धर्माधिष्ठित राजसत्ता !

संपादकीय

उत्तरप्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ हे गोरखपूर पिठाचे महंत आहेत. गोरखपूर पिठात नवरात्रीच्या दिवसांत व्रतपालन केले जाते. पिठाधिश्‍वरांना कलशस्थापनेनंतर पिठाच्या बाहेर जाता येत नाही; परंतु मुख्यमंत्रीपदाचे दायित्व लक्षात घेता योगी आदित्यनाथ सप्तमीला मठात नवरात्रीच्या विविध व्रतआचारांसाठी गेले. दसर्‍यापर्यंत ते तिथे होते. तोपर्यंत ते तेथूनच त्यांची महत्त्वाची कामेही पाहत होते. थोडक्यात काही कालावधीपुरता का होईना मठातून उत्तरप्रदेश राज्याचा कारभार चालवला गेला आणि तो मठाधिपती योगी आदित्यनाथ यांनी चालवला !

अखंड साधनारत असणारे मठ आणि मंदिरे ही चैतन्याचे स्रोत आहेत. तिथे घेतले जाणारे निर्णय हे अधिकाधिक योग्य असू शकतात. स्वातंत्र्यानंतर ७२ वर्षांत दुर्दैवाने काँग्रेस सरकारच्या दृष्टीने भारतातील मंदिरांचे महत्त्व केवळ तेथे जमा होणार्‍या दानापुरते मर्यादित राहिले. काँग्रेसच्या सर्वेसर्वा सोनिया गांधींचे व्हॅटिकनशी संबंध लपून राहिले नव्हते. मशिदींमधून निघणार्‍या फतव्यांशी सर्व जण परिचित आहेत. त्यामुळे कुणी वरील गोष्टीवर आक्षेप घेण्याचेही कारण नाही.

अनुशासित योगी

योगी आदित्यनाथ यांनी २६ व्या वर्षी संन्यासदीक्षा घेतली. वर्ष १९९८ ला सर्वांत अल्पवयाचे पहिले लोकसभा संसद म्हणून ते निवडून आले. त्यानंतरही ते ५ वेळा लोकसभा सदस्य म्हणून निवडून आले. मुख्यमंत्री झाल्यावर त्यांना प्रश्‍न विचारण्यात आला होता, ‘संन्यास दीक्षा घेतल्यावर सत्तेत कसे काय आहात ?’ त्यावर ते म्हणाले, ‘‘ही भारताची वास्तव परंपरा आहे. ज्यांना हे कळले नाही, तेच हा प्रश्‍न विचारू शकतात.’’ मुख्यमंत्री झाल्यावर त्यांनी उत्तरप्रदेशचा कायापालट करण्याचा प्रयत्न केला. खड्डेयुक्त आणि दिवे नसलेले रस्ते, गुन्हेगारी, तसेच मुलींसाठी असुरक्षित ठिकाण ही उत्तरप्रदेशची ओळख पुसण्याचा त्यांनी प्रयत्न केला. लोकांना आश्‍चर्य वाटले की, ‘बजेट’ आले नाही, तरी कामे कशी होत आहेत ?’  पूर्वीच्या शासनाकडून होणार्‍या प्रचंड लुटीचे अपप्रकार त्यांनी थांबवले. अनेक क्षेत्रांत होणारा पैशांचा प्रचंड अपव्यय थांबवला. अनावश्यक व्यय बंद केले. प्रशासकीय यंत्रणेतील पराकोटीची अनुशासनहीनता पालटून एक नवी कार्यसंस्कृती निर्माण करण्याचा प्रयत्न केला. अधिकार्‍यांना काम करण्यास उद्युक्त केले. ‘१ आठवड्यापेक्षा अधिक काळ पटलावर धारिका राहिली, तर त्याचे उत्तर द्यावे लागेल’, अशी कार्यपद्धत आणली. अधिकार्‍यांना विदेशात प्रवास करण्यासाठी सुट्ट्या देणे, वातानुकूलन यंत्रणा पुरवणे अशा गोष्टी बंद केल्या आणि ‘जनता जशी रहाते, तसे अधिकार्‍यांनी रहावे’, असे त्यांना आवाहन केले. ‘व्हीआयपी’ संस्कृती संपवली. भयावह अराजकता असलेल्या या राज्यातील अनेक क्षेत्रांतील गोष्टी आदर्श राज्याकडे वाटचाल करण्याच्या दिशेने चालू केल्या. अवैध पशूवधगृहे बंद केली. प्रत्येक पीडित व्यक्तीची तक्रार नोंदवण्याचा आदेश दिला. ‘एका पक्षाला सांगायचे ‘डीजे’ वाजवू नका आणि दुसर्‍या पक्षाला काहीच सांगायचे नाही’, असे तुष्टीकरण चालणार नाही’, असे सुस्पष्ट केले. ‘उत्तरप्रदेशचे काश्मीर होऊ देणार नाही’, असा निर्धार व्यक्त केला. मद्याच्या दुकानांवर बंधने आणली. साम, दाम, दंड, भेद ही नीती चालू केली. ‘महिलांना सुरक्षेची निश्‍चिती आम्ही देऊ शकत नाही, ही आमच्यासाठी लज्जास्पद गोष्ट आहे’, असे म्हणून त्यांनी ‘अ‍ॅण्टी रोमिओ स्कॉड’ नेमले. ‘जर आपण संस्कार करू शकलो, तर आपण अपराध थांबवू शकतो’, अशा विचारांचे ते आहेत. हा मूलभूत धर्माधिष्ठित विचार आहे. उत्तरप्रदेशात काही मुसलमान धर्मगुरूंनी गोहत्येचा निषेध करून गोमांसभक्षण न करण्याचे आवाहन केले. ‘जे अहिंदू शासनाला धरून चालतील त्यांचे शासन संरक्षण करेल’, असे त्यांनी सांगितले. याची सूची मोठी आहे. थोडक्यात धर्माधिष्ठित राज्यकर्ता २४ घंटे कार्यरत राहून निरपेक्षपणे जनतेची सेवा कशी करतो, ते यावरून लक्षात येईल. त्यामुळे लंडन आणि न्यूयॉर्क येथेही त्यांची चर्चा झाली.

