पाकने प्रथम आतंकवाद्यांच्या ठिकाणांवर कारवाई करून शांततेसाठी प्रयत्न करावेत !

पाकच्या तालिबान्यांसमवेत झालेल्या चर्चेवर अफगाणिस्तानने सुनावले

काबूल – तालिबानने नुकत्याच केलेल्या पाकच्या दौर्‍याचा अफगाणिस्तानमधील शांतीप्रक्रियेसाठी कोणताही लाभ होणार नाही. बंडखोरांचे स्वागत करणे, हे नियमांच्या विरोधात आहे. जेव्हा अफगाणिस्तान सरकारच्या नेेतृत्वाखाली अशा प्रकारचा प्रयत्न केला जाईल, तेव्हा याचा काही तरी लाभ हेाऊ शकतो; मात्र तालिबान शांततेसाठी कटीबद्ध आहे, असे आम्हाला कुठेही दिसून आलेले नाही. पाकने त्याच्या भूमीवरील तालिबानी आतंकवादी आणि अन्य आतंकवादी संघटना यांची ठिकाणे नष्ट करावीत अन् सुरक्षेच्या दृष्टीने सकारात्मक भूमिका वठवावी, अशा शब्दांत अफगाणिस्तानचे राष्ट्रपती अशरफ गनी यांचे प्रवक्ते सेदिक सेदिकी यांनी पाक आणि तालिबान यांना सुनावले आहे.

तालिबानच्या एका प्रतिनिधीमंडळाने पाकमध्ये जाऊन पाकचे परराष्ट्रमंत्री शाह महमूद कुरेशी यांची भेट घेतली. ‘या भेटीत ठप्प झालेली अफगाणिस्तानमधील शांतीप्रक्रिया पुन्हा चालू होईल’, असे पाकने म्हटले आहे. त्यावर अफगाणिस्तानने वरील प्रतिक्रिया व्यक्त केली. या दौर्‍याच्या वेळी पाकमधील अमेरिकेचे विशेष दूत खलीलजाद हेही पाकमध्येच होते. त्यांचीही तालिबानवाल्यांशी चर्चा झाल्याचे म्हटले जात आहे.


Multi Language |Offline reading | PDF