(म्हणे) ‘भाजप आणि बजरंग दल आय.एस्.आय.साठी हेरगिरी करतात !’ – दिग्विजय सिंह

दिग्विजय सिंह यांची चौकशी करा ! – विहिंपची मागणी

देशातील जनतेने काँग्रेसचा पराभव करूनही काँग्रेसवाले अद्याप त्यातून काहीही शिकलेले नाहीत, हेच या विधानातून लक्षात येते ! अशा विधानांमुळे काँग्रेसला मते मिळतील किंवा ती परत सत्तेत येईल, अशी काँग्रेसवाल्यांना अशा वाटत असेल, तर ते मूर्खांच्या राज्यात वावरत आहेत, असेच म्हणावे लागेल !

नवी देहली – काँग्रेसचे नेते दिग्विजय सिंह यांनी ६ ऑक्टोबर या दिवशी भाजप आणि बजरंग दल यांच्यावर आरोप करतांना ‘या दोघांचे पाकची गुप्तचर यंत्रणा आय.एस्.आय.शी संबंध असून ते तिच्यासाठी हेरगिरी करतात’, असे म्हटले होते.

विश्‍व हिंदु परिषदेचे कार्यकारी अध्यक्ष आलोक कुमार

त्यावर विश्‍व हिंदु परिषदेचे कार्यकारी अध्यक्ष आलोक कुमार यांनी, ‘दिग्विजय सिंह यांच्याकडे याविषयी माहिती असेल, तर सीबीआयने त्यांची चौकशी केली पाहिजे आणि जर त्यांचा आरोप खोटा निघाला, तर त्यांना शिक्षा झाली पाहिजे’, अशी मागणी केली आहे. (अशा विधानांसाठी दिग्विजय सिंह यांना अटक करून कारागृहातच टाकले पाहिजे ! – संपादक)

सिंह यांनी ट्वीट करतांना म्हटले होते की, संघ आणि भाजप गोडसे यांना स्वातंत्र्यसैनिक घोषित का करत नाहीत ? हेडगेवार, गोळवलकर आणि सावरकर यांची जयंती भाजप अन् संघवाले मोठ्या धुमधडाक्यात का साजरी करत नाहीत, असा प्रश्‍नही त्यांनी विचारला होता. (काँग्रेसवाले स्वातंत्र्यवीर सावरकर यांची जयंती का साजरी करत नाहीत ? त्यांना ते स्वातंत्र्यसैनिक वाटत नाहीत का ? याचे उत्तर दिग्विजय सिंह का देत नाहीत ? – संपादक)


Multi Language |Offline reading | PDF