‘‘हुतात्मा भगतसिंह, राजगुरु आणि सुखदेव यांना ‘भारतरत्न’ देण्यात यावे !’’

  • स्वातंत्र्यापासून सर्वाधिक काळ सत्तेत असतांना क्रांतीकारकांचा नेहमी उपाहास करणार्‍या काँग्रेसचे खासदार मनीष तिवारी म्हणतात, गांधींनी भगतसिंह यांना ‘वाट चुकलेला देशभक्त’ म्हटले होते, तर काँग्रेसच्याच राजवटीत ‘एनसीईआरटी’च्या अभ्यासक्रमातून हुतात्मा भगतसिंह यांना ‘आतंकवादी’ म्हटले होते. त्याच काँग्रेसचे नेते आता भगतसिंह यांना ‘भारतरत्न’ देण्याची मागणी करतात, हे काँग्रेसचे सोयीचे राजकारण नव्हे का?
  • गांधी यांनी म्हटले होते, ‘अहिंसेचे तत्त्व स्वीकारल्यानेच देशाला स्वातंत्र्य मिळाले !’ याच गांधींचा नेहमीच उदोउदो करत आलेल्या काँग्रेसला आता सशस्त्र क्रांतीकारकांची आठवण होणे म्हणजे तिने गांधींच्या तत्त्वांना तिलांजली दिली आहे, असे म्हणायचे का ?

नवी देहली – काँग्रेस खासदार मनीष तिवारी यांनी २५ ऑक्टोबर या दिवशी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पत्र लिहिले. यात त्यांनी हुतात्मा भगतसिंह, राजगुरु आणि सुखदेव यांना ‘भारतरत्न’ घोषित करण्याची मागणी केली आहे. यासमवेतच त्यांनी मोहाली येथील विमानतळाला ‘शहीद-ए-आजम भगतसिंह विमानतळ’ असे नाव देण्याचा आग्रह केला आहे. (काँग्रेसचे उर्दूप्रेम ! – संपादक)

तिवारी यांनी पत्रात लिहिले आहे की, हुतात्मा भगतसिंह, राजगुरु आणि सुखदेव यांनी संपूर्ण पिढीला देशभक्तीसाठी प्रेरित केले. (स्वत: भगतसिंह, तसेच मदनलाल धिंग्रा,  व्ही.व्ही.एस्. अय्यर, रासबिहारी बोस, सुभाषचंद्र बोस यांसारख्या असंख्य क्रांतीविरांनी स्वातंत्र्यवीर सावरकरांकडून प्रेरणा अन् दिशा घेऊन देशाच्या स्वातंत्र्यासाठी महत्त्वपूर्ण योगदान दिले आहे. त्यामुळे सावरकर यांना ‘भारतरत्न’ देण्याची कोणी मागणी केल्यास काँग्रेस त्याला विरोध का करते ? – संपादक) २६ जानेवारी २०२० या दिवशी या तिघांना ‘भारतरत्न’ दिले जावे.