आहे की रामलला या ठिकाणी स्वतःहून प्रकट झाले. यानंतर राममंदिर आणि बाबरी मशीद यांविषयीचा वाद न्यायालयात फिरत आहे. ६ डिसेंबर १९९२ या दिवशी काही उत्साही लोकांच्या जमावाने बाबरी मशिदीची इमारत पाडली. यानंतर देशभर दंगली झाल्या. हे प्रकरण अजूनही न्यायालयात आहे आणि न्यायालयाबाहेरही हा वाद मिटवण्यासाठी अनेक प्रयत्न चालू आहेत.

२. मथुरेतील श्री केशवदेव मंदिर

मथुरेतील श्री केशवदेव मंदिर

मथुरा येथील श्रीकृष्ण जन्मभूमीवर असलेले ‘केशवदेव मंदिर आणि शाह मशीद वाद’ हाही काही प्रमुख वादांपैकी एक आहे. भगवान श्रीकृष्णांच्या जन्मस्थानी असलेल्या या मंदिराला केशवराय मंदिरही म्हटले जाते. कोट्यवधी हिंदूंच्या भावना या मंदिराशी जोडलेल्या आहेत. इथे भगवान श्रीकृष्ण हे आराध्यदैवत आहेत. जवजवळ ५ सहस्र वर्षांपूर्वी श्रीकृष्णाचा नातू (पड़पौत्र) वज्रनाभ याने हे मंदिर उभारले होते. द्वितीय चंद्रगुप्त याच्या राजवटीतही या ठिकाणी मोठे मंदिर बांधण्यात आले होते.

चंद्रगुप्त विक्रमादित्य याच्या काळात येथे दुसरे मंदिर बांधले गेले, जे वर्ष १०१७ मध्ये महमूद गजनीने तोडले. यानंतर वर्ष ११५० मध्ये विजयपाल देवाच्या शासनकाळात जज्जाने येथे तिसर्‍यांदा मंदिर बांधले. चैतन्य महाप्रभु यांनी याच मंदिरात दर्शन घेतले होते, असे म्हटले जाते. ओर्छा येथील बीरसिंह देव बुंदेला यांनी मोगल बादशहा जहांगीरच्या काळात येथे ३३ लाख रुपये खर्च करून मंदिर बांधले.

वर्ष १६७० मध्ये मोगल बादशहाने या मंदिरावर आक्रमण करून मंदिर पाडले. यानंतर भग्न झालेल्या या मंदिराच्या जागी मशीद बांधण्यात आली. या मशिदीचे नाव शाह मशीद ठेवले गेले. कोट्यवधी लोकांचे आराध्यदैवत असलेल्या श्रीकृष्णाच्या जन्मभूमीवर आजही ही मशीद आहे. या नंतरही अनेक वेळा या ठिकाणी मंदिर बांधण्याचे प्रयत्न झाले. सध्याचे मंदिर वर्ष १९६५ मध्ये बांधण्यात आले.

३. जौनपूर येथील अटालादेवी मंदिर

जौनपूरमध्ये अटालादेवी मंदिराच्या भग्न अवशेषांवर शर्की राजवंशातील इब्राहिम नायब बारबक याने अटाला मशीद उभारली आहे. तो सुलतान फिरोज शहा तुघलक तृतीयचा भाऊ होता. इब्राहिम याने या ठिकाणी असलेले प्राचीन मंदिर १३६४ या वर्षी पाडून १३७७ या वर्षी मशीद बांधणे चालू केले. वर्ष १४०८ मध्ये ही मशीद बांधून पूर्ण झाली. मशीद बांधण्यापूर्वी या ठिकाणी अटालादेवीचे मंदिर होते. मंदिर पाडल्यानंतर देवीची पूजा-अर्चा बंद झाली. या मशिदीच्या बाहेरील भिंती पालटलेल्या आहेत; परंतु आतील भिंती आणि खांब यांवर आजही राजा विजयचंद्र यांनी बांधलेल्या हिंदु मंदिराची छाप स्पष्टपणे दिसून येते.

४. रुद्र महालय मंदिर, पाटन (गुजरात)

गुजरातमध्ये पाटन जिल्ह्यातील सिद्धपूर येथे रुद्र महालय मंदिर किंवा रुद्रमल मंदिराचे भग्न अवशेष आहेत. वर्ष ९४३ मध्ये चालुक्य राजवंशातील मुलाराजा यांनी या मंदिराच्या बांधकामाला आरंभ केला होता. वर्ष ११४० मध्ये जयसिंह सिद्धराजा यांच्या राजवटीत ते पूर्ण झाले. पहिला अल्लाउद्दीन खिलजी आणि त्यानंतर अहमद शाह प्रथम याने १४१० ते १४४० या कालावधीत हे मंदिर अपवित्र करून तोडून टाकले. इतकेच नव्हे, तर मंदिराचा काही भाग पाडून त्यावर जामा मशीद बांधली. या मशिदीमध्ये मंदिराशी संबंधित काही अवशेष अजूनही दिसून येतात.

५. भद्रकाली मंदिर, कर्णावती (गुजरात)

भद्रकाली मंदिर, कर्णावती (गुजरात)

कर्णावती (अहमदाबाद) येथे असलेली जामा मशीद अहमद शाह याने १४२४ या वर्षी उभारली. ज्या ठिकाणी ही मशीद बांधली गेली, त्या ठिकाणी पूर्वी भद्रकालीदेवीचे मंदिर होते. पूर्वी विविध कालावधीत हे शहर भद्रा, कर्णावती, राजनगर आणि असावल या नावांनी ओळखले जात होते. त्यानंतर मुसलमान शासकांच्या काळात या शहराचे नाव पालटून अहमदाबाद करण्यात आले. या ठिकाणी असलेल्या भद्रकालीदेवीच्या नावावरून या शहराचे नाव भद्रा ठेवण्यात आले होते. राजस्थानमधील मालवा येथील राजपूत परमार राजांनी हे भद्रकाली मंदिर बांधले होते. या राजांनी ९ ते १४ व्या शतकापर्यंत या ठिकाणी राज्य केले होते.

