हिंदूंनो, काळानुसार सीमोल्लंघन करा !

विजयादशमीनिमित्त परात्पर गुरु डॉ. आठवले यांचा संदेश

परात्पर गुरु डॉ. आठवले

‘देवतांनी आसुरी शक्तींवर विजय प्राप्त केल्याचा दिवस म्हणजे विजयादशमी ! दैवी शक्तींनी आसुरी शक्तींवर विजय मिळवल्याचा हा दिवस ! ७५ वर्षांपूर्वी महान संत योगी अरविंद यांनी साधना करून सूक्ष्मातून हिटलरची आसुरी शक्ती निष्प्रभ केली आणि सूक्ष्मयुद्धाद्वारे भारतीय स्वातंत्र्याचा मार्ग मोकळा केला. सांप्रतकाळातही आसुरी शक्ती भारताचे विघटन करण्यास आतुर असल्याचे दिसून येते. ‘३७० कलम’ रहित झाल्यामुळे पाकिस्तान युद्धाच्या धमक्या देत आहे. ‘तीन तलाक’ रहित केल्यामुळे, तसेच बांगलादेशी घुसखोरांना हटवण्यासाठी आसाममध्ये ‘राष्ट्रीय नागरिक नोंदणी’ (एनआरसी) प्रक्रिया पूर्ण केल्यामुळे आता देशांतर्गत युद्धाच्या धमक्या मिळत आहेत. राज्यकर्त्यांनी देशहिताचे निर्णय घेणे, हे त्यांच्या पातळीवरील सीमोल्लंघन आहे. देशहिताच्या निर्णयांच्या पाठीशी उभे राहून देशांतर्गत युद्धासाठी सिद्धता करणे, हे जनतेच्या दृष्टीने सीमोल्लंघन आहे.

खरे सीमोल्लंघन म्हणजे ‘शत्रूची सीमा उल्लंघून युद्ध पुकारणे’, अपराजितादेवीचे पूजन म्हणजे ‘विजयासाठी देवीकडे शक्ती मागणे’ आणि रात्री थोरामोठ्यांना आपट्याची पत्रे (पाने) देणे म्हणजे ‘आपल्या विजयाचे पत्र देऊन (विजयश्री प्राप्त करून) थोरामोठ्यांचे आशीर्वाद घेणे’ होय. हिंदूंनो, विजिगीषू वृत्ती वाढवणारी ही विजयादशमीची तेजस्वी परंपरा आहे.

पांडवांचा अज्ञातवास मोडण्यासाठी कौरवांनी विराटदेशाच्या सीमेचे सशस्त्र सीमोल्लंघन केले होते, तेव्हा बृहन्नडेच्या वेशात असणार्‍या वीर अर्जुनाने शमीच्या ढोलीतून शस्त्रे काढून संपूर्ण कौरवसेनेवर विजय प्राप्त केला होता. हिंदूंनो, हा इतिहास आठवा आणि सावध व्हा. शत्रू सीमोल्लंघन करत आहे; म्हणून स्वतःच्या रक्षणाची सिद्धता करा !’

– (परात्पर गुरु) डॉ. जयंत बाळाजी आठवले, संस्थापक, सनातन संस्था.


Multi Language |Offline reading | PDF