हिंदूंचे पवित्र उत्सव आणि संस्कृती यांना विकृत करण्याचे चालू असलेले षड्यंत्र !

१. हिंदु संस्कृती, म्हणजेच डौलदार असा अश्‍वत्थ वृक्ष !

‘सनातन हिंदु संस्कृतीची अवस्था अगदी अश्‍वत्थ वृक्षासारखी आहे. ‘धार्मिक स्थळे’ म्हणजे या वृक्षाच्या शाखा, ‘अध्यात्म’ ही या वृक्षाची पालवी आहे आणि ‘सण-उत्सव’ हे या वृक्षाची मुळे आहेत. ही मुळे पुष्कळ खोलवर गेलेली आहेत. हिंदु संस्कृतीचा हा महावृक्ष अत्यंत डौलदार आहे.

२. भारताच्या स्वर्णिम संस्कृतीवर आघात करून ती विकृत आणि नष्ट करण्याचा प्रयत्न करणारे मोगल अन् इंग्रज !

भारताच्या या स्वर्णिम संस्कृतीवर मोगलांनी ७०० वर्षे राज्य करून बरीच तोडफोड केली. येथील मंदिरे उद्ध्वस्त केली. विद्यापिठे जाळली. नंतर इंग्रजांनी १५० वर्षे राज्य करून आमच्या धर्मग्रंथांत फेरफार केले आणि अनेक धर्मग्रंथ उद्ध्वस्त करून टाकले. त्यांनी आमच्या धर्मग्रंथांना पालटण्याचा प्रयत्न केला; परंतु ‘सूर्याचे चित्र काढून त्यावर लहान मुलाने दाढी-मिशा आणि मोठे मोठे डोळे काढले, म्हणजे सूर्याची प्रतिमा मलीन होते’, असे नाही; कारण सूर्य तो सूर्यच ! कोंबडा आरवला नाही, तर सूर्य काय उगवायचा थांबणार आहे का ?

३. हिंदु संस्कृतीचा अविभाज्य घटक असलेल्या सण-उत्सवांतील पावित्र्य नष्ट करण्याचा प्रयत्न सुसंघटितपणे केला जात असून उत्सवांमध्ये मोठा पालट झाल्यास हिंदूंना हे उत्सव परके वाटणे शक्य !

या महावृक्षाची पाळेमुळे खोदण्याचा आणि हिंदु संस्कृती नासवून ती विकृत अन् नष्ट करण्याचा आता आणखी एक नवीन प्रयत्न चालू झाला आहे. हिंदु संस्कृतीत अध्यात्माचा गोडवा आहे आणि हिंदु संस्कृतीला उत्सवांमुळे रंग अन् सुगंध आहे. अध्यात्म आणि उत्सव हे एकमेकांचे प्रतिबिंबच आहेत. ‘अध्यात्म’ हा हिंदु संस्कृतीचा आत्मा आहे, तर ‘उत्सव’ हे हिंदु संस्कृतीचे शरीर आहे. या शरिराला पोखरण्याचे काम वेगळ्याच पद्धतीने आणि सुसंघटितपणे चालू आहे. अभ्यासपूर्वक हे काम हाती घेतलेले हिंदु संस्कृतीचे जे वैरी आहेत, त्यांना थांबवणे अत्यंत आवश्यक झाले आहे. देवता, भारतीय संस्कृती आणि धर्म यांची एक वेगळीच छाप जगाच्या जनमानसावर आहे. कुठलीही पाशात्त्य व्यक्ती हिंदु संस्कृतीकडे पहाते, तेव्हा तिच्या डोळ्यांसमोर तीन प्रतिमा उभ्या रहातात, एक ‘गणपति’, दुसरी ‘ध्यानात बसलेले योगी अथवा साधू’ आणि तिसरी म्हणजे ‘भारतियांचे उत्सव’ ! अनेक वर्षांपासून चालू असलेल्या या उत्सवांना जर गालबोट लावले, या उत्सवांतील पुरातन पद्धतीत फेरफार किंवा पालट केला, तसेच ‘या उत्सवांमुळे लोकांची हानी होते’, असा प्रचार केला, तर या उत्सवांत पालट करावा लागतो. एकदा का हिंदूंची पालट करण्याची मानसिकता सिद्ध झाली की, एक दिवस या उत्सवांमध्ये इतका मोठा पालट दिसेल की, हिंदूंनाच हे उत्सव परके वाटू लागतील !

४. हिंदूंनो, हिंदु उत्सवांत शिरलेल्या घातक गोष्टी दूर करण्यासाठी पुढील गोष्टी करा !

अ. हिंदूंच्या पाडव्यापासून दिवाळीपर्यंतच्या प्रत्येक सणाची कुचंबणा प्रसारमाध्यमांनी थांबवावी, यासाठी प्रयत्न करणे.

आ. पुरोगामी हे हिंदूंच्या सणावारांना ‘प्रदूषण मुक्तते’च्या नावाखाली मुद्दाम सिद्ध केलेली साधने वापरण्यास सांगतात. त्याचा वापर करणे टाळले पाहिजे. धर्मशास्त्र समजून घेऊन ज्या स्वरूपात उत्सव साजरे करण्याचा विचार, संस्कार आणि त्या मागचे उद्दिष्ट सांगितले आहे, ते समजून घेतले पाहिजे. रंगपंचमीला रंगीत फुले, पाने आणि वनस्पती यांपासून सिद्ध केलेले रंगच आपण वापरायला हवेेत. आता पाश्‍चात्त्य पद्धतीने सिद्ध केलेले रासायनिक ‘सिल्व्हर’ रंग, तसेच इतर रासायनिक रंग वापरून आपली हानी टाळावी.

इ. नवरात्रात विविध ‘हॉटेल्स’नी ‘दांडीया रास’ नावाने दिलेल्या घातक सुविधांकडे लक्ष देऊन तरुण-तरुणींच्या स्वैरपणावर बंधने आणणे आवश्यक आहे. तुमची मुले देशाचे भविष्य आहेत. दांडियातील संस्कृतीची विकृती करण्याचे जे कार्य चालले आहे, त्यावर आपण बहिष्कार घातला पाहिजे. आपल्या मुलामुलींना त्याविषयी समज दिली पाहिजे.’

– जगद्गुरु रामानंदाचार्य नरेंद्राचार्यजी महाराज (संदर्भ : मासिक ‘धर्मक्षेत्र नाणीजधाम’, जानेवारी २०१२)

 


Multi Language |Offline reading | PDF