६. अदिना मशीद, पंडुवा (बंगाल)

बंगालमध्ये मालदा जिल्ह्यात असलेली मदिना मशीद सध्या जीर्ण अवस्थेत आहे. बांगलादेशच्या सीमेच्या जवळ असलेली ही मशीद एके काळी भारतीय उपमहाद्वीपामधील सर्वात मोठी मशीद असावी. १४ व्या शतकात ही मशीद बंगालमधील राजवटीतील विशेष मशीद होती. येथील पंडुआ या जुन्या शहरात या मशिदीचे अवशेेष आहेत. इलयास शाही राजवंशातील दुसरा सुलतान सिकंदर शाह याच्या काळात ही मशीद बांधली गेली. ही मशीद हिंदु मंदिर किंवा बौद्ध मंदिर यांच्या अवशेषांवर उभारली गेली आहे, असे मानले जाते.

७. विजय मंदिर, विदिशा (मध्यप्रदेश)

देशातील विशाल परिसर असलेल्या मंदिरांमध्ये विजय मंदिराची गणना होते. चालुक्य वंशातील राजा कृष्ण यांचे प्रधानमंत्री वाचस्पती यांनी विदिश विजय याला चिरस्थाय करण्यासाठी या ठिकाणी भेल्लिस्मामिन(सूर्य) यांचे विशाल मंदिर बांधले. त्यानंतर १० ते ११ वे शतक या कालावधीत परमार शासकांनी या मंदिराचे पुनर्निर्माण केले. इसवी सन १२३३-३४ या कालावधीत या मंदिराची तोडफोड करण्यात आली. १७ व्या शतकात औरंगजेबाने या मंदिरावर तोफा डागून त्याच्या दगडांपासून मिनार उभे केले आणि मंदिराचे मशिदीत रूपांतर केले. गुलाम अल्तमश, अलाउद्दीन खिलजी, महमूद खिलजी, बहादुर शहा आणि औरंगजेब या सर्व मुसलमान शासकांनी विजय मंदिरावर आक्रमण केले आहे.

८. मस्जिद कुव्वत-उल-इस्लाम (कुतुबमिनार) देहली

देहलीतील सुलतानांनी येथील लालकोट (२७ हिंदु आणि जैन मंदिरे) यांच्या भग्न अवशेषांवर ‘कुतुब कॉम्प्लेक्स’ उभारला होता. वर्ष ७३९ मध्ये तोमर वंशातील अंगपाल आणि पृथ्वीराज चौहान यांनी या ठिकाणी मंदिरे बांधली होती. या कॉम्प्लेक्समध्ये असलेला कुतुबमिनार कुतुबुद्दीन ऐबक याने कुतुबुद्दीन बख्तियार याच्या काकीच्या नावाने बांधला होता. त्यानंतर कुतुबुद्दीन ऐबक ममलुक राजवंशातून देहलीचा पहिला सुलतान झाला. त्याचा उत्तराधिकारी इल्तुमिश आणि त्यानंतर तुघलक राजवंशातील सुलतान फिरोज शहा तुघलक यांनी वर्ष १३६८ मध्ये येथे मिनार बांधले.’

– श्री. दिगपाल सिंह

साभार : राष्ट्रीय हिंदी ‘दैनिक भास्कर’ (३.३.२०१८)

काशी विश्‍वनाथ मंदिर

वाराणसीमध्ये गंगा नदीच्या किनार्‍यावरील दशाश्‍वमेध घाटाच्या उत्तर दिशेला ललिता घाटाच्या जवळ मोगल बादशहा औरंगजेब याने १६६९ या वर्षी अजून एक हिंदूंचे मंदिर तोडून त्या जागी मशीद बांधली. या मशिदीचे नाव ज्ञानवापी मशीद आहे. वाराणसी शहरामध्ये असलेली ही एक जामा मशीद आहे. या मशिदीच्या भिंतींवर मंदिराचे अवशेष स्पष्टपणे दिसून येतात. ‘सध्या उभी असलेली मशीदच पूर्वीचे खरे काशी विश्‍वनाथ मंदिर होते’, असे हिंदू मानतात. येथील मंदिर कित्येक वेळा पाडले आणि पुन्हा बांधले गेले. औरंगजेबाने पाडलेले मंदिर मोगल बादशहा अकबर याच्या काळात राजा मानसिंह याने बांधले असल्याचे म्हटले जाते.

मानसिंह याचा नातू जयसिंह (पहिला) याने मराठ्यांचे राजे छत्रपती शिवाजी महाराज यांना आगर्‍याहून पळून जाण्यात साहाय्य केले होते, असे म्हटले जाते. याचा सूड घेण्यासाठी औरंगजेबाने मंदिर पाडले. सध्या असलेले काशी विश्‍वनाथ मंदिर १७८० या वर्षी अहिल्याबाई होळकर यांनी बांधले. इतिहासकारांना ज्ञानवापी मशिदीच्या मागच्या भिंतीवर प्राचीन मंदिराच्या अवशेषाच्या काही खुणा सापडल्या आहेत. काही जाणकारांच्या मते हेच पूर्वीचे काशी विश्‍वनाथ मंदिर आहे.