धर्मसत्तेचा अंकुश !

प्राचीन काळी प्रत्येक राजाकडे राजगुरु असत. राजसत्तेवर धर्मसत्तेचा अंकुश होता. त्यामुळे भारतात सहस्रो वर्षे आदर्श राज्ये चालवली गेली. त्यांतील प्रजा सुखी होती. जिथे अल्पावधीत न्यायदान होई, राष्ट्ररक्षणाला प्रथम प्राधान्य असे, स्त्रिया सुरक्षित असत, गुन्हेगारांना कडक शासन असे. नीती, तत्त्वनिष्ठा, त्याग ही त्यांच्या राज्यकारभाराची आभूषणे होती. अर्थातच ही सनातन धर्माधिष्ठित राज्ये असल्याने सहस्रो वर्षे हिंदु संस्कृती टिकून राहिली. आज युरोपातील अनेक राष्ट्रांत राज्यकारभारावर चर्चचे वर्चस्व आहे. आज भारत आणि नेपाळ वगळता जगातील प्रत्येक देश त्याचा ‘धर्म’ सांगतो. आज आपण लोकशाहीची विदारक अवस्था सर्वच क्षेत्रांत प्रकर्षाने अनुभवत आहोत. निवडणुकीच्या पार्श्‍वभूमीवर सर्वत्र दिसणारा मद्यसाठ्याचा महापूर आपल्याला काय सांगते ? स्वातंत्र्यानंतर ७२ वर्षे धर्मनिरपेक्षतेच्या नावाखाली झालेले धर्मांधांचे प्रचंड तुष्टीकरण लोकशाहीतील समानतेच्या तत्त्वाला तिलांजली देत नाही का ? सर्वच क्षेत्रांत नीतीमूल्यांची झालेली पडझड, भ्रष्टाचार, अराजकता, असुरक्षितता, सर्वच क्षेत्रांतील स्वार्थांधता अशा सर्वच अधोगतीपासून राष्ट्राला वाचवायचे असेल, तर केवळ कायदा उपयोगी नाही, तर कायद्याची कार्यवाही करणारा पालनहार राज्यकर्ता हा तत्त्वनिष्ठ हवा. ही तत्त्वनिष्ठा केवळ आणि केवळ धर्मच प्रदान करतो. रामराज्यापासून छत्रपती शिवाजी महाराज यांचे स्वराज्य हे धर्माधिष्ठित होते. त्यामुळे ते यशस्वी झाले. येत्या काळातही अशाच राज्याची भारतियांना प्रतीक्षा आहे !


Multi Language |Offline reading | PDF